Friday, 30 April 2021
लसीकरणाच्या माध्यमातूनच कोरोनावर मात - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
• महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा
नागपूर दि.01 : आजपासून राज्यात सर्वत्र 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरणाच्या माध्यमातूनच कोरोनावर मात करता येणार आहे. त्यामुळे अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने ही मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी. तसेच या संकटावर यशस्वीपणे मात करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सशस्त्र पोलीस दलाकडून देण्यात आलेली मानवंदना पालकमंत्र्यांनी स्विकारली.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्यासह उपायुक्त चंद्रभान पराते, सहाय्यक आयुक्त हरीष भामरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात कोरोना उपाययोजनांचे पालन करून आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, वारंवार हात धुवा, मास्क लावा व सुरक्षित अंतर ठेवा. कोविड त्रिसुत्रीच्या आधारेच कोरोनावर मात करता येईल, असे त्यांनी सांगितले.
लसीकरण हाच कोरोनावर रामबाण उपाय आहे. आजपासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून शांत व शिस्तबद्ध पद्धतीने ही मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
*****
Thursday, 22 April 2021
आग प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक ‘एसओपी’ कठोरपणे पाळण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
• दोन दिवसात अहवाल सादर करा
नागपूर दि.22 : नाशिक येथील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर विभागातील कोविड रुग्णालयांनी आग प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक एसओपी कठोरपणे पाळण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी रुग्णालयांना आज दिले.
विभागात यापूर्वी नागपूर आणि भंडारा येथील रुग्णालयांमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्व कोविड रुग्णालय प्रशासनाने आग प्रतिबंधात्मक आणि उपाययोजनांच्या साधनांची तपासणी करुन घेण्याचे निर्देश दिले असून, रुग्णालयात सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेताना काही अडचणी, शंका किंवा तक्रारी असल्यास अभियंता निलेश उकुंडे यांच्याशी संपर्क साधावा आणि पुढील दोन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या आहेत.
रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा किंवा प्लँट आणि वितरण व्यवस्थेतील आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना येणाऱ्या त्रुटी दूर कराव्यात. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नोज मास्क 20 आणि फेसशिल्ड रुग्णालयाच्या गेटवर आणि उर्वरीत अतिदक्षता विभागामध्ये पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत. रुग्णालयातील सर्व इलेक्ट्रीकल फिटींग आणि त्यांच्या जोडण्या सुस्थितीत असल्याची खातरजमा करुन घ्यावी. ही जोडणी आणि फिटींग अधिकृत विद्युत अभियंत्याकडून तपासून घ्यावी. तसेच रुग्णालयात अतिरिक्त वीज जोडणी देण्यापूर्वी व्हेंटीलेटर आणि इतर बाबींसंबंधी विद्युत अभियंत्याचा सल्ला घ्यावा, असेही विभागीय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
वातानुकुलित खोलीतील इलेक्ट्रीकल बोर्ड आणि बटनांपासून सर्व पडदे आणि ज्वलनशील पदार्थ दूर ठेवावेत. कोविडच्या अतिदक्षता विभागामध्ये ज्वलनशील पदार्थाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे अचानक आग लागल्यास त्याची तात्काळ माहिती मिळावी, यासाठीची तपास यंत्रणा सुस्थितीत असल्याचे तपासून घ्यावे. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णांना वापरण्यासाठी आयसीयु कक्षातील रुग्णसंख्येसाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचे दोन प्रतीत किमान 15 मिनिटे चालतील, असे संच भरुन ठेवावेत. तसेच ते वापरण्याबाबतचे वैद्यकीय चमूला प्रशिक्षण द्यावे.
