Monday, 17 August 2026

विशेष लेख मृद व जलसंधारण धोरणात तरुणाईचा डिजिटल पुढाकार!

विशेष लेख मृद व जलसंधारण धोरणात तरुणाईचा डिजिटल पुढाकार! महाराष्ट्राच्या कृषी, पर्यावरण आणि आर्थिक स्थिरतेचा मुख्य आधार म्हणजे माती आणि पाणी. राज्यातील खालावलेली भूजल पातळी, वाढती पाणीटंचाई आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य शासनाने मृद व जलसंधारणाचे धोरण अधिक व्यापक पद्धतीने राबवण्याचा संकल्प केला आहे. जलसंधारणाच्या चळवळीला लोकसहभागाची जोड देणारे हे शासन धोरण राज्याच्या शाश्वत विकासाचा आणि भविष्यातील पाणी सुरक्षेचा भक्कम पाया ठरत आहे. या धोरणांतर्गत माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकररावजी नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील ऐतिहासिक योगदानाचा गौरव करत त्यांचा जन्मदिवस, २१ ऑगस्ट, हा 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. हे धोरण एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान 'जलसंधारण सप्ताह' आणि १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी दरम्यान व्यापक 'जलसंधारण अभियान' राबविण्यात येणार आहे. कोणत्याही योजनेची यशस्विता ही लोकसहभागावर अवलंबून असते. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती प्रत्येक नागरिकाची चळवळ व्हावी, यासाठी विशेष धोरण राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 'Maha Walkathon-Walk for Water ' चे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय आधुनिक काळात तरुणाईला या अभियानात सक्रिय करण्यासाठी इंस्टाग्रामवर 'रील फॉर सॉईल ॲन्ड वॉटर कंजर्वेशन' ही राज्यव्यापी स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून १ लाख युवक आणि १ लाख रील्सच्या माध्यमातून डिजिटल लोकचळवळ उभारून जलसंधारणाचा संदेश घरोघरी पोहोचवणे, हे या धोरणाचे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला स्पर्धा, 'जलदूत' घोषणा आणि 'एक शाळा - एक शोषखड्डा' यांसारख्या धोरणात्मक उपक्रमांद्वारे बालवयातच जलसाक्षरता निर्माण केली जात आहे. ग्रामीण व शहरी भागांत 'एक पेड माँ के नाम', अमृत सरोवर स्वच्छता आणि शोषखड्ड्यांची निर्मिती यासारखी प्रत्यक्ष कामे केली जात आहेत. या अभियानाची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांचा समन्वय साधण्यात येत आहे.शासकीय धोरणांची यशस्वी अंमलबजावणी आणि त्याला मिळणारा जनसमुदायाचा प्रतिसाद यातूनच दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होऊ शकते. 'पाणी अडवा, पाणी जिरवा ' हा केवळ नारा न राहता प्रत्येक नागरिकाची जीवनशैली बनविणे, हेच या शासन धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला, शासनाच्या या महत्त्वपूर्ण अभियानात सक्रिय सहभागी होऊया आणि जलसमृद्ध व समृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीत आपले योगदान देऊया! अपर्णा यावलकर सहायक संचालक (माहिती ) नागपूर

माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करणार विभागात जलसंधारण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करणार विभागात जलसंधारण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नागपूर दि. 17 : पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याचे संकलन व भूजल पुनर्भरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. जलसंधारण अभियान ही लोक चळवळ व्हावी व प्रत्येक नागरिकाने आपला सक्रिय सहभाग नोंदवावा तसेच यासाठी संकल्प करावा या उद्देशाने नागपूर विभागात 15 ते 21 ऑगस्टपर्यंत जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता अनंत जगताप यांनी आज दिली. महा वॉकेथान फॉर वॉटर या उपक्रमाचे 21 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे वॉकेथॉनचे घोषवाक्य आहे. या उपक्रमामध्ये स्वयंसेवी संस्था, उद्योजक, व्यापारी संघटना विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य अभियंता अनंत जगताप यांनी केले आहे. रिल्स फॉर सॉईल अँड वॉटर कंझर्वेशन जलसंधारणामध्ये युवकांचा सहभाग वाढावा यासाठी इंस्टाग्राम रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली. आहे. स्पर्धेमध्ये 15 ते 30 वयोगटातील युवक व युवती सहभागी होऊ शकतील. स्पर्धेसाठी 30 ते 60 सेकंदाच्या रील तयार करावयाच्या आहेत. यामध्ये माती संवर्धन, पाणीबचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण आदी विषयावर या रील्स तयार करावयाच्या आहेत. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवकांना जिल्हा स्तरावर महाराष्ट्र युवा जलदूत म्हणून गौरविण्यात येणार असून स्पर्धेतील प्रथम आलेल्या युवकाला 25 हजार रुपये,द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार तर तृतीय क्रमांकासाठी दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. जलसंधारण अभियानाच्या कालावधीत शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला व पोस्टर्स स्पर्धा तसेच वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. एक शाळा एक शोषखड्डा पाणी बचतीबाबत जन जागृती, जलमित्र व जलदूत घोषित करणे, जलसंधारणाची शपथ तसेच जलसंधारण विषयक विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक क्षेत्र मुख्य अभियंता अनंत जगताप यांनी दिली आहे.

