Monday, 12 January 2026

नागपूर मध्ये नवीन आधार सेवा केंद्र कार्यान्वित

 


नागपूर, दि. 9 : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्या वतीने नागपूर महानगर क्षेत्रातील नागरिकांना आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी 7 जानेवारी 2026 रोजी नागपुरात नवीन आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आल्याचे आधारच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे उपमहासंचालक मंदर जेवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

मानकापूर परिसरातील बिलकीस प्लाझा येथे या आधार केंद्राचे औपचारिक उद्घाटन या  केंद्रातील सर्वात तरुण ऑपरेटरच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रादेशिक कार्यालय मुंबईचे उपमहासंचालक मंदर जेवरे, वरिष्ठ अधिकारी, सेवा प्रदाता 'प्रोटिअन' चे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

यावेळी मंदर जेवरे यांनी आधारच्या उत्कृष्ट सेवा प्रणालीवर भर दिला. ते म्हणाले, नागपूर येथील हे आधार सेवा केंद्र आधुनिक पायाभूत सुविधा आणि ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रणालीने सुसज्ज आहे. नागरिकांना सुलभ आणि कार्यक्षम सेवा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक असून, यामुळे नागरिकांची प्रतीक्षा वेळ कमी होण्यास मदत होईल.

                                         या केंद्रात उपलब्ध असणाऱ्या सेवा

या आधार केंद्रामध्ये नवीन आधार नोंदणी, लोकसंख्यात्मक आणि बायोमेट्रिक अद्ययावत सेवा, प्रौढांसाठी आधार नोंदणी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नागरिक आधार सेवांसाठी आधारच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://uidai.gov.in) ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

 

00000

 

 

 


No comments:

Post a Comment