संकटकाळात रुग्ण, नातेवाईक आणि रुग्णालयातील इतरांना सहजरित्या हलविता येईल, अशी व्यवस्था असावी. संकटकाळी बाहेर पडताना पुरेसा प्रकाश असला पाहिजे तसेच ऐनवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची पर्यायी व्यवस्था करुन ठेवावी. या काळात पुरेशा वैद्यकीय सोयी-सुविधांनीयुक्त यंत्रणा, जसे की अतिरिक्त पाणीपुरवठा, वॉटर हिटर, मोबाईल चार्जरसाठी जोडण्यांची व्यवस्था करुन ठेवावी. जेणेकरुन संकटकाळी या यंत्रणेवर अतिरिक्त ताण येवून ती ठप्प पडता कामा नये. संपूर्ण रुग्णालय इमारतीमध्ये सार्वजनिकरित्या संवाद साधता येईल, अशी ध्वनीक्षेपक यंत्रणा बसवावी. इमारतीमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्रणा हाताळणी आणि रुग्णांना हलवण्यासंबंधी सर्व डॉक्टर, परिचारिका आणि स्टाफला प्रशिक्षित करावे. अग्निशमन यंत्रणा, फायर एक्सटिंग्वशर्स, हायड्रंट, स्प्रिंकलर हे अद्यावत आणि सुस्थितीत ठेवावेत. अग्निशमनाबाबतची सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची निलेश उकुंडे यांच्याकडून खात्री करुन घ्यावी. तसेच तो अहवाल सादर करण्यास विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे.
*****
Saturday, 17 April 2021
वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता डोझी उपकरकरणाचा वापर वाढवा - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
· शहरातील प्रमुख रुग्णालयांची पालकमंत्र्यांकडून पाहणी
· रात्रंदिवस काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी
नागपूर दि.17 : कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक रुग्णाला वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. अशावेळी अतिदक्षता कक्षाबाहेरील रुग्णांसाठी डोझी उपकरण उपयुक्त ठरत आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार डोझी उपकरणाच्या पूर्वचेतावणी प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डोझी उपकरण कंट्रोल रुमचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डोझी उपकरणाचे मुख्य संस्थापक मुदीत दंडवते, बधीरिकरण विभाग प्रमुख प्रा. डॉ. वैशाली शेलगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या 150, मेडिकलमध्ये 100 तर किंग्जवे रुग्णालयात 25 डोझी उपकरण आहे. या उपकरणाद्वारे डॉक्टर दूरस्थपध्दतीने रुग्णांचे निरीक्षण करुन त्यांच्यावर उपचार करु शकतात. कोरोना संसर्गाच्या काळात हे उपकरण अत्यंत उपयुक्त आहे. गंभीर टप्यावर असलेल्या रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी डॉक्टरांना यामुळे मदत होत आहे. यासाठी डोझी उपकरणाचा आवश्यकतेनुसार वापर करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डोझी उपकरण लावण्यात आलेले असून याद्वारे रुग्णाच्या ह्दयाची गती, श्वसनदर, रक्तदाब, स्लीप एपनिया निर्देशांक, रुग्णाचा अस्वस्थता निर्देशांक तसेच ह्दयासंबंधी सर्व माहिती मिळते. हे उपकरण रुग्णाच्या गादीखाली लावण्यात येते. यामुळे रुग्णाची अस्वस्थता, रुग्णाची प्रकृती जोखमीची किंवा अतिजोखमीची आहे का, याबाबत डॉक्टरांना माहिती मिळते. या उपकरणाला वैद्यकीय भाषेत ‘स्टेपडाऊन आयसीयु’ म्हणतात. येथे सप्टेंबर 2020 पासून डोझी उपकरण लावण्यात आले आहे. येथे आतापर्यंत डोझी उपकरणाद्वारे 2009 रुग्णांवर देखरेख ठेवण्यात आली आहे. यातील 73 रुग्ण हायरिक्समध्ये गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांना तात्काळ अतिदक्षता कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे 48 रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी मदत झाली आहे. तसेच 162 रुग्णांची प्रकृतीतील बदल बघता त्यांच्यावर वेळीच ऑक्सिजन, व्हेंटीलेटर पुरवून उपचार करण्यात आले आहे. अतिदक्षता कक्षामधून बरे झालेले रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठीही डोझी मशीन उपयुक्त ठरते, अशी माहिती डॉ. वैशाली शेलगावकर यांनी यावेळी दिली.
