Sunday, 15 December 2024

मुख्यमंत्री सचिवालयात साकारतेय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ महारांगोळी

Ø १२ X२४ फुट आकार आणि ६० किलो रांगोळी पासून निर्मिती
नागपूर, दि. 14 : राज्य शासनाची महत्वाकांक्षी महिला सक्षमीकरणाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’वर आधारीत महारांगोळी येथील सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालयात साकारली जात आहे. विधान भवनाच्या पोर्चमध्येही याचीच एक प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मुख्यमंत्री सचिवालय परिसरात विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विविध विभागांची शिबिर कार्यालये उभारण्यात आली आहेत. याच परिसरात मुख्यमंत्री कार्यालयाच्या मागील भागात १२ सेमी उंचीच्या डायसवर १२ X२४ फुट आकाराची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवर आधारीत रांगोळी साकारण्यात येत आहे. लाडक्या बहीणीची प्रातिनिधिक प्रतिकृती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या प्रतिकृती रेखाटण्यात येत असून खास शैलीतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही खास शब्द रचनाही रेखाटण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी उपअभियंते आणि गेल्या ४५ वर्षांपासून रांगोळी कलाकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सुनिल तरारे यांच्या नेतृत्वात नागपूर व यवतमाळ येथील एकूण पाच कलाकार ही महारांगोळी साकारत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सलग 13 तास हे कलाकार या रांगोळीचे आरेखन आणि रंगसंगतीचे कार्य करीत आहेत. १५ डिसेंबर पर्यंत ही रांगोळी तयार होणार आहे. याठिकाणी कार्यालयीन व परिसर स्वच्छतेत मग्न असणाऱ्या महिला कामगार कामातील उसंत मिळताच या रांगोळीची अवलोकन करुन कौतुक व सेल्फी घेत असल्याचे उत्साही चित्र दिसून येत आहे. या रांगोळीची अवलोकन व सेल्फी काढणे सोयीचे व्हावे यासाठी रांगोळी शेजारी दीड फुट उंचिचा डायस उभारण्यात आला आहे. विधानभवनाच्या मुख्य पोर्च मध्येही हाच कालाकारांचा चमू ४ X ६ फुट आकारातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’वर आधारीत रांगोळी साकारणार आहे. 00000

Wednesday, 11 December 2024

अधिवेशनासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्था तत्काळ पूर्ण करा - विजयलक्ष्मी बिदरी

 हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात  विधानभवन, हैद्राबाद हाऊस, रविभवन येथील व्यवस्थेची पाहणी  अधिवेशनासंदर्भात संपूर्ण माहिती ॲपवर उपलब्ध  व्यवस्थेमध्ये तृटी राहणार नाही, याची खबरदारी घ्या नागपूर,दि. 11: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबर पासून नागपूर येथे सुरु होत आहे. अधिवेशनासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तसेच विधानभवन परिसरात प्रशासनातर्फे करावयाच्या व्यवस्था तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले. श्रीमती बिदरी यांनी विधानभवन, हैद्राबाद हाऊस तसेच रविभवन येथील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. विविध यंत्रणांनी समन्वय ठेवून 12 डिसेंबर पर्यंत संपूर्ण व्यवस्था पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे तसेच या परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग तसेच इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, विधिमंडळ सचिवालयाचे कक्ष अधिकारी श्री. पजारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार, उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये, विद्युत विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. मानकर, शाखा अभियंता संदीप चापले, रवीभवनचे राहुल ठाकुर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. विधनपरिषद व विधानसभेच्या सभागृहात करण्यात आलेली आसन व्यवस्था, नव्याने बसविण्यात आलेली मल्टीमिडीया कॉन्फरन्स सिस्टीमची पाहणी, पक्ष कार्यालय, भोजनगृह आदी व्यवस्थेसोबत परिसराची पाहणी करतांना श्रीमती बिदरी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या सुचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. विधानभवन, आमदार निवास तसेच रविभवन परिसरात तीन हिरकणी कक्ष तयार करण्यात येणार आहेत. या कक्षात आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले. हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्र्यांचे सचिवालय, मुख्य सचिव यांचे कार्यालय तसेच विविध मंत्रालयीन विभागांच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कार्यालयांमध्ये बैठक व्यवस्थेसह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रवीभवन येथील सभापती, अध्यक्ष, उपसभापती, विरोधी पक्षनेते यांची निवासस्थान तसेच या परिसरातील मंत्र्यांची निवासस्थाने व कार्यालयांसाठी प्रशानासतर्फे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या विविध सुविधांची माहिती घेतली. अधिवेशना संदर्भातील व्यवस्थेची माहिती ॲपवर विधिमंडळ अधिवेशना निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सर्व सुविधांसदर्भात माहिती ॲपवर उपलब्ध होणार आहे. तसेच रेल्वे स्टेशन व विमानतळावर हेल्पडेस्क तयार करुन बाहेरुन येणाऱ्या सदस्यांना तसेच अभ्यागतांना व्यवस्थेसंदर्भातील माहिती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात असून येत्या दोन दिवसात संपूर्ण व्यवस्थेला अंतिम रुप दिल्या जाईल त्यादृष्टिने कामाचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागतर्फे करण्यात आलेल्या निवास व्यवस्थेंसदर्भात माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून संपूर्ण व्यवस्थेसंदर्भात माहिती क्युआर कोडद्वारा उपलब्ध राहणार आहे. गुगल मॅपवर स्थळदर्शन नकाशा तयार करण्यात आला असून बाहेरुन येणारे अभ्यागत तसेच वाहन चालकांनाही क्युआर कोडद्वारा संपुर्ण माहिती मिळणार आहे. व्यवस्थेसंदर्भात येणाऱ्या तृटी व अडचणीची तक्रारसुध्दा क्युआर कोडद्वारे स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 000000

