Monday, 7 September 2020

 जिल्हयात आज 1 हजार 390 रुग्णांना डिस्चार्ज

1 हजार 550 पॉझिटिव्ह तर 50 मृत्यू

 

            नागपूर, दि. 7 : जिल्हयात आज 1 हजार 390 कोरोबाधित बरे होऊन घरी गेले. 1 हजार 550 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 41 हजार 32 झाली आहे. आता पर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 28 हजार 658  झाली आहे.

             एकूण क्रियाशील रुग्णापैकी 6 हजार 339 गृह विलगिकरणात आहेत. आज 50 मृत्यु झाले असून त्यापैकी 4 जिल्ह्याबाहेरील मृत्यू आहेत. आजघडीला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.84 टक्के आहे.

*****

 बाल शक्ती व बालकल्याण पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित

            नागपूर, दि. 7 :  महिला व बालविकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कार 2021 साठी विविध व्यक्ती आणि संस्थांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. हे अर्ज www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने 15 सप्टेंबर 2020 पर्यंत स्विकारले जाणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी दिली आहे. 

            बाल शक्ती पुरस्कार हा 18 वर्ष पर्यंतच्या मुलांना शिक्षण, कला सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य या क्षेत्रात विशेष नाविन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल दिला जातो. बालकल्याण पुरस्कार हा वैयक्तिक स्तरावर मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. तसेच संस्था स्तरावर बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. संस्था ही शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी तसेच बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

****

 दहेगाव ते कामठी रस्ता 11 सप्टेंबरपर्यंत बंद

            नागपूर, दि. 7 :  दहेगाव ते कुही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 246 चे बांधकाम पुर्णत्वास आले आहे. या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या कोलार नदीवरील पुलाची भार वाहण्याची क्षमता चाचणी करण्यात येत असून त्याकरिता दहेगाव ते कामठी रस्त्याचा भाग उद्या मंगळवार दि. 8 पासून 11 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. दहेगाव ते कामठी राष्ट्रीय महामार्ग 247 रस्त्यावरील वाहतूक सुरादेवी, कोराडी मंदीर, राष्ट्रीय महामार्ग 47, दहेगाव (रंगारी) ते खापरखेडा या मार्गाने वळविण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता न.व.बोरकर यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.

****

 राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नागपूर, दि.७ : राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त हरिष भामरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तहसीलदार अरविंद सेलोकार यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
*****