मुंबई, दि. 28 : राज्यातील केंद्रीय शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करणे व शाळांमध्ये इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समवेत बैठक घेवून निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत दिली.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात अर्धा तास चर्चेच्या सूचनेवेळी सदस्य संजय दत्त यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. तावडे बोलत होते.
श्री. तावडे म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हा विषय गंभीर आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो. म्हणून शासनाने दोन वर्षापूर्वी यासंदर्भात शासन निर्णय घेऊन कार्यवाही केली आहे. याअंतर्गत राज्य अभ्यास मंडळाच्या शाळांमधील 93 टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी केले आहे. राज्य मंडळाप्रमाणे केंद्रीय शाळामधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होण्यासाठी तसेच राज्यातील सर्वच शाळांमध्ये सुविधा उपलब्ध होण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समवेत सभागृहातील सदस्यांसह बैठक घेवून या गंभीर विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये सदस्यांच्या सूचनांही विचार करण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होण्यासाठी राज्याच्या शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात अनेक बदल केले आहेत. या बदलांचा आणि सूचनांचा विचार सीबीएससी, सीआयएससीई (CISCE) मंडळामध्येही समावेश व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच अभ्यासक्रमात बदल करत असताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कमी होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे, श्री. तावडे यांनी सांगीतले.
या चर्चेत सर्वश्री सदस्य नागो गाणार, विक्रम काळे, डॉ. नीलम गोऱ्हे, जोगेंद्र कवाडे, हेमंत टकले आदींनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment