Sunday, 10 January 2021

 















शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये

                                                                   - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Ø  भंडारा सामान्य रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी

Ø  राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे 

Ø  संपूर्ण जळीत प्रकरणाची विशेष चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई

Ø  विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती

 

नागपूर, दि.10: राज्यातील सर्वसामान्य जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येत असून त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा  उपलब्ध करुन देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची खबरदारी घेतांनाच भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना यापुढे राज्यात कुठेही घडणार नाही  तसेच शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही निष्पाप जीवाचा बळी जाता कामा नये. यासाठी सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रीकल ऑडीट सक्तीचे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केली.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या शिशू केअर युनिटची पाहणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. या घटनेमधून वाचविण्यात आलेल्या सात बालकांवर सुरु असलेल्या उपचाराची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटूंबियांसोबत संवाद साधला.   

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, भंडारा येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून तिच्या  कारणांचा शोध घेण्यात येईल. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडीट सक्तीचे करण्यात येणार असून यंत्रसामुग्री घेण्यासाठी  आवश्यक निधी उपलब्ध करुन दिल्या जाईल. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ञ व्यक्तींची मदत घेण्यात येणार आहे. ही घटना कुणाच्या दुर्लक्षामुळे घडली तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी व्यवस्थेत असलेल्या उणीवा व त्रुटींची  सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. घटनेसंदर्भातील कारणांचा शोध घेतल्यानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री डॉ. कदम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेनंतर वाचलेल्या बालकांवर उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कुटूंबांना संपूर्ण मदत दिली जात आहे. या घटनेनंतर रुग्णालय बंद राहणार नाही. तसेच ओपीडी नियमित सुरु राहिल यादृष्टीने उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी पोलीस दलाची मदत करण्यात येत आहे. उपचारासाठी येणाऱ्या कोणालाही अडवू नका, असे निर्देशही देण्यात आले आहे.

शिशू केअर युनिटला आग लागल्याचे माहिती पडताच फायर एक्स्टींग्विशद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न करणारे सुरक्षा रक्षक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीसंदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडून घेतली. शिशू केअर युनिटला मध्यरात्री लागलेल्या आगीत आयसीयुमध्ये भरती असलेल्या दहा बालकांचा मृत्यु झाला तर सात बालकांना वाचविणे शक्य झाले. आग विझविण्यासाठी सुरक्षा रक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांने प्रारंभी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी पोहचल्यामुळे आगीवर नियंत्रण शक्य झाले. सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व परिचारीका यांनी तात्काळ बालकांना इतर वार्डात हलविले. तसेच नातेवाईकांना बालकांचे मृतदेह सूपुर्द करण्यात आले. तसेच सानुग्रह अनुदानाची रक्कम सुध्दा तात्काळ वितरीत करण्यात आली. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या दृष्टीने न्यायवैधक तज्ज्ञांची टिम, इलेक्ट्रीकल निरीक्षक, व्हीएनआयटी,राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ञ, विद्युत, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटना स्थळाला भेट देवून पाहणी केली. त्यांचा अहवाल लवकरच मिळणार आहे.

 

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या समितीमध्ये तज्ञ म्हणून मुंबई अग्निशमन विभागाचे प्रमुख पी.एस. रहांगडाले  यांचा समावेश राहणार आहे. त्यासोबतच आरोग्य सेवा संचालक व इतर विभागांच्या तज्ञांचाही या समितीमध्ये समावेश असल्याचे माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. या समितीला आपला अहवाल तात्काळ देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या समितीच्या अहवालानुसार आगीचे नेमके कारण शोधल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. राज्यातील इतर रुग्णालयातही या समितीने सुचविलेल्या सूचना लागू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेली आग अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारची घटना यापुढे घडणार नाही यासाठी उपाययोजनांचा शोध घेतांना ही आग कशामुळे लागली त्याची चौकशी करुन दोषींविरुध्द कठोर कारवाई करावी अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना नियमित उपचार सुरु रहावा तसेच जळीत वार्डाचे तात्काळ दुरुस्ती करावी, अशी सूचना केली.

