Tuesday, 14 November 2017

विवाहपूर्व एड्स तपासणी ग्रामपंचायतींचा कौतुकास्पद उपक्रम - सचिन कुर्वे



·         विवाहपुर्व एड्स व सिकलसेल तपासणी ठराव मंजूर करणारे
तेलकामठी व तास जिल्ह्यातील प्रथम ग्रामपंचायत
·         जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सरपंचांचा सत्कार
·         सह्यांद्री फाऊंडेशनचा सहभाग

          नागपूर, दि. 14 : गावातील  तरुण व तरुणींनी विवाहपूर्व एड्स, सिकलसेल  या आजारांची तपासणी करुन घ्यावी, त्यानंतर लग्नाला अनुमती देण्यात येईल, अशा प्रकारचा तेलकामठी व तास ग्रामपंचायतीद्वारा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला ठराव सामाजिकदृष्ट्या हितावह असून, हा उपक्रम आरोग्यविषयक जनजागृतीसाठी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.
            गावातील तरुण व तरुणींचा विवाहपूर्व एड्स व सिकलसेल तपासणी ठराव मंजूर करणारे कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी व भिवापूर तालुक्यातील तास ग्रामपंचायत,  नागपूर जिल्ह्यातील पहिल्याच ग्रामपंचायती असून या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे तेलकामठी येथील सरपंच दिलीप पाटील व तास येथील सरपंच युवराज शंभरकर यांचा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
            समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण व्हावी, याकरीता हा स्तूत्य उपक्रम असून यामुळे समाजामध्ये एक नवा आदर्श निर्माण होण्यास मदत होईल. या यशस्वी उपक्रमाच्या धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायती तसेच नगरपालिका क्षेत्रामध्ये उमरेड, सावनेर, रामटेक व कामठी या शहरांपासून हा उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात येईल. त्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न व आवश्यक मदत करण्यात येईल. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती अधिक प्रमाणात होण्यासाठी अशा उपक्रमांचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी कुर्वे यांनी यावेळी सांगितले.
            सत्काराला उत्तर देतांना तास ग्रामपंचायतीचे सरपंच युवराज शंभरकर म्हणाले, आजारांमुळे व्यक्तीगत आयुष्यासोबतच कुटुंब उध्वस्त होऊ नये याकरीता सामाजिक जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने एड्स व सिकलसेल यासारख्या आजारांची विवाहपूर्व तपासणी करण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांद्वारा घेण्यात आला. याकरीता सह्यांद्री फाऊन्डेशनचे सहकार्य मोलाचे ठरले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सह्याद्री फाऊन्डेशन व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
****

                                                                         

No comments:

Post a Comment