- राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा
- प्रथम पारितोषिक मालाडच्या चिल्डन ॲकेडमीला
नागपूर दि. 10 : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया शाळेतच रचला जातो. शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार मूल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येचे उत्तर शिक्षण व विज्ञानातून प्राप्त होते, असे प्रतिपादन आमदार नागो गाणार यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय संस्कृती मंत्रालय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, नेहरु विज्ञान केंद्र वरळी, मुंबई, राज्य शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार नागो गाणार बोलत होते.
यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. मोहन खेडकर, डॉ. प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते.
विज्ञान व समाज या मुख्य विषयातंर्गत ‘स्वच्छ भारत – विज्ञान व तंत्रज्ञानाची भूमिका’, ‘नद्यांची स्वच्छता’, ‘डिजिटल इंडिया’, ‘हरित ऊर्जा’ या विषयावर आधारित महाराष्ट्रातील आठ शिक्षण विभागातील विजेत्या आठ नाट्य चमूंनी नाटकाचे सादरीकरण केले. स्पर्धेचे मूल्यांकन श्रीमती मृणालीनी आपटे, श्रीमती वंदना घांगुर्डे, श्रीमती सीमा गोडबोले यांनी केले. बक्षिस वितरण व समारोपीय कार्यक्रमात विजेत्या चमूला बक्षिस देवून गौरविण्यात आले.
यावेळी राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे माजी संचालक नारायण जोशी, नाट्य लेखक डॉ. रंजन दारव्हेकर, संचालक पाणीनी तेलंग, प्रो.राजेंद्र सिंह उपस्थित होते.
स्पर्धेत प्रथम क्रमांक चिल्डन ॲकेडमी, मालाड, मुंबई, द्वितीय क्रमांक श्रीमती सुलोचनाबाई कन्या शाळा, पाटण, सातारा, तृतीय क्रमांक महाराष्ट्र विद्यालय, खापरखेडा, नागपूर यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय उत्कृष्ट, दिग्दर्शक, लेखक, उत्कृष्ट नट व पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक संस्थेचे संचालक रविकांत देशपांडे, संचालन श्रीमती किर्ती पालटकर यांनी तर आभार श्रीमती प्रतिभा गोहणे यांनी मानले.
*****
No comments:
Post a Comment