Saturday, 27 October 2018

दुष्काळसदृष्य तालुक्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा - चंद्रशेखर बावनकुळे






* दुष्काळसदृष्य तालुक्यांची पालकमंत्र्यांनी केली पाहणी
नागपूर, दि 27 : केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे राज्य शासनाने घोषित केलेल्या दुष्काळसदृष्य तालुक्यात नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील पीक परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याने तीन तालुक्यातील पिकांच्या सर्वेक्षणाचे वस्तुनिष्ठ अहवाल कृषी तसेच महसूल विभागाने सादर करुन शासनाने घोषित सुविधांचा परिसरातील नागरिकांना लाभ देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
 जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर या दुष्काळसदृष्य तालुक्यांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पाहणी केली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी तसेच गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, आमदार गिरीश व्यास, उपजिल्हाधिकारी श्रीमती सुजाता गंधे, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, कृषी सहायक विलास भिसे, उपविभागीय अधिकारी श्रीमती वर्षाराणी भोसले, उंबरकर, तहसीलदार हंसा मोहने यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खरीप हंगामात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने 180 तालुक्यांची दुष्काळसदृष्य परिस्थितीची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश असला तरी महसूल तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अन्य 11 तालुक्यातील पिकांची पाहणी करुन सर्वेक्षण अहवाल तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  
ट्रिगर टु मध्ये समाविष्ट काटोल, नरखेड, कळमेश्वर तालुक्यातील नागरिकांना शासनाने घोषित केल्याप्रमाणे आठ विविध सवलतीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये जमीन महसुलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33.5 टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी समावेश आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासंबंधी पालकमंत्री यांनी सूचना दिल्यात.   
नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर, काटोल तसेच नरखेड तालुक्यात कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. या पिकांमध्ये कापसाच्या शेतीचे प्रमाण अधिक आहे. परंतू निसर्गाचा लहरीपणा तसेच अनियमित व अपूऱ्या पावसामुळे कपाशीच्या पिकाला ओलावा निर्माण करण्यायोग्य पाणी उपलब्ध न झाल्याने कपाशीचे पिक आता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी दिली. यावेळी त्यांनी पिकांची तसेच शेतकऱ्यांची पालकमंत्री यांना विस्तृत माहिती दिली.   

शेतकऱ्यांच्या शिवारांना पालकमंत्र्यांच्या भेटी
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य तीन तालुक्यातील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन विविध शेतकऱ्यांच्या शिवाराची पाहणी केली. यामध्ये कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव खुर्द गावातील शालीक दमडू शास्त्री, रामाजी श्रीपंत वानखडे, तोंडाखैरी गावातील ललनबाबू बाकेलाल दिक्षीत, जिजाबाई पुरुषोत्तम ठाकरे, पारडी देशमुख गावातील श्री. पारस, गजानन आत्माराम भागवत, काटोल तालुक्यातील सोनखांब गावातील बळीराम नारायण ताजणे, ताराबोडी येथील सुधाकर ठोमरे चिखली मैना गावातील भास्कर मुलताईकर तसेच नरखेड तालुक्यातील शेबंडा, अंबाडा देशमुख, मसोरा गावातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. लवकरच नागपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये केंद्र शासनाचे पथक येऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी करणार असून त्यानुसार केंद्र शासनाच्या वतीने दुष्काळाशी निगडित मदत जाहीर करणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
*****

No comments:

Post a Comment