● कर्ज देताना सामाजिक न्याय विभागाच्या निर्देशांची पूर्तता करावी
● एकदा दिलेल्या कर्जाची पुन्हा वाढीव दुरुस्ती करण्यात येवू नये
मुंबई, दि. १५ : राज्यातील सर्व सहकारी सूत गिरण्यांचे कामकाज पारदर्शक व्हावे, यासाठी भाग भांडवल असलेल्या सभासदांचे आधार लिंक करावे, असे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले.
श्री.स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी मर्यादित, इगतपुरी, जि.नाशिक या गिरणीच्या स्थापत्य बांधकामाच्या निविदांच्या अनुषंगाने सनियंत्रण समितीची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. श्री.देशमुख म्हणाले, सूत गिरणीमध्ये भाग भांडवल असलेल्या सभासदांचे आधार लिंक करण्यात यावे, वस्त्रोद्योग विभागामार्फत देण्यात येणारे कर्ज मिळवताना सामाजिक न्याय विभागाच्या निर्देशांची कंत्राटदाराने पूर्तता करावी, निधी खर्च करताना निश्चित केलेल्या टप्प्याप्रमाणेच करावा, अगोदर कर्ज पुरवठा केलेल्या सूत गिरणींच्या वाढीव कर्जाचा प्रस्ताव घेण्यात येवू नये, असे निर्देश श्री.देशमुख यांनी दिले.
श्री.स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी मर्यादित, इगतपुरी, जि.नाशिक या गिरणीच्या स्थापत्य बांधकामाच्या निविदांमध्ये रिलायन्ट बिल्टअप,सांगली यांची निविदा निवडण्यात आली आहे. त्यांनी, वस्त्रोद्योग विभाग आणि सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेल्या टप्प्यानुसार निधी खर्च करावा, सर्व निर्देशांचे पालन करावे,कामाच्या खर्चाचा वाढीव प्रस्ताव देणार नाही, असा लेखी प्रस्ताव वस्त्रोद्योग विभागाला द्यावा, असे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री श्री. देशमुख यांनी दिले.
०००

No comments:
Post a Comment