Wednesday, 30 January 2019

ग्रामीण पर्यटन विकास कामांना गती द्या - ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे


मुंबई, दि. ३० : कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये पर्यटनाला चालना देणाऱ्या व त्या माध्यमातून गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज बैठक घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण पर्यटन विकासाचे ७४ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते. या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला ९ कोटी ७६ लाख निधी मंजूर करण्यात आला असून त्यापकी ५ कोटी ९८ लाख निधी खर्च झाला आहे. तसेच आंबोली, तारकर्ली, शिवापूर, रांगणागड म्हणजेच उत्तरेकडील भागात अधिक चांगली पर्यटन विकास कामे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आमदार सर्वश्री मनोहर भोईर, उदय सामंत, वैभव नाईक, राजन साळवी, भरतशेट गोगावले, सुभाष भोईर, रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000



No comments:

Post a Comment