Friday, 2 August 2024

“सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प” मराठा, कुणबी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

 

Ø  अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 ऑगष्ट

     नागपूर दि.31: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे च्या वतीने मराठा-कुणबी लक्षित गटातील विद्यार्थ्यांकरिता “सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प” 2024-25 योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 15 ऑगष्ट 2024 पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.

राज्य शासनाच्यावतीने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी लक्षीत गटाच्या विद्यार्थ्यांकरिता सारथी मार्फत वर्ष 2024-25 करिता “सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प” राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणांतर्गत सारथी पुणे विभागीय कार्यालयामार्फत 12वी उत्तीर्ण 20 विद्यार्थ्यांना सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील मोडीलिपी प्रशिक्षण संस्थेद्वारे 60 तास (2 महिने) ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासोबतच सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्रामार्फत कुठल्याही शाखेतील पदवीधर 50 विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापतीठातील छत्रपती शाहु महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राद्वारे 6 महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील मोडीलिपी प्रशिक्षण संस्थेद्वारे कुठल्याही शाखेतील पदवीधर 40 विद्यार्थ्यांना 1 वर्ष कालावधीसाठी मोडीलिपी सर्टिफिकेट कोर्सचे  प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पात्रता व विद्यावेतन

पुणे, कोल्हापूर व संभाजीनगर विद्यापीठ व जिल्हा मुख्यालयाच्या बाहेरील कागदपत्रांच्या छाणनीद्वारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना प्रति विद्यार्थी दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. उमेदवारांस पूर्वलक्षी प्रभावाने आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.

या मोडीलिपी प्रशिक्षणाबाबतची संपूर्ण माहिती, मार्गदर्शक तत्वे, ऑनलाईन अर्ज, अर्ज भरण्याकरिता सूचना व हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता आदींबाबत https://sarthi-maharashtragov.in  या संकेतस्थळावर लिंक 15 ऑगष्ट 2024 पर्यंत उपलब्ध राहील. विभागीय कार्यालयास हार्ड कॉपी सादर करण्याची अंतिम मुदत 20 ऑगष्ट 2024 आहे. या तारखेमध्ये बदल असल्यास सारथीच्या संकेतस्थळावर सूचित करण्यात येणार आहे.  जास्तीत-जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

000000

Monday, 29 July 2024

दिव्यांग व शहीद जवानांच्या पाल्यांचे प्रश्न महसूल सप्ताहामध्ये प्राधान्याने निकाली काढणार - विजयलक्ष्मी बिदरी

 


Ø  1 ऑगष्ट पासून महसूल सप्ताह

Ø  जनतेची प्रलंबित कामांसाठी विशेष मोहिम

  

नागपूर,दि. 30 : महसूल विभागाशी संबंधीत असलेल्या जनतेच्या अडचणी तसेच प्रलंबित कामासंदर्भात महसूल सप्ताहानिमित्त विशेष मोहिम राबवून सोडविण्यात येणार आहेत. तसेच संरक्षण दलातील सैनिक यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे महसूल विभागाशी संबंधीत असलेल्या विविध कामांसाठी सैनिक हो तुमच्यासाठी तसेच एक हात मदतीचा- दिव्यांगाच्या कल्याणाचा हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.

महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच शासनाचे काम काजाबद्दल माहिती देण्यासाठी दिनांक 1 ऑगष्ट या महसूल दिनापासून तालुका व जिल्हास्तरावर विशेष महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात महसूल सप्ताह साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नागपूर विभागात महसूल सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महसूल सप्ताह निमित्त गुरुवार दिनांक 1 ऑगष्ट रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ होत असून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना संदर्भात आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 2 ऑगष्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, दिनांक 3 ऑगष्ट रोजी मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना तसेच दिनांक 4 ऑगष्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय या मोहिमे संदर्भात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सोमवार दिनांक 5 ऑगष्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमा अंतर्गत संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे महसूल कार्यालयाकडून विविध दाखले व प्रमाणपत्र, घरासाठी अथवा शेतीसाठी जमीन वाटपाबाबत असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येणार आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 6 ऑगष्ट रोजी दिव्यांगांच्या कल्याणासाठी एक हात मदतीचा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर विशेष शिबिर आयोजित करुन स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने उपकरणांचे वाटप, महसूल विभागाशी संबंधीत दाखले व प्रमाणपत्रे, महिला व बालविकास विभागाशी संबंधीत अनाथ मुलांना अनुज्ञेस असलेला लाभ देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी तसेच दिव्यांग व माजी सैनिकांनी महसूल विभागाशी संबंधीत असलेले प्रश्न सोडवावे असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी केले आहे.

बुधवारी समारोप

महसूल सप्ताहाचा बुधवार दिनांक 7 ऑगष्ट रोजी समारोप होणार आहे. महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिृत्त कर्मचारी यांचा विशेष गौरव व सन्मान करण्यात येणार आहे. तसेच विभागीय आयुक्त काया्रलयातर्फे विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

महसूल सप्ताहामध्ये भूमि अभिलेखा संदर्भात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विभागात नझूल संदर्भात वर्ग 2 व वर्ग 1 जमीन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी तहसलिदार, जिल्हाधिकारी तसेच संबंधित महसूल यंत्रणेला दिले आहेत.

00000

Thursday, 25 July 2024

गडचिरोलीच्या सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी

 


 

Ø  विभागात 8 हजार 847 उमेदवारांची नोंदणी

Ø  10 हजार रुपये प्रतिमहा मिळणार विद्यावेतन

 

             नागपूर दि.25: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. विभागासाठी या योजने अंतर्गत 29 हजार 500 उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.  

            मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत खाजगी व शासकीय अशा 80 आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून विभागात नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्याने प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली.

            मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने प्रशिक्षण योजने अंतर्गत पहिली नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी अभिनंदन केले असून इतर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

            धानोरा येथील सोनाली गेडाम बिएससी व एमएससीआयटी असून त्यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली असून त्यांना प्रतिमहा 6 महिन्यांपर्यत 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता महास्वयंम या पोर्टलवर विभागातील 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 692, वर्धा जिल्ह्यातील 855, भंडारा जिल्ह्यातील 966, गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 866, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 174 तर गडचिरोली जिल्ह्यातील 294 उमेदवारांचा समावेश आहे. विभागातील 11 खाजगी तर 69 शासकीय आस्थापनामध्ये नोंदणी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 758 पदे अधिसूचित करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली.

            मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्त कार्यालयातर्फे राबविण्यात येणार आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेसाठी राज्य शासनाने 5 हजार 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत 12 वी पास झालेल्या उमेदवाराला प्रतिमहा 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याने rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. विभागात खाजगी 11 व 69 शासकीय अशा 80 आस्थापनांनी 1 हजार 758 पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

00000

 

 

Tuesday, 23 July 2024

​लोकमान्य टिळकांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन


नागपूर दि.23: थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

         आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी  यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतियेळे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००



०००