Wednesday, 11 October 2023

झोपडपट्टी वासियांना येत्या डिसेंबर पर्यंत पट्टेवाटप करा - देवेंद्र फडणवीस

अनधिकृत भुखंडधारकांना नियमितीकरणासाठी विशेष मोहीम 18 भुखंडधारकांना नियमितीकरण पत्र 360 झोपडपट्टी धारकांना पट्टेवाटप
नागपूर, दि.9 : शहरातील झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टेपाटप येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. श्री फडणवीस यांच्या हस्ते देवगिरी शासकीय निवासस्थानी अनधिकृत भुखंडाचे नियमितीकरण पत्र व झोपडपट्टी वासियांना पट्टे वाटप करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते आज 18 भुखंडाचे नियमितीकरणपत्र व 11 झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरुपात पट्टे वाटप करण्यात आले. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी उपस्थित होते. नागपूर शहरातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीतील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमीत क्षेत्र नियमानुकुल करुन त्यांना स्थायी पट्टे वाटप करण्यासाठी महानगरपालिका, सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागातर्फे संयुक्त मोहीम राबवून पट्टे वाटपाच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या. महानगरपालिका क्षेत्रात 426 झोपडपट्टया असून त्यापैकी 298 घोषित तर 128 अघोषित आहेत. सुधार प्रन्यास तर्फे 360 झोपडपट्टी वासियांना घरकुल पट्टे वाटपाचे काम प्राधान्याने पूर्ण केले आहे. मिश्र जागेवर असलेल्या 200 झोपडपट्यांचे सर्वेक्षण शासनाच्या भूमापन विभागाने स्थानिक मोजणी करुन तत्काळ संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. झोपडपट्टी धारकांकडील जागेबद्दलचे सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात येत असून त्यापैकी 281 झोपडपट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 60 झोपडपट्यांचे सर्वेक्षण सुरु असून सुधार प्रन्यासच्या जागेवर 85 झोपडपट्या आहेत. तसेच, नझूल व महसूल जागेवर 72 झोपडपट्टयांपैकी 61 झोपडपट्ट्यांमध्ये 16 हजार 65 अतिक्रमणधारक आहेत. विशेष मोहिमेद्वारे ‘घरपोच नियमितीकरण पत्र’ अनधिकृत भुखंडाचे नियमितीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुधार प्रन्यासला दिल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 200 अनधिकृत भूखंडधारकांना नियमितीकरण पत्र पोस्टाव्दारे घरपोच पाठविण्यात येणार आहे. आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 18 भूखंडधारकांना नियमितीकरण पत्र देण्यात आले. नियमितीकरणासाठी सुधार प्रन्यास तर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र गुंठेवारी सुधारित अधिनियमानुसार 1 हजार 200 भूखंडाचे नियमितीकरण पत्र सुधार प्रन्यास तर्फे घरपोच वितरीत करण्यात येत असल्याची माहिती सभापती मनोजकुमार सुर्यवंशी यांनी यावेळी दिली. 000000

‘परवडणारी घरे’ प्रकल्पांना सर्वतोपरी मदत - महसूल मंत्री विखे-पाटील होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचा समारोप

नागपूर दि. 8 : सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील योजनेचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘परवडणारी घरे’ यासारखे प्रकल्प प्राधान्याने राबविणे आवश्यक असून त्यासाठी प्राधान्य, सवलत व सर्वतोपरी मदत करण्यास शासन तत्पर राहील, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल- (नरेडको) यांच्यावतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित तीन दिवसीय होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचा समारोप मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार अभिजीत वंजारी, नरेडको अध्यक्ष घनश्याम ढोकणे, उपाध्यक्ष ब्रिजमोहन तिवारी, सचिव बादल माटे, कोषाध्यक्ष कुणाल पडोळे, सदस्य प्रियशील माटे, माजी आमदार सुधाकर कोहळे आदी यावेळी मंचावर उपस्थित होते. शहरी व ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, नोकरदार, लहान व्यावसायिक व कामगार वर्गाचा विचार करून त्यांच्यासाठी ‘परवडणारी घरे’ बांधण्याकरिता नरेडकोने पुढाकार घ्यावा. तसेच प्रत्येक शहराच्या विकासासाठी पुढाकार घेऊन वेगवेगळे मास्टर प्लॅन तयार करण्याचे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. आमदार अभिजीत वंजारी यांनी नागपूरच्या विकासात नरेडकोने योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची माहिती ढोकणे यांनी प्रास्ताविकेतून दिली तर उपस्थितांचे आभार श्री तिवारी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी होमटाऊन प्रॉपर्टी एक्सपो मध्ये सहभाग नोंदवणाऱ्या विविध संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रॉपर्टी एक्स्पोत सहभागी संस्था, प्रदर्शनी बघण्यासाठी येणारे नागरिक उपस्थित होते. 00000

‘ई-नझूल प्रणाली’ वापरकर्त्यांसाठी अधिक सुलभ व्हावी – विभागीय आयुक्त

नागपूर जिल्हा नझूल कार्यालयाचे सादरीकरण नझूल संदर्भात माहिती एका क्लिकवर नागपूर दि. 9 : शहरातील नझूलच्या जमीनी, जागा तसेच त्यांच्या वापरासंदर्भातील एकत्रित माहिती ई-नझूल प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे. ही प्रणाली वापरकर्त्यांना सहज वापरता येईल व पाहता येईल, अशी तयार करा, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिल्या. नागपूर जिल्हा नझूल कार्यालयाच्यावतीने ‘ई-नझूल प्रणाली’ तयार करण्यात येत आहे. या प्रणालीचे सादरीकरण श्रीमती बिदरी यांच्या दालनात करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महसूल उपायुक्त राजलक्ष्मी शहा, तहसिलदार नझूल सिमा गजभिये आदी यावेळी उपस्थित होते. नागपूर शहरात जवळपास 10 हजार 700 ठिकाणी नझुलची जमीन आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नझूल जमीनीवरील अनुदानीत करण्यात आलेल्या भाडे पट्ट्यांचे नुतनीकरण, हस्तांतरण, तारण, नाव समाविष्ठीकरण आदी कार्यवाही करण्यात येते. ही सर्व कार्यपद्धती पारदर्शी आणि सुलभ व्हावी यासाठी विशिष्ट सॉफ्टवेयरचा उपयोग करुन तयार करण्यात आलेल्या ई-नझूल प्रणालीचे सादरीकरण जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी केले.नझूल जागेबाबत अर्जदाराला स्वत:चे प्रतिज्ञापत्र अपलोड करता यावे यासाठी सोपी पद्धत अवलंबावी, अशी सूचना श्रीमती बिदरी यांनी केली. संबंधित नझूल जागेचे छायाचित्र अपलोड करणे, त्या जागेचा खसरा क्रमांक, नझूल भुखंड क्रमांक, बांधकाम परवानगी, तारण परवानगी आदींची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यासाठी वाचण्यायोग्य फॉन्ट व फॉन्ट साईज वापरावा अशी सूचनाही त्यांनी केली. या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या काही संज्ञा व त्यांची नावे अधिक सोपी करण्यासंदर्भात सूचना देत या संज्ञांचा अर्थ संबंधित ई-प्रणालीतच दिल्यास अर्जदाराला या प्रणालीचा वापर करणे अधिक सुलभ होईल आणि प्रशासनावरील तानही कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. ई-नझूल प्रणालीच्या संकल्पनेचे व ही प्रणाली प्रत्यक्ष विकसीत करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ही सेवा अधिकाधिक युजरफ्रेंडली बनवून लवकरच ती जनतेसाठी उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. या सुचनांची तातडीने अंमलबजावणी करुन ही सेवा लवकरच जनतेला उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. 0000

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विभागातील कर्मचाऱ्यांप्रती सहृदयता  पोलीस कर्मचाऱ्याचा साजरा केला वाढदिवस

नागपूर, दि.9 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानी कर्तव्यावर असणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांचा वाढदिवस असल्याचे कळतात कामाच्या व्यस्ततेतूनही श्री. फडणवीस यांनी या दोन्ही अंमलदारांना शुभेच्छा दिल्या व केक भरवला. हा सर्व अनुभव घेणारे दोन पोलीस अंमलदार आणि त्यांचे सर्व वरिष्ठ हा अनपेक्षित आनंद डोळ्यात भरून घेताना आपल्या विभागाचे प्रमुख तथा राज्याचे गृहमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करतात हे पाहून सुखावले. सदर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार धिरज पंचभावे आणि अरविंद गेडेकर यांचा आज वाढदिवस असल्याची माहिती गृहमंत्र्यांच्या कानावर पडली आणि त्यांनी या दोन्ही अंमलदारांना आपल्या दालनात बोलवून घेतले. या दोघांना शुभेच्छा दिल्या ,त्यांना केकही भरवला, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. हा अनपेक्षित आणि प्रेमळ हृद्यप्रसंगाचे साक्षी होणारे दोन्ही अंमलदार आयुष्यातला सर्वात मोठा वाढदिवस साजरा झाल्याचे समाधान व्यक्त करत आहेत. झोन क्र. २ चे पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि सदर पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय मेंढे आणि बंदोबस्तावर असणारे सर्व पोलीस कर्मचारी यांच्या सोबत श्री. फडणवीस यांनी छायाचित्रही काढले. या प्रसंगातून श्री. फडणवीस हे आपल्या विभागाच्या शेवटच्या घटकाप्रती प्रेम भाव बाळगतात आणि त्यांची काळजी घेतात हेच दिसून आले. ०००००