नागपूर, दि. 14 :
पेंच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी एक पाळी पाणी देण्याच्या
सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. रब्बी
पिकांसाठी एक पाळी पाणी देण्यासाठी सुमारे 100 दशलक्ष घन मीटर पाण्याचे नियोजन
करण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
पेंच
प्रकल्पाच्या लाभधारकांना रब्बी हंगामात एक पाळी पाणी सोडण्याबाबत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय
जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार पालकमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या
शेतकऱ्यांसाठी पेंच धरणाचे बिगर सिंचन कामे आरक्षण वगळता उर्वरित पाण्यातून रब्बी
पिकांसाठी पाणी देण्याबाबत सूचना दिली आहे. त्यानुसार अंदाजे 100 दशलक्ष घनमीटर
पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले आहेत.
रब्बी पिकांसाठी पाणी
देण्यासंदर्भात आमदार मल्लिकार्जून रेड्डी, माजी आमदार आशिष जैस्वाल, जिल्हा
परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर तसेच लाभक्षेत्रातील पाणी वापर क्षेत्रांनी
विशेषकरुन पाठपुरावा केला होता.
पेंच प्रकल्पाच्या
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचे काटकसरीने वापर करण्याचे व पाण्याचा अपव्यय
टाळण्याचे आवाहन करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर
महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा व पाणी बचतीचा संदेश
सर्व जनतेपर्यंत पोहचवावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले
आहे.
****
No comments:
Post a Comment