Tuesday, 10 December 2024

केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या प्रसिद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करूया - संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे

 नागपुरातील पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्यांसोबतच चर्चा नागपूर,दि 10 : केंद्र व राज्य शासनातर्फे राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध महत्वाकांक्षी योजनांना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले होते. त्यानुसार आज पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या (पीआरएसआय) सर्व सदस्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे विदर्भ विभागातील योजनांना प्रसिद्धी देण्यासाठी समन्वयाने काम करण्यासाठी सहकार्य करावे, अशा भावना माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी व्यक्त केल्या. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि पीआरएसआय यांच्या समन्वयाने केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी अनौपचारिक बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी पीआरएसआय चे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.पी.सिंग, नागपूर शाखेचे सचिव मनिष सोनी, डब्ल्युसिएलचे जनसंपर्क महाव्यवस्थापक पी. नरेंद्र कुमार, महामेट्रोचे अखिलेश हळवे, दूरदर्शनच्या रचना पोपटकर आणि मीनल पाठराबे, पीआयबीचे सौरव खेकडे, मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे शरद मराठे आदि उपस्थित होते. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विविध महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ गरजुंना मिळावा यासाठी आधुनिक प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर करून समन्वयाने व्यापक प्रसिद्धी करण्यावर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. एस.पी.सिंह यांनी पीआरएसआयच्या माध्यमातून विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, याबाबत आश्वस्त केले. पीआरएसआय तर्फे डॉ. गणेश मुळे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मनिष सोनी यांनी मानले. 00000

Friday, 6 December 2024

हरभरा पिकावरील कीड व्यवस्थापनाचा कृषी विभागाचा सल्ला

नागपूर,दि ६ : हरभरा पिकावरील शेंडे, पाने व रोप कुरतडणारी अळीच्या (कट कर्म) प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून या अळीच्या व्यवस्थापन व उपाययोजनेचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आला आहे. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकावर प्रामुख्याने कट कर्म या बहुभक्षीय अळीचा प्रादुर्भाव होतो. पिकाच्या कोवळ्या शेंडयावर ही अळी 300 ते 450 अंडी घातले. पिकावर रात्री येवून ही अळी पाने व शेंडे कुरतडते. पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव हाऊ शकतो. पूर्ण वाढ झालेली अळी ही जमीनीमध्ये कोषावस्थेत जाते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी बांधावर कचऱ्याचे ढीग तसेच तण राहणार नाही अशा पद्धतीने नियोजन करणे, प्रति हेक्टर 20 पक्षी थांबे उभारावे. मादी पतंग अंडी घालू नये याकरिता निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा अझाडीरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी दिला आहे. प्रादुर्भाव 2 अळ्या प्रति मिटर ओळ अशी आर्थिक नुकसानीची पातळी आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस 20 टक्के ईसी 50 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिप्रोल 18.5 टक्के 3.0 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. ००००००