कुष्ठरुग्णांचे प्रमाण
शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न
मुंबई, दि. 30 :
जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त आजपासून राज्यभरात जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात
येत आहे. त्यानिमित्त जिल्हास्तरावर प्रभात फेरी, प्रश्नमंजुषा,
पथनाट्य आदी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कुष्ठरोगाविषयी जाणीव
जागृती केली जाणार आहे. केंद्र शासनाने कुष्ठरोग्यांचे प्रमाण दर दहा हजारी
एकपेक्षा खाली आणण्याचे उद्दिष्ट दिले असून डिसेंबर 2018 अखेरीस हे प्रमाण 0.96
टक्के कमी झाले आहे. गेल्या वर्षी राज्यात राबविलेल्या कुष्ठरोग शोध अभियानात 12
हजार 415 नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले आहे, अशी माहिती
आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
जागतिक कुष्ठरोग
दिनानिमित्त या संदर्भात केलेल्या
उपाययोजनांबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षी सप्टेंबर
महिन्यात कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात आले. राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये
ही मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत सुमारे साडेसात कोटी लोकांची तपासणी करण्यात
आली. त्यामध्ये 12 हजार 415 नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले. पालघर, रायगड, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मुलांमध्ये
कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. तर गडचिरोली, चंद्रपूर,
नंदुरबार, पालघर, धुळे,
रायगड, जळगाव, नागपूर,
नाशिक, अमरावती या जिल्ह्यांमध्ये 500 हून
अधिक कुष्ठरुग्ण आढळून आले आहे. नवीन आढळून आलेल्या कुष्ठरुग्णांपैकी 9 हजार 690
रुग्णांनी औषधोपचार पूर्ण केला आहे.
राज्य
शासनामार्फत कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम राबविला जातो. शालेय विद्यार्थ्यांच्या
प्रभातफेऱ्या, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, आरोग्य मेळावे, लोककलांच्या माध्यमातून
कुष्ठरोगाबाबत जाणीव जागृती केली जाते. नुकत्याच साजऱ्या करण्यात आलेल्या
प्रजासत्ताक दिनी राज्यातील 22 हजार
ग्रामपंचायतींमध्ये ‘स्पर्श’अभियानांतर्गत
विशेष ग्रामसभा घेऊन कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यात आली.
केंद्र शासनाने राज्याला
कुष्ठरुग्णांचे प्रमाण दर दहा हजारी एकपेक्षा खाली आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले
असून डिसेंबर 2018 अखेरीस हे प्रमाण 0.96 टक्के इतके कमी करण्यात आले आहे. आरोग्य
विभागामार्फत कुष्ठरुग्णांसाठी वैद्यकीय पुनर्वसन योजना राबविण्यात येत असून पात्र
रुग्णावर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर कुष्ठरुग्णांचे आर्थिक
आणि सामाजिक पुनर्वसनाच्या योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जातात.
राज्यातील कुष्ठरोगाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील, असे
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment