v
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक
अहिल्यादेवीचे नाव देण्याचा निर्णय
v
संवैधानिक बाबींची पूर्तता करणारा
वस्तुनिष्ठ अहवाल
नागपूर
दि. 05 : राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्यासंबंधी टाटा
समाज विज्ञन या संस्थेचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. संवैधानिक बाबींची
पूर्तता करणारा वस्तुनिष्ठ अहवाल टीसने तयार केला असून अहवाल प्राप्त होताच
तात्काळ अहवालाची छाननी करुन केंद्राकडे धनगर आरक्षणाची शिफारस राज्यशासन करेल,
असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सोलापूर विद्यापीठाला
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी
यावेळी सांगितले.
धनगर
समाजाच्यावतीने आयोजित धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय
गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री
प्रा.राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार विकास महात्मे, आमदार
तानाजी मुटकुळे, नारायण कुचे व धनगर समाजाचे विविध भागातील नेते यावेळी उपस्थित
होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी हा मेळावा
आयोजित केला होता.
कुठल्याही
समाजाला आरक्षण देण्यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल केंद्र सरकारकडे पाठवणे बंधनकारक आहे.
संविधानच्या तरतुदीत बसणारा हा अहवाल तयार करण्यासाठी राज्य शासनाने ‘टीस’ या संस्थेची नियुक्ती केली होती. या संस्थेने
धनगर समाजातील नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सादर केलेली प्रत्येक निवेदन स्विकारले.
वीस पेक्षा जास्त जिल्ह्यात प्रत्यक्ष जाऊन तसेच लाखो लोकांशी मिळून तथ्य संकलन
केले. यासोबतच आठ राज्यांना भेटी देऊन माहिती गोळा केली. धनगर समाजाचे वास्तव्य
असलेल्या घरांना भेटी दिल्या आणि अहवाल तयार केला. हा अहवाल धनगर समाजाबाबतचा
ऐतिहासिक दस्ताऐवज असणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘टीस’ने तयार केलेला अहवाल लेखनाचे काम सुरु असून या
कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. थोडा अवधी अवश्य लागत आहे. मात्र
आरक्षणासंबंधी आपली भुमिका प्रामाणिक असून धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या शब्दावर
आपण ठाम असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कुठलाही
धक्का न लावता हे आरक्षण दिले जाणार आहे. अहवाल लेखनाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण
होणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपली भूमिका प्रामाणिक आहे आणि
म्हणूनच ती आपण समाजासमोर मांडत आलो आहोत, असे ते म्हणाले.
सोलापूर
विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात
आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. महात्मा बस्वेश्वर व
सिद्धेश्वर यांचा शासन योग्य सन्मान करेल असेही ते म्हणाले. धनगर समाजातील
युवक-युवतींना आरक्षणासोबतच आर्थिक सक्षम करण्यासाठी वसतीगृह, शिष्यवृत्ती, शिक्षण
व स्पर्धा परीक्षा यासाठी धनगर समाज संघर्ष समितीचे खासदार डॉ. विकास महात्मे
यांनी योजना तयार करुन शासनाला द्याव्यात. शासन त्यास मान्यता देईल, असे
मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ना.हंसराज अहीर
धनगर समाजाचा
संघर्ष अनेक वर्षाचा असून या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने बैठक
घेऊन सकारात्मक विचार केल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी
सांगितले. आरक्षणासंबंधीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करुन राज्य शासनाने केंद्र
सरकारला अहवाल पाठविल्यावर ताबडतोब निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
आरक्षण आणि आर्थिक विकास या दोन्ही आघाडीवर समाज उन्नत व्हावा असे त्यांनी
सांगितले.
प्रा. राम शिंदे
धनगर
आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गंभीर असल्याचे सांगून जलसंधारण
मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री यांनी धनगर आरक्षणासंबंधी दिलेले
आश्वासन पूर्ण करण्याच्यादृष्टीने पावले टाकली आहेत. प्रस्तावाला अनुकूल दस्तावेज
तयार करण्याचे काम सुरु आहे. लवकरच केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविले जाईल, असे
त्यांनी सांगितले.
ना.महादेव जानकर
धनगर समाजाला
आरक्षण मिळण्यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता राज्य शासन योग्य प्रकारे करत
असल्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. केंद्र सरकार सोबतही या
विषयावर चर्चा झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात धनगर समाजाला
आरक्षण मिळेल अशी ग्वाही महादेव जानकर यांनी दिली.
खा.डॉ.विकास महात्मे
धनगर आरक्षण
निर्णायक मेळाव्याचे संयोजक डॉ. विकास महात्मे म्हणाले की, आरक्षणाचे शिफारस पत्र
केंद्राकडे पाठविणारे देवेंद्र फडणवीस हे गेल्या 70 वर्षातील पहिले मुख्यमंत्री
ठरणार आहेत. महाराष्ट्र शासन या बाबतीत अतिशय योग्य कार्यवाही करत असून धनगर
समाजाच्या बाजूने निर्णय घेतला जाईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे धनगर आरक्षणासंबंधी सकारात्मक व प्रामाणिक असून ‘टीस’चा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे ते तातडीने
शिफारस करतील. यासोबतच वसतीगृह, शिष्यवृत्ती, भटक्या विमुक्त्यांसाठी स्पर्धा
परीक्षा विशेष प्रशिक्षण संस्था, शेफर्ड कमिशनची स्थापना, मेंढपाळचे प्रश्न आदी
मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
कार्यक्रमाचे
संचलन डॉ. सुनिता महात्मे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुभाष लिंगाटे यांनी
मानले. या कार्यक्रमास धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****



No comments:
Post a Comment