00000

 सर्वसामान्यांच्या वेदनेशी एकरूप होणाऱ्या

मुख्यमंत्र्यांच्या भावनिकतेचे अनोखे दर्शन
नागपूर, दि. ९ : भंडारा जिल्हा रुग्णालयास लागलेल्या आगीत आपली बाळं गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वतः भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत आले ! अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रच जणू आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा आज या दोन्ही मातांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेटून दिला !
भंडारा येथील या भीषण घटनेत भोजापुर जवळच्या सोनझारी येथील गीता बेहरे यांची अवघ्या महिनाभराची मुलगी दगावली.शहराजवळ असलेल्या भोजापूर गावातील
सोनझारी ही अवघ्या पाचसहाशेची वस्ती. या वस्तीत बेहरे कुटुंबीय राहतात. मोलमजुरी करून ते आपली उपजीविका करतात. गीता आणि विश्वनाथ यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झालेला. मृत बालिका हे त्यांचे पहिलेच अपत्य. जन्मत:च बाळाचे वजन अत्यंत कमी असल्याने तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथे गेले दोन महिने तिच्यावर उपचार सुरू होते. चांगल्या उपचारांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती.
अशीच परिस्थिती सीतेकसा येथील कविता बारेलाल कुमरे या मातेची. तिही मोलमजुरी करून स्वतःचा निर्वाह करते. गेल्या महिन्यात सात तारखेला तिच्या संसारवेलीवर पहिलेवहिले पुष्प उमलले. मात्र या मुलीचे वजन कमी असल्याने तिला उपचारासाठी भंडारा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचीही प्रकृती सुधारली होती आणि लवकरच तिला डिस्चार्ज मिळणार होता.
मात्र काल पहाटे आलेल्या त्या दुर्दैवी निरोपाने सर्वस्व हिरावले गेल्याची अत्यंत दुःखद जाणीव या दोघींना झाली. त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला आहे.
या घटनेमुळे अत्यंत व्यथित झालेले मुख्यमंत्री आज तातडीने भंडारा येथे दाखल झाले. भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत येऊन त्यांनी दोन्ही मातांची भेट घेतली. त्यांची वेदना ऐकून काही क्षण ते निःशब्द झाले. त्यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी केली. जिल्हाधिकार्यांनी या कुटुंबांची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
या दुर्घटनेमुळे बालकांच्या कुटुंबांची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही याची मला जाणीव आहे. स्वतःचं मूल अशा पद्धतीने जाणं हे अत्यंत हृदयद्रावक आहे, अशा शब्दात सहवेदना व्यक्त करतानाच यापुढे अशी घटना घडणार नाही असे वचनच जणू मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मातांना दिले. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली ही विनम्र सह्रदयता पाहून दोघींचे कुटुंबीय सद्गदित झाले. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले , जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब आदी यावेळी उपस्थित होते.
या एकाच आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी विदर्भाशी तीनदा संवाद साधला. एकदा अप्रत्यक्ष आणि दोनदा प्रत्यक्ष ! या प्रत्येक भेटीत मुख्यमंत्र्यांनी विदर्भाशी असलेली बांधिलकी अधिक दृढपणे अधोरेखित केली होती. परवा गोसीखुर्द येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळात वेळ काढून पक्षीनिरीक्षणातून पर्यावरणाची काळजी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या तरल संवेदनशीलतेचे एक अनोखे रूपही विदर्भाने पाहिले होते.आजच्या या भेटीच्या निमित्ताने विदर्भातील सर्वसामान्यांच्या वेदनेशी एकरूप होणारी मुख्यमंत्र्यांची भावनिकताही अनुभवली.
०-०-०-
हेमराज बागुल, १० जानेवारी २०२१

Saturday, 9 January 2021

भंडारा रुग्णालय जळीत प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे





·        डॉ. तायडे यांच्या समितीकडून चौकशी

·        तीन दिवसात अहवाल सादर होणार

        नागपूर, दि. 9: भंडारा येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील जळीत चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली  असून, ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज  सांगितले. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

            भंडारा जिल्हा रुग्णालयाला आज दुपारी भेट दिल्यानंतर श्री. टोपे बोलत होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी आगीचे नेमके कारण, रुग्णालयाचे  फायर एक्स्टींग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल.या समितीत संबंधित विषयांचे तज्ञ समाविष्ट करण्यात आले आहेत.

