'महारेशीम अभियान-2018'चे उद्घाटन
मुंबई, दि.१ : रेशीम उद्योगासाठी राज्यात पोषक वातावरण
असून रेशीम उद्योग हा शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती करून देणारा
उद्योग आहे. रेशीम उद्योग क्लस्टर पद्धतीने करण्यासाठी एका गावात 10 शेतकऱ्यांची
अट होती ती अंशतः शिथील करून पहिल्या टप्यात 5 शेतकरी अशी करण्यात येईल, अशी घोषणा
वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी
आज येथे केली.
'महारेशीम अभियान-2018 उदघाटन आज मंत्रालयात
वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. देशमुख
म्हणाले, शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे लक्ष द्यावे. रेशीम शेतीतून एकरी
5 लाखांपर्यंत उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही मोठी आर्थिक
मदत आहे. रेशीम उद्योगात येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून,
रेशीम शेतीसाठी लागणाऱ्यासुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येथील. कोष ते कापड
प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर रेशीम
उद्योगापासून तयार होणाऱ्या कापडाच्या मार्केटिंगसाठी विभागाने प्रयत्न
करावेत असे सांगून श्री. देशमुख पुढे
म्हणाले, या अभियानाच्या
माध्यमातून यावर्षी 25 हजार रेशीम
उद्योगासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्टे ठेवावे आणि महारेशीम अभियानाच्या
प्रचार व प्रसारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी)
पुणे यांच्या समतादूतांची मदत घेवून त्यांना सुध्दा प्रोत्साहन म्हणून पुरस्कार
देण्यात यावा अशा सूचना दिल्या. शेतकरी प्रतिनिधींकडून रेशीम उद्योगाबाबत येणाऱ्या
अडचणीही श्री. देशमुख यांनी यावेळी जाणून घेतल्या.
श्री. उक्के म्हणाले, रेशीम उद्योगात
महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तुती व टसर अशा दोन प्रकारात राज्यात रेशीमचे
उत्पादन घेतले जाते. गेल्या दहा वर्षात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या असलेल्या
संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी महारेशीम अभियानात 20 दिवसात 5
हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यामुळे यावर्षी 25 हजार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले
आहे. सर्व शासकीय यंत्रणा समन्वय ठेवून दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत
हे अभियान राबविण्यात येणार आहे.
'महारेशीम अभियान-2018'च्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेतकरी प्रतिनिधी वसंत रामभाऊ सोनवणे
यांच्या हस्ते फीत कापून अभियानाचे उदघाटन करण्यात आले. शेतकऱ्यांना रेशीम
उद्योगाची माहिती व्हावी यासाठी रेशीम संचालनालय, नागपूर यांनी निर्मिती केलेल्या माहिती
पुस्तिकेचे आज वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना तुती/टसर क्षेत्र
नोंदणी पावतीचे वितरण करण्यात आले.
वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव
उज्वल उके,रेशीम संचालक
संजय मीना, उपसचिव
श्री.कुलकर्णी, डीजीएसचे प्रमोद शिंदे, बार्टीच्या प्रज्ञा वाघमारे, संबंधित अधिकारी शेतकरी
उपस्थित होते.
०००


No comments:
Post a Comment