मुंबई, दि. 10 : राज्यातील प्रत्येक कॅन्सरग्रस्त रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी कालबद्ध मोहीम आखण्यात आली असून त्याचा एक भाग म्हणून ऑनलाईन ऑन्कोलॉजी ट्युटोरियल द्वारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आशा कार्यकर्ती यांना कॅन्सर विषयीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज दिली.
टाटा हॉस्पीटल आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांना कॅन्सरविषयी अद्ययावत आणि निरंतर प्रशिक्ष्ाण मिळावे यासाठी ऑनलाईन ऑन्कोलॉजी ट्युटोरियल सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात लॉन्च करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. सावंत पुढे म्हणाले, या ट्युटोरियलमार्फत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेता येणार आहे. तज्ज्ञ सल्लागारांचे व्हिडीओ व्याख्यान, केस स्टडी, मुल्यांकन प्रश्नावली आणि टाटा मेमोरियल हॉस्पीटलच्या संबंधित तज्ज्ञांद्वारे वेबिनार इ. माध्यमांतून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऑनलाईन ऑन्कोलॉजी ट्युटोरियलद्वारे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर सीएमई मुल्यांकनासही पात्र ठरणार आहे.
राज्यातील प्रत्येक कॅन्सर रुग्णांचे निदान व्हावे, यासाठी सर्व स्तरातून जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिपकुमार व्यास, आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. साधना तायडे, टाटा मेमोरियलचे संचालक डॉ. कैलाश शर्मा, ऑन्कोलॉजी तज्ज्ञ डॉ. पकंज चतुर्वेदी व इतर मान्यवर उपस्थित होते.
ऑनलाईन ऑन्कोलॉजी ट्युटोरियल
· हा अभ्यास चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतवैद्यक आणि इतर आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी आहे. जे कर्करोगतज्ज्ञ नसतात परंतु कर्करोगाचे लवकर शोध, निदान करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
· ऑनलाईन व्हिडीओ व्याख्यानांचा उपयोग आरोग्य व्यावसायिकांना त्यांचे कौशल्य व ज्ञान सुसज्ज करण्याच्या हेतुने केलेला आहे. कॅन्सरच्या प्रकरणांची माहिती शोधणे, त्यांचे निदान करणे आणि त्यांचा अहवाल सादर करणे हा आहे.
· कर्करोगाच्या शरीरातील वेगवेगळ्या जागा आणि उपजागांवर आधारीत संपूर्ण अभ्यासक्रम सात आठवड्यांचा वेगवेगळ्या मॉड्युलसह तयार केलेला आहे.
|
००००

No comments:
Post a Comment