सध्या कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे ऑक्सिजनचा वापर करताना तो जपून करावा. रुग्ण जेवत असताना, स्वच्छतागृहात गेल्यानंतर तसेच ज्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी 95 च्यावर अशावेळी ऑक्सिजनचा वापर टाळावा. परिचारिका, वार्डबॉय यांना याबाबत अवगत करावे. नर्सिंग स्टेशनमधून ऑक्सिजनचा योग्य वापर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पालकमंत्र्यांनी शहरातील विविध रुग्णालयांना भेट देवून तेथे कोविड सेंटर उभारण्याबाबत पाहणी केली. त्यांनी सोमवारपेठ येथील महाराष्ट्र राज्य कामगार रुग्णालयाला भेट दिली. येथे कोविड सेंटर उभारणीबाबत त्यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. नागपूरमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून रुग्णांवर वेळीच तातडीने उपचार व्हावे यासाठी शक्य असेल त्या रुग्णालयात कोविड सेंटर तयार करा. जेणेकरुन कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मीना देशमुख यांनी यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका तसेच आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती दिली.
डॉ. राऊत यांनी हज हाऊस इमारतीला भेट देवून तेथे कोविड सेंटर उभारण्याबाबत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राला भेट देवून तेथील वैद्यकीय व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून पूरक काम करणाऱ्या यंत्रणेने गेल्या काही दिवसात केलेल्या कामांचे कौतुक केले.
******
--
Thursday, 15 April 2021
कोरोनाची लक्षणे आढळताक्षणी वेळ न घालवता तात्काळ तपासणी करा
• कोविड टास्क फोर्सच्या सूचना
• अनलॉकच्या निर्बंधामध्येही लसीकरणाला प्राधान्य
• दोन लाखापेक्षाही जास्त लसीकरणाचे डोस उपलब्ध
• रेमडेसीव्हीरचा वापर काळजीपूर्वक आवश्यक
• जनतेने घाबरुन न जाता प्रशासनाला सहकार्य करावे
नागपूर, दि.15: कोरोनाची परिस्थिती हाताळण्याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेतर्फे बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यकतेनुसार बेडच्या उपलब्धतेसाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात येत आहे. ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करण्यासाठी भोपाळ, भिलाई तसेच इतर ठिकाणाहूनही प्रयत्न सुरु आहेत. जनतेने घाबरुन जाऊ नये व उपचाराला सहाकार्य करावे, असे आवाहन कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आज जनतेला केले आहे.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, कोविड टास्क फोर्सचे सदस्य, तज्ज्ञ डॉक्टर व माध्यम प्रतिनिधी यांच्यासोबत वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या संवादामध्ये कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. मिलिंद भ्रुशुंडी, डॉ. राजन बारोकर, डॉ. राजेश गोसावी व डॉ. निर्मल जयस्वाल सहभागी झाले होते.
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेडची उपलब्धता, ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हीरसारख्या औषधांचा मर्यादित पुरवठा होत असल्यामुळे जनतेमध्ये काळजीचे वातावरण निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सच्या सदस्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचविण्याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बाधित रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्याांने उपचार करण्यात येतात. उपचार करताना रुग्णांना केवळ रेमडिसीव्हीर इंजेक्शन देण्याचा आग्रह होत आहे. हा अत्यंत चुकीचा असून, सर्वांनाच याची आवश्यकता नाही. इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईक व जनतेमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे या एकाच इंजेक्शनचा आग्रह न धरता कोविडच्या प्रोटोकॉलनुसार औषधोपचाराला प्राधान्य देण्यात येत असल्याचे टास्क फोर्सचे डॉ. मिलिंद भ्रुशुंडी यांनी यावेळी सांगितले.
कोविड रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स यासह इतर खासगी रुग्णालयांमध्ये बेडची सुविधा वाढविण्यात येत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी उपलब्ध बेडचे नियोजन करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांनासुद्धा कोविड रुग्णालयामध्ये मान्यता देण्यात येत असल्याचे यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या झोपडपट्टी व इतर भागातही वाढत असल्यामुळे अशा भागांमध्ये ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटला प्राधान्य देण्यात आले आहे. जनतेने लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन 45 वर्षांवरील सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले. लसीकरणासाठी दोन लाख डोस प्राप्त झाले असल्याने सर्वच केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. अनलॉक प्रक्रियेमुळे प्रतिबंध असले तरीही लसीकरणासाठी जनतेने लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत.
कोरोनासंदर्भात लक्षणे आढळून आल्याबरोबर तात्काळ तपासणी करा. यासाठी घरी वेळ घालवू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गृहविलगीकरणात असलेल्या नागरिकांनी बाहेर फिरु नये, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गृहविलगीकरणातील रुग्ण बाहेर आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिलेत.
********
Subscribe to:
Posts (Atom)










