Friday, 5 April 2019

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम


            
नागपूर,दि.5: अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर अंतर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय, कृषी, डी.टी.एड, बी. एड. व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम जेथे आयुक्त, समावेश सामाईक प्रवेश परीक्षा मुंबई (CET) यांचेद्वारे प्रवेश पात्रता ठरविण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमासाठी) परीक्षेकरिता अर्ज केलेले असतील अशा विद्यार्थ्यांना कालमर्यादेत अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी दिनांक 1 एप्रिल 2019 पासून विशेष मोहीम सुरु झाली आहे.
अनुसूचित जमातीच्या राखीव असलेल्या प्रवर्गाकरिता ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी www.etribevalidity.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रस्ताव सादर करावा व ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेले आहे व ज्यांची प्रकरणे समितीकडे प्रलंबित आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या दाव्याची वस्तुस्थिती व विहित त्रुटींची पूर्तता करावी.
नव्याने प्राप्त होणारे अर्ज व यापूर्वी प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने अर्जदारांना वस्तुस्थिती व विहित त्रुटीबाबत व अन्य कोणतेही मार्गदर्शन मिळावे, यासाठी समिती कार्यालयात विशेष सहाय्य कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाची जबाबदारी या समिती कार्यालयातील वरिष्ठ संशोधन अधिकारी  गणेश इवनाते यांचेकडे सोपविण्यात आली आहे.  ते या मोहिमेत जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहतील.  तसेच  , संशोधन अधिकारी (शैक्षणिक कार्यासन) प्रवीण लाटकर व  पोलिस शिपाई (पोलिस दक्षता पथक) संदीप लांजेवार यांचा देखील विशेष सहाय्य कक्ष मध्ये समावेश आहे.
हैद्राबाद हाऊस, बॅरेक नं. 1,2,3 व 10 सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001 येथे हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांना कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 0712-2560031 व E-mail ID  tescnagpur@gmail.com संपर्क व पत्रव्यवहार करता येईल.  ज्या विद्यार्थ्यांना कालमर्यादेत त्यांचा दावा तपासून घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी  समिती कार्यालयाशी संपर्क साधावा व सहकार्य करावे, असे आवाहन समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष विनोद पाटील तसेच उपसंचालक तथा सदस्य सचिव मनोज चव्हाण यांनी केले आहे.
***** 

No comments:

Post a Comment