नागपूर, दि. 5: रामटेक व नागपूर निर्वाचन क्षेत्रामध्ये दिनांक
11 एप्रिल 2019 रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तर दिनांक 23 मे 2019 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार
आहे. निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच या
कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात निवडणुकीच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी दारुबंदी म्हणजे कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन जिल्हा
निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुद्गगल यांनी केले आहे.
निर्वाचन आयोगाने दिलेल्या निर्देशान्वये नागपूर जिल्ह्यातील नागपूर व रामटेक निर्वाचन
क्षेत्रात मतदानाच्या अगोदरचे दोन दिवस, मतदानाचा दिवस आणि मतमोजणीच्या
दिवशी नियमातील तरतुदीनुसार किरकोळ तसेच ठोक मद्यविक्री अनुज्ञप्त्याधारकांवर मद्य विक्रीची बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण नागपूर जिल्ह्यात 9 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 11 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत
तसेच दिनांक 23 मे 2019 रोजी संपूर्ण दिवस नागपूर जिल्ह्यात
मद्यविक्री दुकाने बंद राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या संबंधित मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकाविरूद्ध कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment