मुंबई, दि. ६ : अमेरिकन संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य सेनेटर श्रीमती पामेला अल्थॉफ व न्युजर्सी असेंब्लीचे सदस्य राज मुखर्जी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधानभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर देशादेशांतील देवाणघेवाण वाढावी यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व राज्य विधीमंडळ राष्ट्रीय परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याअंतर्गत हे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आले आहे. आज या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर शिष्टमंडळातील सदस्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी अमेरिकन कौन्सुलेट जनरलचे सांस्कृतिक व्यवहार अधिकारी जेम्स फेनेल, वरिष्ठ सांस्कृतिक व्यवहार सल्लागार तस्नीम काळसेकर, राजकीय अधिकारी क्रिस्टन स्वार्झकोप्फ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत हे जगातील एक प्रमुख मोठे लोकशाही राष्ट्र असून येथील संसदीय लोकशाही प्रणाली निश्चितच आदर्शवत आहे. आज महाराष्ट्र विधीमंडळाचे कामकाज पाहून समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया शिष्टमंडळातील सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व राज्य विधीमंडळ राष्ट्रीय परिषद यांच्या वतीने राबविले जात असलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत. यातून लोकशाहीचे अधिक सक्षमीकरण होण्याबरोबरच देशादेशांत आदानप्रदान वाढण्यास व विकसनशील राष्ट्रांमध्ये विकासाला चालना मिळण्यास मोठी मदत होईल, असे ते म्हणाले.
००००००

No comments:
Post a Comment