Sunday, 26 January 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण





 

 

नागपूर, दि.२६ : भारत देशाचा ७६वा प्रजासत्ताक दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा झाला.

 

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. डॉ. इटनकर यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी भारतीय ध्वजास मानवंदना दिली. पोलीस विभागाच्या बँड पथकाने यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.

 

            अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उप जिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

०००००

जिल्हा न्यायालयात प्रजासत्ताक दिन साजरा




          

        नागपूर दि.२६ : जिल्हा व सत्र  न्यायालयात भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश दिनेश सुराणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रोशन बागडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. सचिन पाटील, जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे, इतर न्यायाधिश तसेच इतर वकील, न्यायीक अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते

                                                                     00000

 

उच्च न्यायालयात प्रजासत्ताक दिन साजरा




नागपूर दि.२६ : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. नागपूर खंडपीठाचे न्यायिक प्रबंधक प्रेमल विठ्ठलानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उच्च न्यायालयातील वकील, न्यायीक अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

00000

Saturday, 25 January 2025

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखे प्रदर्शनाच्या तयारीची विनायक महामुनी यांच्याकडून पाहणी


Ø  मध्यवर्ती संग्रहालयात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार प्रदर्शनाचे उद्घाटन

नागपूर, दि.25 : मध्यवर्ती पुरातत्व वस्तुसंग्रहालयात येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयापासून  छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि शिवशस्त्रशौर्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून त्याच्या तयारीची आज पाहणी करुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने इंग्लडकडून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे निर्धारित कालावधीसाठी प्राप्त केली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील शौर्याची गाथा या वाघनख्यांच्या माध्यमातून नागपूर व परिसरातील युवा पिढीला, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, संशोधकांना व समस्त इतिहास प्रेमींना प्रत्यक्ष अनुभवता यावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. या औचित्याने श्री. महामुनी यांनी मध्यवर्ती संग्रहालयास भेट देवून पाहणी केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मध्यवर्ती संग्रहालयाचे अभिरक्षक मयूर खडके, सांस्कृतिक संचालनालय, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

संग्रहालयाच्या अस्थायी सभागृहामध्ये वाघनखे आणि शिवशस्त्रशौर्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या सभागृहात व परिसरातही शिल्प दालन व शिलालेखांच्या मांडणीबाबत सुरु असलेल्या तयारीची पाहणी यावेळी करण्यात आली. या प्रदर्शनात इतिहास तज्ज्ञांचे व्याख्यानेही होणार आहेत. शिवशस्त्रशौर्य प्रदर्शनात विविध प्रकाराच्या तलवारी, ढाल, भाले, कटयारी आदी मांडण्यात येणार आहे. यासंदर्भातील आवश्यक सूचना श्री. महामुनी यांनी दिल्या.

जवळपास 8 महिने हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. नागपूर जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून विविध शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यावेत यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

00000