सहकारी सोसायट्या सक्षमीकरण कार्यशाळा 2017 उत्साहात संपन्न
सांगली,दि.17 : विविध कार्यकारी सहकारी संस्था या गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे गावातील प्रत्येक घटकाला या सोसायट्यांशी जोडून घ्या. सभासद वाढवा, ठेवी संकलन वाढवा आणि संस्थेचे सेवक म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून या सोसायट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या सक्षमीकरण कार्यशाळा 2017 मध्ये ते बोलत होते. खासदार संजय पाटील कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बापूसाहेब पुजारी, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्य शासनाने अटल महापणन अभियान, पीक कर्जमाफी या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पीककर्जमाफीपासून कुठलाही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देऊन सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शेतकऱ्याला मूलभूत सुविधा देण्यासाठी राज्य शासनाचे प्राधान्य आहे. मुबलक पाणी, वीज, शुद्ध बियाणे, रास्त भावात खते, कमी दराने पतपुरवठा, उत्पादनाला चांगला भाव, नाशवंत मालासाठी तारण कर्ज, सौरउर्जेवर वीजपंप व उपसा योजनेचे पंप या बाबींतून शेतकरी स्वयंपूर्ण होईल आणि त्याला कर्जमाफी मागावीच लागणार नाही, असे ते म्हणाले.
सहकार क्षेत्र समृद्ध झाले तरच महाराष्ट्र समृद्ध होणार आहे. त्यामुळे सहकारी क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. अशा सक्षमीकरण कार्यशाळांतून ते शक्य होईल, असे स्पष्ट करून सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सांगली जिल्हा हा सहकारपंढरी म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमिवर दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षात सांगली जिल्हा सहकार क्षेत्रात राज्यात नव्हे तर देशात अग्रेसर करण्याचा संकल्प करा. सांगली जिल्ह्यातील एकही खातेदार विविध कार्यकारी सोसायटीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करा. गावातील प्रत्येक खातेदाराला सोसायटीचा सभासद करून घ्या. सोसायट्यांचे अध्यक्ष आणि सचिव यांनी ही नैतिक जबाबदारी म्हणून सोसायट्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. सोसायट्यांबाबत प्रत्येक घटकाच्या मनात विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच, सोसायट्यांनी व्यवसाय उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.
खासदार संजय पाटील म्हणाले, प्रामाणिकपणे काम केल्यास सोसायट्या चांगल्या चालतील. त्याचबरोबर नवीन प्रयोग होणे गरजेचे आहे. नवउद्योग उभारून सोसायट्या आणि पर्यायाने शेतकरी समृद्ध करण्यासाठी राजकारणविरहित सर्वसमावेशक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या गावाच्या विकासाचा कणा आहेत. त्यामुळे या सोसायट्या सक्षम व्हायच्या असतील, तर पारदर्शक कारभार, व्यावसायिक प्रशिक्षण, संगणकीकरण, प्रभावी नियंत्रण, चांगल्या दर्जाची सेवा, वेळेत कर्जवसुली अशा अनेक बाबी महत्त्वाच्या ठरतात. या सर्व बाबींतून सोसायट्यांनी स्वयंपूर्ण व्हावे. त्यासाठी मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य शासन पाठिशी राहील.
यावेळी बँकेचे संचालक बी.के. पाटील, बाळासाहेब मगदूम (अंकलखोप), अशोक पाटील (नागठाणे), भास्कर पाटील (तुंग), सर्जेराव यादव (निगडी, ता.शिराळा),विश्वास पाटील (इस्लामपूर), डॉ.प्रताप पाटील (शिरगाव) या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी अनुभव कथन व मनोगत व्यक्त केले.
जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००

No comments:
Post a Comment