Sunday, 16 August 2026

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती १५ ते १९ ऑगस्टदरम्यान ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा - स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होणाचे आवाहन

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती १५ ते १९ ऑगस्टदरम्यान ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा - स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होणाचे आवाहन मुंबई, दि. १६ : माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून १५ ते १९ ऑगस्टदरम्यान रील अपलोड करता येणार आहे मृद व जलसंधारण विभागाचे https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en , Facebook- https://www.facebook.com/mahawalkathon2026/,Twitter https://x.com/MahaWalkathon26 हे सोशल मीडिया अकाऊंट आहेत. स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करून आपल्या पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करायची आहे. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणे तसेच ‘#SaveSoilSaveWater’ हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे. स्पर्धेसाठी अधिकृत क्यूआर तयार करण्यात आला आहे. क्यूआर स्कॅन केल्यानंतर नोंदणी रील लिंक सबमिट - जिल्हा निवड→व्हेरिफिकेशन→ सहभाग प्रमाणपत्र अशी सोपी प्रक्रिया आहे. माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन तसेच गावातील यशस्वी मृद व जलसंधारणाची कामे या विषयांवर रील तयार करता येणार आहे. स्टोरीटेलिंग, ॲक्टिंग, म्युझिक, डान्स, ॲनिमेशन, शॉर्ट फिल्म, बिफोर-आफ्टर आणि ड्रोन व्हिज्युअल्स यांसारख्या सर्जनशील पद्धतींचाही वापर करता येणार आहे. मात्र रीलचा मुख्य संदेश माती आणि पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक आहे. स्पर्धेचे परीक्षण विषय व संदेश, कल्पकता, प्रभावी सामाजिक संदेश, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता तसेच इन्स्टाग्राम एंगेजमेंट या निकषांवर करण्यात येणार आहे. केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाणार नाही. तर संदेश महत्वाचा असणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. याशिवाय विजेत्यांना ‘युवा मृद- जलदूत’ म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट सहभागींना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. युवक, विद्यार्थी, इन्स्टाग्राम क्रिएटर्स, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले. ००००

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन नागपूर, दि. १५ - मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धेचे ‘आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इनस्टाग्राम (Instagram) च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रील स्पर्धेत राज्यातील युवक - युवतींनी उत्सफूर्त सहभागी घ्यावा, असे आवाहन करण्यात येतआहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. रील स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. व्हिडीओ/ रिलच्या सुरुवातीला व्हिडीओ / रिलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद सहभागी स्पर्धकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धाकांने Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे. रिल्स बनवण्यासाठी विषय माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य असे रील्स बनवण्यासाठी विषय देण्यात आले आहेत. रील्स करीता गुणांकन पद्धती पुढील प्रमाणे असणार आहे. विषय व संदेश - ३० गुण, कल्पकता -२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश - २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता - १५ गुण, Instagram Engagement - १० गुण असे एकूण - १०० गुण असणार आहेत. केवळ Likes किंवा Followers वर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल. विजेत्यांना बक्षीस राज्यासाठी एकच अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रिल्स आणि राज्यभरातून १० हजार रिल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. रिल स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार ₹२५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार ₹१५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार ₹१० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष “युवा मृद-जलदूत” म्हणून गौरविण्यात येणार आहे. "एक Reel... मातीसाठी !, एक Reel... पाण्यासाठी !, एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी !" हा रिल्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे. 0000