Monday, 25 February 2019

राष्ट्रीय व्हायरल हेपेटायटीस नियंत्रण कार्यक्रमाद्वारे हेपेटायटीस निर्मूलनाचे ध्येय - आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे


व्हायरल हेपेटायटीस निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा

मुंबई, दि. 25 : देशातील व्हायरल हेपेटायटीस निर्मूलन कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्यात आला असून या कार्यक्रमाचा राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि जेष्ठ सिने अभिनेते तसेच व्हायरल हेपेटायटीस निर्मूलन कार्यक्रमाचे सदिच्छादूत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय व्हायरल हेपेटाइटिस नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हेपेटायटीसच्या निर्मूलनाचे ध्येय नक्की साध्य करू अशी खात्री सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी व्यक्त केली.
मुंबई येथील हॉटेल जे डब्यु मॅरिएट येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव विकास शील, राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
व्हायरल हेपेटायटीस निर्मूलनासाठी देशभरातील तज्ज्ञांकडून राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या मध्ये २०३० पर्यंत हेपेटायटीस निर्मूलनाचे कालबद्ध उद्द‍िष्ट समोर ठेवण्यात आले असून ते साध्य करण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाने  योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट आपण लवकरच साध्य करू, असा विश्वास मंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
आयुष्यामान भारत अंतर्गत राज्यात १५१ हून अधिक आरोग्यवर्धिनी केंद्रांची स्थापना करण्यात आली असून आगामी वर्षात १२ हजार हुन अधिक  प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांचे नूनतीकरण करण्यात येईल असेही त्यांनी या वेळी सांगितले.
हेपेटायटीसशी लढा देण्याचा सहकुटूंब संकल्प करा - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे
हेपेटायटीसशी लढा देण्याचा आज आपण संकल्प करत आहोत. येथे उपस्थित असलेल्या शेकडो लोकांच्या माध्यमातून हा संकल्प लाखो लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. हेपेटायटीसशी लढा देण्यासाठी सहकुटूंब संकल्प करा असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे या वेळी म्हणाले. समाजाला आणि देशाला आपले योगदान देण्यासाठी आपले आरोग्य सक्षम असणे गरजेचे आहे. नॅशनल अॅक्शन प्लॅन - व्हायरल हेपेटायटीस हा कार्यक्रम केंद्रीय मंत्रालयाद्वारे जुलै २०१८ मध्ये सुरू करण्यात आला आहे. भारतातील हेपेटायटीसच्या  प्रभावी उपचारांसाठी आवश्यक असे विकेंद्रीकृत आरोग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. डॉक्टर, तज्ज्ञ आणि राज्य शासनाच्या समनव्याने एकीकृत योजनेची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे हेपेटायटीसच्या निर्मूलनाचा कार्यक्रम नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेपेटायटीसचे निदान व प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे आवश्यक - अमिताभ बच्चन
मी येथे आहे कारण मी देखील हेपेटायटीस बी चा बळी पडलो आहे. कुली चित्रपटासाठी शूटिंग करताना, मी जखमी झालो त्यावेळी मला भरपूर रक्ताची गरज पडली होती. मला २०० रक्तदात्यांनी दिलेल्या रक्तामुळे माझे आयुष्य वाचले परंतु त्या दोनशे जणांपैकी एकाला हेपटायटीस बी ची लागण झाली होती. त्यामुळे मला देखील हेपेटायटीस बी ची लागण झाली. माझ्या शरीरातील हेपेटायटीस बी चे निदान २००५ मध्ये झाले. परंतु तोपर्यंत माझे ७५ टक्के यकृत निकामी झाले होते. मी हेपेटायटीस बी चे जिवंत उदाहरण आहे. आम्ही पोलिओविरूद्ध समान मोहीम केली होती आणि भारत आता पोलिओ-मुक्त आहे.
या आजारांवर वेळेवर उपचार मिळाले तर रुग्ण बरा होऊ शकतो. या रोगांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेकडे आपण खूप लक्ष दिले पाहिजे; कारण अशा रोगांचे वेळेवर निदान झाल्या उपचाराअंती रुग्ण बरा होऊ शकतो, असे श्री. बच्चन या वेळी म्हणाले.

हेपेटायटीस बी ची कोणत्याही बालकाला लागण होऊ नये म्हणून  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण सुद्धा करण्यात येते. हेपटायटीस बी विरुद्ध आरोग्य सेवा कर्मचारी आणि उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
हेपेटायटीस बी आणि हेपेटायटीस सी चे व्यवस्थापन
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हेपटायटीस बी आणि हेपेटायटीस सी चे व्यवस्थापन करणारे आणि लाभार्थ्यांना मोफत निदान आणि औषधोपचार पुरविणारा भारत हा जगातील काही देशांपैकी एक देश आहे. आरोग्य सेवांचा प्रचार, प्रतिबंधक आणि उपचारात्मक योजनांसोबत समन्वय आणि राष्ट्रीय कार्यक्रमाच्या सहकार्याने भारताचे निर्धारित ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल.
हेपेटायटीस बी चे निदान आणि व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. बहुतांश देशांमध्ये हेपेटायटीस बी च्या लसीकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. भारतात जवळजवळ एक दशकापूर्वी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत हेपेटायटीस बी ची लस आणली गेली. या कार्यक्रमांतर्गत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्भार मातेला लस देण्यासाठी विशेष लक्ष्य केंद्रित केले जात आहे.
००००



No comments:

Post a Comment