Friday, 21 August 2026
विश्व छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन रामन विज्ञान केंद्रात २२ व २३ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय प्रदर्शन
विश्व छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
रामन विज्ञान केंद्रात २२ व २३ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय प्रदर्शन
नागपूर, दि. २१ : विश्व छायाचित्रण दिन २०२६ निमित्त रामन विज्ञान केंद्र व तारांगण, नागपूर यांच्या वतीने पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI), नागपूर चॅप्टर आणि हिंदी पत्रकार संघ, नागपूर यांच्या सहकार्याने ‘Science through Lens’ या विषयावर विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय प्रदर्शन २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
प्रेस छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून विज्ञान, जिज्ञासा, संशोधन, शोध आणि वैज्ञानिक उपक्रमांशी संबंधित विविध विषयांना सर्जनशील स्वरूपात मांडले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे नागपूर अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रामन विज्ञान केंद्र व तारांगणाचे संचालक अमित मंडल, हिंदी पत्रकार संघाचे प्रमुख आनंद निर्बाण, नंदकिशोर पुरोहित, पीआरएसआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम) एस. पी. सिंह, नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष यशवंत मोहिते, सचिव मनीष सोनी आणि कोषाध्यक्ष शरद मराठे यांच्यासह तिन्ही संस्थांचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
२२ ऑगस्ट रोजी उद्घाटन झाल्यानंतर हे प्रदर्शन २३ ऑगस्ट रोजीही नागरिकांसाठी खुले राहणार आहे. विज्ञान आणि छायाचित्रणाची आवड असलेले विद्यार्थी, युवक, छायाचित्रप्रेमी तसेच सर्वसामान्य नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देऊन विविध छायाचित्रांचा आस्वाद घेता येणार आहे.
००००
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment