ग्रथदिंडीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
· नागपूर ग्रंथोत्सव 2018 चे उद्घाटन
नागपूर, दि. 20 : संगणकीय युगात मुलांमध्ये वाचनाची आवड कमी होत आहे. सोशल मिडियाचे प्राबल्य वाढलेले आहे. वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. यामुळे वाचन संस्कृतीचे संवर्धन होणे काळाची गरज आहे, असे मत वसंतराव नाईक शासकीय विज्ञान व समाज विज्ञान संस्थेच्या अध्यक्षा, श्रीमती डॉ. सुनेत्रा महाराज (पाटील) यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत नागपूर ग्रंथोत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.
यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ मुंबईचे माजी अध्यक्ष अनिल बोरगमवार, ग्रंथालय सहाय्यक संचालक मिनाक्षी कांबळे, गजानन कुरवाडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. सुनेत्रा महाराज म्हणाल्या, शालेय जीवनापासूनच वाचन संस्कार मुलांवर झाले पाहिजे. यामुळे वाचनाची आवड निर्माण होईल व शालेयजीवनातील संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात. यामुळे वाचक चळवळीचे बळकटीकरण झाले तरच ही चळवळ व्यापक होईल. ग्रंथालय चळवळ ही लोप पावत असली तरी ग्रंथांचे महत्च कधीच कमी होणार नाही. ग्रंथांचा प्रसार व्हावा यासाठी पालकांनी विशेष लक्ष द्यावे, यामुळे भविष्यात चांगली पिढी तयार होईल. असे त्या म्हणाल्या.
ग्रंथ हे गुरु आहे. ग्रंथापासून नवीन पिढी ही दुरावत चालली आहे. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची जबाबदारी ही शिक्षकाची आणि पालकांची आहे. वाचनामुळे भाषेची समृध्दी वाढते, ज्ञान वाढते. यामुळे तरुण पिढीने इंटरनेट बरोबर पुस्तकीय ज्ञान आत्मसात केले पाहिजे. असे मत महापौर नंदाताई जिचकार यांनी व्यक्त केले.
अनिल बोरगमवर म्हणाले, वाचकांना आकर्षित करण्यासाठी ग्रंथालयांनी विविध उपक्रम राबवावे. मिळालेल्या अनुदानाचा सदुपयोग करुन ग्रंथालय चळवळीबाबत चांगले मत तयार करण्याचे आवाहन यावेळी केले.
ग्रामीण आणि शहरी भागामध्ये वाचनाची आवड कमी होत आहे. वाचकांना एकाच ठिकाणी ग्रंथ उपलब्ध झाले तर वाचक चळवळ बळकट होईल. शासनाच्या वतीने 15 ऑक्टोबर हा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचक दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला. परंतु दर्जेदार वाचक तयार झाले तरच वाचन संस्कृती टिकून राहील. असे मार्गदर्शन करताना मिनाक्षी कांबळे म्हणाल्या
नियोजन विभागाच्या वतीने 14 तालुक्यात ग्रंथालय स्थापन करण्यात आले. तसेच शासनाच्या वतीने चंद्रपूर येथे बाबा आमटे अभ्यासिका सुरु करण्यात आली. स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेत आहे.
प्रास्ताविकातून गजानन कुरवाडे म्हणाले की, ग्रंथालयातून मिळणारी ऊर्जा आणि आनंद जीवनाचा भाग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार वृषाली देशपांडे यांनी केले.
ग्रंथदिंडीने वेधले लक्ष
नागपूर ग्रंथोत्सवाच्या सुरुवातीला सेवा सदन हायस्कूल सीताबर्डी येथे ग्रंथ पूजन करुन ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी सहाय्यक संचालक मिनाक्षी कांबळे, ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे, यांनी ग्रंथपुजन केले. ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, पंडित नेहरु आदिची वेशभूषा करुन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. झाशी राणी चौक, मॉरेस कॉलेज टी पॉईंट, झिरो माईल, संविधान चौक या मार्गाने ग्रंथदिंडी वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत पोहचली.
*****
No comments:
Post a Comment