Monday, 26 February 2018

पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतला विविध विषयांचा आढावा


नागपूर, दि. 26 : शहरातील विविध आरक्षित जमिनीवर वसलेल्या झोपडपट्ट्यांचे स्थानांतरण करताना तेथील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यापूर्वी निकषास अनुसरून त्यांचे पूनर्वसन करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. 
   रविभवन येथे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयाची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, माजी आमदार देवराव रडके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आरक्षित जमिनीवरील झोपडपट्ट्या हटवून त्यांचे अन्य जागी स्थालांतरण करताना झोपडपट्टीवासियांना हक्काचा निवारा देता यावा यासाठी या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सामिल करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सध्या स्थितीत शहरातील जवळपास विविध विभागाच्या आरक्षित जमीनीवर 33 झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. या झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी नारी येथील जमिनीवर घरे बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. योजनेस पात्र नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेत सामिल केल्यास 2 लाख 50 हजार रुपयाची मदत मिळेल. याशिवाय लाभार्थ्यांना अमृत योजनेतंर्गत अनुदान मंजूर झाल्यास 2 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. त्यामुळे नारी येथे तयार होणाऱ्या घराचा लाभ देतांना झोपडपट्टीवासियांना शासकीय योजनांचा लाभ देता यावा याकरिता प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
मौजा इसासनी येथील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेस मिहान प्रकल्पातंर्गत, मौजे गोधनी येथील योजनेस महानगरपालिका तसेच डिगडोह येथील पाणी पुरवठा योजनेस वेणा नदीतून पाणी आरक्षीत करून उपलब्ध करुन देण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.
हिंगणा तालुक्यातील लाव्हा येथील मुख्य रस्ता व खुल्या जागेवर सुरक्षा भिंत बांधकामास जिल्हा नियोजन योजनेतून 13 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथील नागरिकांना लवकरात लवकर दिलासा द्यावा, अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.
****

No comments:

Post a Comment