Friday, 3 May 2019

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नऊ शाखांना एन.बी.ए. मानांकन

            नागपूर  दि.3: 1914 पासून शासकीय तंत्रनिकेतन नागपूर, तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात महत्वाचे योगदान देत आहे.  मध्य भारतातील ही अग्रगण्य व स्वायत्त संस्था असून विविध नऊ अभियांत्रिकी शाखांना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशनचे जागतिक दर्जाचे मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे.  अशा प्रकारचे नऊ शाखांना एन.बी.ए. मानांकन प्राप्त करणारे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नागपूर राज्यातील पहिले ठरले असल्याचे प्राचार्य सी.एस. थोरात यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
     यावेळी एन.बी.ए. सेलच्या प्रमुख व समन्वयक डॉ. राजेश्वरी वानखडे व सहसमन्वयक प्रा. एस.एस. मुडे उपस्थित होते.

सदर संस्थेच्या एन.बी.ए. सेलने नऊ विभागांसाठी अवघ्या चार महिन्यात नियोजनबध्द काम करुन मानांकन मिळविले आहे.  एन.बी.ए. चे मानांकन सिव्हिल इन्जिनियरिंग, मेकॅनिकल इन्जिनियरिंग, इलेक्ट्रीकल इन्जिनियरिंग, इलेक्ट्रोनिक्स ॲन्ड टेलीकम्युनिकेशन इन्जिनियरिंग, कम्प्युटर इन्जिनियरिंग, माईनिंग ॲन्ड माईन सर्व्हेईंग या शाखांना प्राप्त झाले आहे, असे डॉ. थोरात यांनी सांगितले.
जगभरातील विविध देशामध्ये तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी वॉशिंगटन ॲकॉर्ड या जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व एन.बी.ए. या मंडळाने केले. एन.बी.ए. ला जून 2014 मध्ये जगातील तंत्रशिक्षण परिषदेचे सभासदत्व प्राप्त झाले.
अशा नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशनच्या तज्ञ मार्गदर्शक समितीने विविध अभियांत्रिकी शाखांची व महाविद्यालयाची गुणवत्ता वेगवेगळी परिमाणे तपासून मूल्यांकन केले.  सदर समितीने संस्थेतील एकंदर शैक्षणिक वातावरण, संस्थेचे ध्येय्य, उदिष्टे, विद्यार्थ्यांचा निकाल, प्राध्यापक वृंदाचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, तंत्रनिकेतनातील सोयी व सुविधा, निरंतर प्रगती, विद्यार्थी सहाय्य व्यवस्था, संस्थेचे गव्हर्नंस इ. बाबींचे मूल्यांकन करुन गुणवत्तेच्या आधारावर मानांकन दिले.
एन.बी.ए. प्राप्त करण्यारिता अर्ज करणे, प्रीक्वालीफायर भरणे व उत्तीर्ण होणे, सेल्फ अप्रेझल रिपोर्ट भरणे व त्या आधारे समितीला सामोरे जाणे या प्रक्रियेतून संस्थेला जावे लागले तसेच एन.बी.ए. समितीच्या सभा, विविध शाखांचे विद्यार्थी, प्राध्यापकवृंद,पालक,माजी विद्यार्थी व इतर स्टेकहोल्डर्स सोबत देखील झाल्या आहेत.
अशा प्रकारचे एन.बी.ए. मानांकन मिळाल्यामुळे संस्थेला विशिष्ट दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना देशात व परदेशात नोकरी मिळण्याकरिता सुलभ होणार आहे. मानांकनामुळे शासकीय  तंत्रनिकेतन, नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  या यशामध्ये संस्थेतीलन सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकवृंद, कर्मचारी, संस्थेचे नियामक मंडळ, अभ्यास मंडळ व इतर सर्व समित्यांचे सदस्य तसेच उद्योगधंदे समूह यांचा मोलाचा वाटा आहे.  अशा भावना प्राचार्य डॉ. चंद्रशेखर थोरात यांनी  व्यक्त केल्या.
****

Thursday, 2 May 2019

जात पडताळणी प्रकरणांतील त्रुटीपूर्तता 15 मेपर्यंत करा

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते ‘त्या’ शिक्षक पत्नींना प्रत्येकी 15 लाखाची मदत

निवडणूक काळातील चांपा शिवारात  झाला होता कार अपघात
नागपूर दि. 02 : लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतताना अपघातात मृत पावलेल्या दोन शिक्षकांच्या पत्नींना आज जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते प्रत्येकी 15 लाखाच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश देण्यात आला.
यावेळी निवडणूक उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा आणि उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे उपस्थित होते.
जिल्हा‍धिकारी अश्विन मुदगल यांनी  श्रीमती योगिता नुकेश मेंढुले यांना तर अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी श्रीमती माधुरी पुंडलिक बाहे यांना भारतीय स्टेट बँकेच्या उमरेड शाखेत देय असलेले हे धनादेश वितरीत केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाची पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. पुंडलिक बापूराव बाहे (56), रा. राहाटे ले-आऊट हे स्व. दामोधर खापर्डे विद्यालयसाळवाता. कुही येथे आणि नुकेश नारायण मेंढुले (38) रा. भांडारकर ले-आऊट हे अशोक कन्या विद्यालयउमरेड येथे कार्यरत होते. हे दोन्ही शिक्षक लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून घरी जात असताना उमरेड- नागपूर मार्गावर चांपा शिवारात त्यांच्या कारला अपघात झाला होता.
****

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील शहीद 15 पोलिस जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली











§  पोलिस महासंचालकांमार्फत घटनेची संपूर्ण चौकशी करणार
§  शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही
§  शहीदांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

§  संपूर्ण मदतीची ग्वाही

 गडचिरोली  दि 2:- कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटातील शिघ्र कृती दलातील 15 शहीद झालेल्या पोलिस जवानांना मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांनी  पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या घटनेची राज्याच्या पोलिस महासंचालकांमार्फत संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. तसेच शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असे  शहिदांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना सांगितले.   

पोलिस कवायत मैदानावर  गडचिरोली पोलिस दलातर्फे शहीद पोलिस जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सशस्त्र पोलिस दलातर्फे एकवीस बंदुकीच्या हवेत फैरी  झाडून सलामी देण्यात आली. पोलिस दलातर्फे संपूर्ण शासकीय प्रथेनुसार सर्व  शहीद पोलिस जवानांना भावपूर्ण मानवंदना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत मृत पावलेल्या 15 शहीद पोलिसांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.    

केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह, नक्षलविरोधी अभियानाचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, तसेच राज्य पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी, खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजभिये, आमदार बाळा काशीवार, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, नगरसेवक प्रमोद पिपरे यांनीही शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुर्दैवी घटनेमध्ये एक खासगी वाहनचालक शहीद झाला आहे. शहीद पोलिस जवानांच्या कुटुंबियांवर या घटनेचा मोठा आघात झाला आहे, या शहिदांच्या कुटुंबियांना संपूर्ण मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची बैठक घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या  पोलिस शिपायांच्या कुटुंबियांना शासनातर्फे संपूर्ण मदत देण्यात येणार आहे. यामध्ये एक कोटी आठ हजार रुपये एकत्रित मदत, शहिदांच्या वारसांना त्यांच्या पुढील चरितार्थासाठी शहीद पोलिसांच्या पुढील शासकीय सेवेनुसार 58 वर्षापर्यंत पूर्ण पगार तसेच अवलंबून असलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्वावर  नोकरी, शहिदांच्या मुलांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी पोलिस विभाग स्वीकारणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहीदांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना दिली.

या घटनेत शहीद झालेल्या पोलिसांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचविण्याची संपूर्ण व्यवस्था गडचिरोली पोलिस दलातर्फे करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील शहिदाचे पार्थिव विमानाने पुण्यापर्यंत व तेथून त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहिद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. प्रशासनातर्फे आवश्यक सर्व मदतीची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.     

1 मे रोजी कुरखेड्यापासून 6 किलोमीटरवर जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. यामध्ये क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे 15 जवान शहीद झाले. शहीद झालेले सर्व जवान पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते.

शहीद जवानांची नावे :

   साहुदास मडावी (रा. चिखली, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली)

प्रमोद भोयर (रा. देसाईगंज, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली)

किशोर बोबाटे (रा. चिरमुरा, ता. अरमोडी, जि. गडचिरोली)

 योगजी हलामी (रा. मोहगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली)

पुरणशाह दुग्गा (रा. भाकरोंडी, ता. आरमोडी, जि. गडचिरोली)

 लक्ष्मण कोडापे (रा. यंगलखेडा, ता. कुलखेडा, जि. गडचिरोली)

 दयानंद सहारे (रा. दीघोरी मोठी, ता. लखनदूर, जि. भंडारा)

भूपेश वालोदे (रा. लाखनी, ता. लाखनी, जि. भंडारा)

नितीन घोडमारे (रा. कुंभाली, ता. साकोली, जि. भंडारा)

सर्जेराव खरडे (रा. आळंद, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा)

राजू गायकवाड (रा. मेहकर, ता. मेहकर, जि. बुलडाणा)

अमृत भदाडे (रा. चिंचघाट, ता. कुही, जि. नागपूर)

 अग्रमन रहाटे (रा. तरोडा, ता. अर्णी, जि. यवतमाळ)

आरिफ शेख (रा. पाटोदा, ता. पाटोदा, जि. बीड)

संतोष चव्हाण (रा. ब्राह्मणवाडा, ता. औंढा, जि. हिंगोली

                                  ---- 000 -----