नवी
दिल्ली, दि. 5 : महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ कार्यक्रमाच्या
माध्यमातून थेट ‘वर्ल्ड फूड इंडिया’ प्रदर्शनात पोहोचलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सीमा पाटील या ग्रामीण भागातील उद्योजिका, वर्धा मेगा फूड पार्कच्या माध्यमातून परदेशात शेतमाल पोहोचविणारे आशिष
अग्रवाल आणि घाण्यावरील तेलाचा व्यवसाय देश-विदेशात पोहोचविण्याची संधी
शोधण्यासाठी आलेले सांगली येथील उद्योजक विठ्ठल चव्हाण यांनी येथील महाराष्ट्र
दालनामुळे भरपूर लाभ झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.
केंद्रीय
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील इंडिया गेट परिसरात ‘वर्ल्ड फूड इंडिया २०१७’ प्रदर्शन भरविण्यात आले असून देश-विदेशातील जवळपास दोन हजार कंपन्या यात
सहभागी झाल्या आहेत. देशातील विविध राज्यांची दालनेही येथे उभारण्यात आली आहेत.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र दालनात’ राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योजकांनी सहभाग
घेतला असून या प्रदर्शनामुळे त्यांना खूप लाभ झाल्याच्या भावना त्यांनी बोलून
दाखविल्या.
महाराष्ट्र
शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजिवीका कार्यक्रमांतर्गत’ राबविण्यात येणाऱ्या ‘उमेद’ प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील अन्न प्रक्रिया उद्योगात महिलांना मोठे
व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. चार वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सीमा पाटील या प्रकल्पाशी जुळल्या. गहू, ज्वारी, बाजरी आणि मूग रोस्ट
करून त्या बाजारात विकतात. ‘उमेद’ प्रकल्प सुरु झाला तेव्हा १० महिला या कार्यक्रमाशी जुळल्या होत्या. आता हा
आकडा हजाराच्याही पुढे गेल्याचे त्या सांगतात. वर्ल्ड फूड इंडियातील महाराष्ट्र
दालनात त्यांना स्टॉल लावण्याची संधी मिळाली आणि या संधीचे सोने झाल्याचे समाधानच त्या व्यक्त करतात. गेल्या तीन दिवसांपासून या स्टॉलला
देश-विदेशातील उद्योजक व ग्राहक भेट देत असून आमच्या उद्योगाबाबत विचारणा
करतात. आमच्या कार्याचे कौतुकही ते करतात. आम्ही याठिकाणी रोस्टेड गहू, ज्वारी, बाजरी आणि मूग प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवले असून आमचा बराच माल विकला गेला
आहे.
राज्य
शासनाच्या माध्यमातून देशाच्या राजधानीत जागतिक प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने आपला उद्योग कुठे आहे आणि
त्याला आपण कशा पद्धतीने आणखी पुढे घेऊन जाऊ शकणार याबाबतचा दृष्टिकोन तयार झाला
असून माझ्यासाठी हा अनुभव खूप महत्वाचा असल्याचे श्रीमती पाटील सांगतात. ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजिवीका कार्यक्रमांतर्गत’ महाराष्ट्र दालनात राज्यातील बचतगटांना चार स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले
आहेत.
केंद्र
शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत ‘वर्धा मेगा फूड पार्क’ हा शेतमालासाठी शीतगृह उपलब्ध करून देणारा वर्धा जिल्ह्यातील कारंजा(घाडगे) तालुक्यातील शिंदी-विहिरी गावातील स्टॉलही याठिकाणी आहे. याविषयी फूड
पार्कचे आशिष अग्रवाल सांगतात, महाराष्ट्र
दालनातील आमच्या स्टॉलला देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांनी भेट दिली, हा अनुभव आमच्यासाठी खूप
महत्वाचा आहे. फूड पार्कविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले, शिंदी-विहीरी या वर्धा जिल्हेयातील दुर्गम भागात आम्ही वर्ष २०१२-१३ पासून
शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी शीतगृह उपलब्ध करून देत आहोत. या प्रकल्पासोबत
परिसरातील जवळपास एक हजार शेतकरी आणि शेत माल उत्पादित करणाऱ्या १२ कंपन्या जुळल्या आहेत. या प्रकल्पात ३००
कामगार आणि ५० कर्मचारी कार्यरत असून हे सर्व स्थानिक आहेत, म्हणजेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रकल्पाच्या परिसरातील
शेतकरी या प्रकल्पाचा लाभ घेत असून मोठ्या प्रमाणात शेतमाल परदेशात पाठविण्यात येतो. आतापर्यंत जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचा
लाभ घेतल्याचे ते सांगतात.
महाराष्ट्र
दालनात भेट देऊन नव्यानेच अन्न प्रक्रिया उद्योगात प्रवेश केलेले सांगलीचे विठ्ठल
चव्हाण उद्योजक व शासनाच्या
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्या उद्योगाच्या पुढील वाटचालीसाठी महत्वपूर्ण
माहिती जाणून घेतली, त्याचा आपणास खूप फायदा होणार असल्याचे ते सांगतात. श्री. चव्हाण यांनी दोन
महिन्याआधीच घाण्याच्या तेलाचा उद्योग सुरु केला आहे. वर्ल्ड फूड इंडिया या जागतिक
प्रदर्शनाला भेट देऊन येथून नवनवीन संकल्पना समजून घेण्यासाठी ते खास दिल्लीत आले.
महाराष्ट्र दालनातील भेटीत आपल्याला खूप नवनवीन गोष्टी समजल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले.
‘वर्ल्ड
फूड इंडिया २०१७’ चे उदघाटन प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राच्या वतीने याठिकाणी महाराष्ट्र दालन
उभारण्यात आले. कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते व
पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाशिव खोत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या
उपस्थितीत दालनाचे उदघाटन झाले. उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनीही या
प्रदर्शनाला व महाराष्ट्र दालनास भेट दिली. या मंत्रिमहोदयांच्या हस्ते राज्य
शासनाचे ‘अन्न प्रक्रिया उद्योग
धोरण २०१७’ ही या प्रदर्शनात जाहीर
करण्यात आले. याठिकाणी देश-विदेशातील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने राज्यात विविध उद्योग उभारण्याबाबत मंत्रिमहोदयांशी सकारात्मक चर्चा केली.
0000
No comments:
Post a Comment