Wednesday, 30 January 2019

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात ग्रामविद्युत व्यवस्थापकांची भरती तत्काळ करावी - ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे


पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकारातून मंत्रालयात बैठक
मुंबई, दि. 30 : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात आयटीआय झालेल्या सुमारे 1 हजार ग्रामविद्युत व्यवस्थापकांची भरती तत्काळ करावी. तसेच धुळे जिल्ह्यातील लांडोर बंगला, सोनगीर, थाळनेर आणि ललिंग किल्ल्यांचे विद्युतीकरण करण्याचे आदेश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
         धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वीज प्रश्नांसाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकारातून मंगळवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी बावनकुळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
            नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा या नगरपालिकांच्या वीज यंत्रणा मेडामार्फत सौर ऊर्जेवर करण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. शिवाय या तीनही नगरपालिका हद्दीतील विद्युत वाहिन्या अंडर ग्राउंड करण्याचे निर्देश देण्यात आले.
            बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि नरेगाच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यात दीड हजारपेक्षा अधिक विहिरी बांधल्या गेल्या आहेत. दुष्काळ परिस्थितीत या विहिरी जीवनदायिनी ठरणार आहेत. या सर्व विहिरींना सौर पम्पद्वारे वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. अडीच लाख रुपयांचा हा पम्प आदिवासींना योजनेअंतर्गत अवघ्या 10 हजार रुपयात मिळणार आहे. खासगीच नव्हे तर सार्वजनिक नळ योजना, 22 उपसा जलसिंचन योजनासुद्धा सौर ऊर्जेवर आणा, असे ऊर्जा मंत्री यांनी निर्देशीत केले.
शेतकऱ्यांना वीज पुरवठा मिळवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 45 कोटी रुपयांचा निधी मंत्री जयकुमार रावल यांनी जाहीर केला होता. त्यापैकी 25 कोटी रुपयांचा निधी वितरितही करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत 10 केव्हिएचे नवापूर (990) सह नंदुरबार जिल्ह्यातील 1 हजार 488 रोहित्रांचे काम केले जाणार आहे. त्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले आहेत.
बैठकीसाठी मंत्री जयकुमार रावल, ज्येष्ठ लोकप्रतिनिधी सरूपसिंग नाईक, मुन्नादादा रावल आदी मंत्रालयात उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.
ठळक मुद्दे - 
- धुळे नंदुरबार जिल्ह्यातील वीज प्रश्न मार्गी लागणार..
- दुसाने-शिंदखेडा-चिमठाणे-मालपूर-नरडाना-बेटावद येथे मुख्यमंत्री कृषी सौरवाहिनी योजना कार्यान्वित करणार.
- विद्युत अपघातग्रस्त झालेल्या नागरिकांना तत्काळ मदत केली जाणार
- प्रकाशा बुराई उपसा विद्युत जलसिंचन योजनेअंतर्गत अतिरिक्त वीज उपलब्ध केली जाणार
- या योजनेसाठी एक्सप्रेस फिडर घेतले जातील.  म्हणजे लोड शेडिंगचा त्रास होणार नाही.
- तोरणमाळ दुर्गम भागात वीज नसेल त्या घरांना वाडी पाडा सौर पम्प माध्यमातून वीज उपलब्ध करून देणार
- धडगाव सिव्हिलला एक्सप्रेस फिडरसाठी 29 लाख रुपये डिपीडिसीमधून मंजूर केले. एक्सरे मशीन सुरू होणार.
- नवापूर अक्कलकूवा येथे 132 केव्हीचे नवीन उपकेंद्र आदिवासी निधीतून प्रस्तावित
- अपघात प्रवण क्षेत्राच्या तारा भूमिगत करण्यासंदर्भात पाहणी करणार
- सारंगखेडा यात्रेवरून जाणारे हाय टेन्शन टॉवरच्या तारा काढायच्या कामाचे निविदा काढणार
- नवापूर ते आमलान सिद्धीप्रिया इको टेक्सटाईलसाठी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर मंजुरी
- नवापूर 132 केव्हीचे नवीन उपकेंद्र होणार
- निमगुळ सबस्टेशनला 5केव्ही ट्रान्सफॉर्मर लावणार
- अक्कलकूवा येथे नवीन 132 केव्ही उपकेंद्र मंजुरी
००००




No comments:

Post a Comment