* नागपूर
ग्रंथोत्सव 2018
नागपूर, दि. 21 : आजघडीला महात्मा गांधी विचारांची नितांत गरज
आहे. गांधींच्या विचारांनी बलस्थाने मजबूत होतात, असे विचार महाराष्ट्र राज्य
ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह डॉ. गजानन कोटेवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई
आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने वसंतराव नाईक शासकीय कला व समाज
विज्ञान संस्थेत नागपूर ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘21व्या शतकातील आव्हाने आणि गांधी विचारांची आवश्यकता
या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून
बोलत होते.
कार्यक्रमाला नई तालीम समिती सेवाग्राम आश्रमाचे पूर्व मंत्री अनिल फरसोले,
माहिती जनसंपर्क विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती शैलजा वाघ-दांदळे, सहाय्यक
ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे, गजानन कुरवाडे यांची उपस्थिती होती. पुढे
बोलतांना कोटेवार म्हणाले की, गांधी विचारांमध्ये परिवर्तनाचे सामर्थ्य आहे. गांधी हा विचार नसून परिवर्तन घडविण्याची ताकत आहे. आजच्या तरुण
पिढीमध्ये अविचारी भावनांचा कल्लोळ दिसून येतो. अशा भरकटलेल्या तरुण पिढीने गांधी
विचार आत्मसात केले तर परिवर्तन होऊन नेतृत्व सक्षम पिढी तयार होईल. समाजामध्ये
गरीब-श्रीमंत अशी विषमता निर्माण झाली आहे. या विषमतेला शमविण्याची ताकद गांधी
विचारांमध्ये आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पुस्तकांमध्ये गांधी विचार अजूनही जिवंत आहेत. पुस्तकांनी गांधींच्या
विचारांना गती दिली. यामुळे गांधी एक व्यक्ती नसून एक विचार आहे या विचारांचे
प्रत्येकाने आत्मबोधन करावे. 21व्या शतकात पर्यावरणामध्ये फार मोठे बदल होऊ लागले
आहे. पर्यावरण सुदृढ राहीले तरच देश अबाधित राहील.यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाचे
संवर्धन करणे गरजेचे आहे. जागतिक स्थरावर फार मोठे बदल करण्यात येत आहे. परंतु हे
बदल करीत असतांना पर्यावरणाचा कोठेही विचार होतांना दिसत नाही. दिल्ली सारख्या शहरांमध्ये मनुष्याला मोकळा श्वास घेणेही
कठीण झाले आहे. यामुळे पर्यावरण समतोल राखणे
गरजेचे असल्याचे विचार अनिल फरसोले यांनी व्यक्त केले.
शैलजा
वाघ म्हणाल्या की मुल्यांमधून विचार जन्माला येतात आणि विचारांमधून शब्द तयार
होतात. गांधींचे विचार हे मनुष्याला
प्रेरणादायी ठरणार आहेत. गांधी ही व्यक्ती नाही तर विचार आहे. विचार ही निरंतर
चालणारी प्रक्रिया आहे. दिडशे वर्षापूर्वी गांधीजींनी खेड्यांकडे चला असा संदेश
दिला होता. परंतु शहरीकरणाला अधिक महत्व आल्याने खेडी ओस पडू लागली आहे. आजच्या
शिक्षण पध्दतीमध्ये रोजगारभिमूख शिक्षण मिळणे आवश्यक आहे. तरुण पिढीला स्वावलंबनाकडे
नेणारे शिक्षण मिळाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक गजानन कुरवाडे यांनी केले तर संचालन व आभार उत्तेश्वर सुरवसे यांनी
केले.
*****
No comments:
Post a Comment