* 10 हजार रुग्णांवर विविध शस्त्रक्रियाचे नियोजन
* शिबीरात येणारा प्रत्येक रुग्ण आनंदी होऊनच जाईल
* स्वयंसेवकांनी नागरिकांना सहकार्य करावे
* मुंबईसह राज्यातून 750 डॉक्टरांच्या सेवा
* तपासणीसाठी 80 ओपीडी
नागपूर, दि 27 : अटल
आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू रुग्णांना औषधोपचारासह
आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात
येणार आहेत. या आरोग्य शिबीरामध्ये सुमारे 55 हजार रुग्णांची तपासणी करुन आवश्यक
वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकिय शिक्षण मंत्री
गिरीश महाजन यांनी दिली.
सेंट्रल
बाजार रोड वरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात अटल आरोग्य
शिबीराच्या आयोजनाचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला.
त्याप्रसंगी शिबीरासाठीचे स्वयंसेवक, विविध समित्यांच्या प्रमुखांना मार्गदर्शन
करतांना ते बोलत होते.
यावेळी
लघू उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, महाराष्ट्र राज्य ईमारत बांधकाम
कामगार मंडळाचे मुन्ना यादव, आरोग्य महाशिबीराचे आयोजक तथा विशेष कार्य अधिकारी
रामेश्वर नाईक, आरोग्य मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, समन्वय समिती
प्रमुख प्रा. राजू हडप आदी अधिकारी व महानगरपालिकेचे सभापती, नगरसेवक आदी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
आरोग्य
महाशिबीरास येणारा प्रत्येक रुग्ण व नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्याची
व्यवस्था करण्यात आली असून येथे येणारा प्रत्येक रुग्ण आनंदी होऊन जाईल त्यांना
शिबीरामध्ये कसलाही त्रास होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी स्वयंसेवक व समितीच्या
सर्व सदस्यांनी घेण्याची सूचना करतांना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन
म्हणाले की, 34 हजार नागरिकांची पूर्व तपासणी करण्यात आली असून त्या सर्व रुग्णांची
राज्यातील नामांकित डॉक्टरांमार्फत शिबीरात तपासणी झाल्यानंतर नागपूर येथेच सर्व
शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई व पुण्यासह
सर्व तज्ज्ञ डॉक्टर नागपूरला येऊन नि:शुल्क शस्त्रक्रिया करतील. शिबीरामध्ये
सुमारे 10 हजार रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले
असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य
शिबीरासाठी येणाऱ्या गरीब व गरजू सर्व रुग्णांना नि:शुल्क भोजन व पिण्याच्या
पाण्याची सुविधा करण्यात आली असून सर्व रुग्णांना औषध व आवश्यक साहित्य पूरविण्यात
येणार आहेत. आरोग्य शिबीरामध्ये प्रारंभी रुग्णांची नोंदणी झाल्यानंतर त्यांची
तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करतील. त्यानंतर आवश्यकतेनुसार औषध, एमआरआय, सीटीस्कॅन,
रक्ताच्या तपासण्या, शस्त्रक्रिया व आवश्यकतेनुसार यंत्रांची उपलब्धता करण्यात
येईल. यासाठी रुग्णांच्या नोंदणीनुसार 1 तारखेनंतर तज्ज्ञ डॉक्टर उपचारासंदर्भात
संपूर्ण माहिती देऊन शस्त्रक्रिया व उपचार पूर्ण होईल.
अटल
आरोग्य महाशिबीरासंदर्भात सांगतांना गिरीश महाजन म्हणाले की, संपूर्ण शिबीरामध्ये
विविध पॅथीचे 750 डॉक्टर राहणार असून 80 ओपीडी मार्फत तपासणी करण्यात येईल. सर्व रुग्णांची
तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तपासणीशिवाय एकही रुग्ण येथून परत
जाणार नाही. यांची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. त्यानुसार 6 ठिकाणी स्वतंत्र
व्यवस्था असून येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मार्गदर्शनही करण्यात येईल. या
शिबीरासाठी रुग्णांना आवश्यकतेनुसार आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या
शिबीरामध्ये गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया, कर्करोग, हृदयरोग, मुकबधीर मुलांना
टॉपलर इन प्लान्ट आदी अत्यंत खर्चिक असलेल्या सर्व शस्त्रक्रिया नि:शुल्क करण्यात
आल्या आहेत. तसेच दंत चिकित्सा व शस्त्रक्रियेसाठी चार मोबाईल व्हॅन असून
महिलांच्या कर्करोग तपासणीसाठी सुद्धा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. ह्या आरोग्य
शिबीराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री
गिरीश महाजन यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता उद्घाटन
अटल आरोग्य महाशिबीराचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार, दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी
9 वाजता होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री
नितीन गडकरी राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकिय शिक्षण मंत्री
गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार तसेच खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी
उपस्थित राहणार आहेत.
आरोग्य महाशिबीर सकाळी 9 ते
दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहणार असून या शिबीरामध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा
मतदार संघातील नागरिकांची तसेच गरीब व गरजू रुग्णांची विनामुल्य तपासणी करण्यात
येणार आहे. शिबीरादरम्यान नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, जनरल सर्जरी, मेंदू
रोग, बालरोग, मुत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, कर्करोग,
दंतरोग, जनरल मेडीसीन, क्षयरोग, लट्ठपणा, मानसिक आरोग्य, जेनेटिक विकार, आयुष
इत्यादी महत्वाच्या आजाराची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.
प्रारंभी लघू उद्योग विकास
महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी व विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक यांनी आरोग्य
शिबीराच्या व्यवस्थेसंदर्भात तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सूविधांच्या
व्यवस्थेसंदर्भात स्वयंसेवक व विविध समित्यांच्या सदस्यांना मार्गदर्शन केले.
शिबीरामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मार्गदर्शन करणे तसेच कुठलीही अडचण
येणार नाही याची दक्षता घेतानाच त्यांचे संपूर्ण समाधान होईपर्यंत सहकार्य करावे,
अशा सूचनाही यावेळी सर्व समन्वयकांना देण्यात आल्या.
*****




No comments:
Post a Comment