विभागीय क्रीडा संकुलातील विकास कामांचा आढावा
नागपूर, दि.6 : मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरात साकारण्यात आलेल्या विदर्भातील एकमेव सिंथेटीक ट्रॅकचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे. विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी माहिती दिली.
बैठकीला महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दिपक म्हैसेकर, उपायुक्त पराग सोमण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश इंदूरकर, क्रीडा व युवक सेवा नागपूरचे उपसंचालक सुभाष रेवतकर उपस्थित होते .
बैठकीत फुटबॉल ग्राऊंडवर लॉन व पॅव्हेलियन बिल्डींगचे बांधकाम, संकुलातील अंतर्गत रस्ते, नाल्याचे बांधकाम, संकुलाच्या परिसरातील विद्युत व्यवस्था, वसतीगृहाचे बांधकाम आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली .
विभागीय क्रीडा संकुल परिसरात बांधण्यात आलेल्या 400 मीटर सिंथेटीक ट्रॅकचे काम अंतिम टप्प्यात असून क्रीडाप्रेमीसाठी लवकरच खुले करुन देण्यात येणार आहे. इन्डोअर हॉल व परिसरात विद्युत व्यवस्थेसाठी सौर उर्जा प्रकल्प आणि खेळाडूंकरिता सर्व सोयी - सुविधायुक्त वसतीगृह बांधण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
क्रीडा संकुलातील सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करा. सुरू असलेल्या विकास कामांचा वेळोवेळी पाठपुरावा करून संबंधित यंत्रणांकडून पूर्ण करून घ्या तसेच क्रीडा संकुल परिसरातील अतिक्रमण कमी करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी यावेळी दिले.
****
No comments:
Post a Comment