            स्ट्रक्चरल, फायर आणि एक्स्टींग्विश ऑडिट आणि रुग्णालयात नेमका स्फोट होण्याची कारणांबाबतही ही समिती शासनाला अहवाल सादर करेल असे सांगून  श्री. टोपे म्हणाले की, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबियांच्या भावना मी समजू शकतो.  भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ही समिती गठित केली आहे. या घटनेशी संबंधित सर्व संबंधितांची तसेच प्रत्यक्षदर्शींचीही समितीसोबतच पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. बेफिकीरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या आपत्तीत तातडीने मदतकार्य करून इतर बालकांचा जीव वाचविणाऱ्या  परिचारिका आणि वार्डबॉयचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

            नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, आरोग्य उप संचालक डॉ. संजय जायस्वाल यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली

 त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

बालकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

भोजापूर येथील गीता विश्वनाथ बेहरे यांचे बाळ या घटनेत दगावले आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.

****

Tuesday, 5 January 2021

 शेंगा पोखरणारी, घाटेअळी आढळल्यास किटकनाशक फवारणी करा

 

- कृषी विभागाचे आवाहन

·         शेतक-यांनो, तूर, हरभरा पिकांवरील वेळीच कीड व्यवस्थापन करा

          नागपूर, दि. 5 : विभागातील शेतक-यांनी तूर आणि हरभरा पिकांवर पडलेल्या किडीचे वेळीच व्यवस्थापन करुन, होणारी हानी टाळावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

            यासंदर्भात कृषी विभागातर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नागपूर विभागातील तूर व हरभरा पीक उत्पादक शेतकऱ्यांनी तुरीवर शेंगांचे नुकसान करणाऱ्या अळ्या, पाने गुंडाळणारी अळी तसेच हरभरा पिकांवरील घाटेअळी आणि मर रोगाचे प्रमाण वाढले असून, शेतकऱ्यांनी तूर व हरभरा पिकांवर पडलेल्या रोगांचे वेळीच कीटकनाशक फवारणी करुन व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            तूर पिकांवरील कीड नियंत्रणासाठी 50 मीटर अंतरावर पाच कामगंध सापळे उभारावेत. एका हेक्टरमध्ये किमान 50 ठिकाणांवर पक्षी बसू शकतील असे थांबे बनवावेत. तसेच तण आणि पर्यायी खाद्य नष्ट करावे. सुरुवातीला निंबोळी अर्काने फवारणी करावी. तसेच इमामकटीन बेंझोएट, क्लोरानटानिलीप्रॉल, पिसारी किडीसाठी फ्लूबेंडामाइड किंवा इंडोक्साकार्ब आदी कीटकनाशकांची फवारणी करावी. तुरीच्या शेंगांमध्ये अळी आढळून आली असून, शेंगांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पाने गुंडाळणाऱ्या अळी दिसून आल्यास अशावेळी शेतक-यांनी क्विनॉलफॉस, लॅम्ब्डा सायहालोथ्रिन आणि लुफेन्यूरॉनची पिकावर फवारणी करावी.

   नागपूर विभागात सोयाबीन पिक घेतल्यानंतर हरभरा पिकांखालील क्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे हरभरा पीक उत्पादक शेतकऱ्यांनी पिकांवर घाटेअळींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास सुरुवातीच्या काळात पाच टक्के निंबोळी अर्काने फवारणी करावी. तसेच हरभ-याच्या शेतात पक्षी थांबू शकतील असे थांबे उभारावेत, जेणेकरुन पिकावरील घाटेअळी नष्ट करण्यास आणि पक्ष्यांना अन्न मिळण्यास मदत होईल. शेतक-यांनी हरभरा पिकावर घाटेअळीचे प्रमाण वाढल्यास फ्लूबेंडामाइड, क्विनॉलफॉस, टायझोफॉस, डेल्टामेथ्रीनची दोन वेळा फवारणी करावी.

            हरभरा पिकाला फ्युजारियम उडम जमिनीत बुरशीमुळे मर लागते. पाने पिवळी होऊन झाडे कोमेजून वाळतात. जमिनीलगतचे खोड काळे पडून शेवटी झाड मरते. हरभरा पिकाच्या खोडावर बुरशी आढळून येते. शेतकऱ्यांनी हरभरा पिकावरील मर टाळण्यासाठी पिकांची दीर्घकालीन फेरपालट करावी. रोगप्रतिबंधक जाती पेराव्यात. तसेच पेरणीपूर्व थायरम, टायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी.

            विदर्भात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. अशावेळी तूर आणि हरभरा पिकांवर मोठ्या प्रमाणावर तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्या आणि हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यांचे वेळीच व्यवस्थापन करुन शेतकऱ्यांनी पिकांचे होणारे नुकसान टाळावे,असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

*****