दुसऱ्या
ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
नागपूर, दि. 1 : एज्युकेशन हब, मेडीकल हब, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मिहान अशी नागपूर शहराची मेट्रो आणि झपाट्याने
विकसित होत असलेले शहर म्हणून ओळख बनत असली तरी यासोबतच नागपूर हे सांस्कृतिक शहर
बनविण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुयात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी केले. ते दुसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या
उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, उपायुक्त रविंद्र
देवतळे, प्रसिध्द चित्रपट निर्माते डॉ. जब्बार पटेल, अदूर गोपालकृष्णन, संगीतकार राम- लक्ष्मण (विजय पाटील), नाटककार महेश एलकुंचवार, कुलगुरु डॉ.
सिध्दार्थविनायक काणे, रजिस्ट्रार पुरणचंद मेश्राम, समर नखाते यांच्यासह
चित्रपटसृष्टीतील विविध मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा दिल्याचे उपस्थितांना
सांगितले.
पुढे बोलताना
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, 4 फेब्रवारीपर्यंत चालणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून,
नागपूरमध्ये या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
तसेच मुंबई आणि पुण्यानंतर नागपूरही सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओळखले गेले
पाहिजे, असे सांगितले. जानेवारी महिन्यात खासदार महोत्सव आयोजनाच्या निमित्ताने
येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांना
चांगलीच मेजवानी मिळाली. तसेच कालिदास महोत्सवातील दुसऱ्या टप्प्यातील
कार्यक्रमाचाही जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद घेतला. आता दुसऱ्या ऑरेंज सिटी
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ही संधी मिळाली आहे,
असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
मराठी आणि
हिंदी चित्रपटसृष्टीत एक अमिट छाप सोडणारे प्रसिध्द राम –लक्ष्मण जोडीपैकी लक्ष्मण
म्हणजे विजय पाटील हे नागपूरकर असून, त्यांचे खूप मोठे योगदान आहे. संपूर्ण देश
यांनी निर्माण केलेल्या संगीतावर आजही जितके प्रेम करतो आणि तितकेच भविष्यात प्रेम
करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चित्रपट निर्माते अदूर गोपालकृष्णन आणि विजय
पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. जब्बार पटेल यांनी भारतीय
चित्रपटसृष्टीच्या मूकपट, कृष्णधवल ते रंगीत आणि आता डिजीटल प्रवासावर आपल्या
मनोगतातून प्रकाश टाकला.
महाराष्ट्र ही माझी भूमी - अदूर गोपालकृष्णन
प्रसिध्द
निर्माते अदूर गोपालकृष्णन यांनीही त्यांच्या केरळातील चित्रपटसृष्टीबद्दल मनोगत
सांगताना ते अपघातानेच चित्रपटसृय्टीत आल्याचे सांगत महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी
असल्याचे सांगितले. तसेच मराठी आणि बॉलिवूडमधील विविध दिग्गजांसोबतच्या जुन्या
आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमात कुलगुरु
डॉ. सिध्दार्थविनायक काणे यांनी नागपूर विद्यापीठातही चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम
सुरु करण्याचा विद्यापीठ विचार करत असल्याचे सांगून डॉ. जब्बार पटेल हे क्रियाशील,
नाविन्याला प्राधान्य देणारे भारतीय चित्रपटसृष्टीतील अर्जुन असल्याचे सांगितले.
4 फेब्रुवारीपर्यंत
चालणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पीव्हीआर एम्प्रेस मॉल येथे
चित्रपट दाखवण्यिात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंद्रशेखर मेश्राम
यांनी केले. तर आभार विजय गुप्ते यांनी मानले.
No comments:
Post a Comment