पुढील महिन्यापासून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-1 अंतर्गत जनतेच्या जास्तीत-जास्त समस्यांचे निराकरण व्हावे या दिशेने नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित होणाऱ्या समाधान शिबीर अभियान टप्पा -1 च्या पूर्व तयारीचा आढावा श्रीमती बिदरी यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. अपर आयुक्त महसूल राजेश खवले, सहायक आयुक्त भूसुधार शिल्पा सोनाले उपस्थित होत्या. भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली आणि वर्ध्याचे जिल्हाधिकारी तसेच नागपूरचे अपरजिल्हाधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
येत्या 7 आणि 14 मार्च रोजी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका निहाय मंडळ स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. यानंतर 10 व 17 एप्रिल रोजीही समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.तसेच नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर 8 व 15 मे रोजी महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने सर्वांसाठी घरे, वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे, जमीनी अकृषक करणे, तुकडेबंदी, पाणंद रस्ते,पट्टे वाटप,विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरीत करणे आदींबाबत कार्यक्रम आखण्यात आला आहे. या सर्वांबाबत जिल्हानिहाय स्थितीचा आढावा घेण्यात आला. शिबीराचे स्थळ व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यापासून आवश्यक सोयी करण्यासह पात्र लाभार्थ्यांच्या याद्या करणे आदींबाबत श्रीमती बिदरी यांनी सूचना दिल्या.
एमसँड धोरणाबाबत विभागात असलेल्या सद्यस्थितीची माहिती त्यांनी घेतली. शासकीय जमीनीवरील २०११ पूर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करून पात्र लाभार्थ्यांना करावयाच्या पट्टेवाटपाच्या स्थितीची माहितीही श्रीमती बिदरी यांनी जाणून घेतली. सर्वच पात्र लाभार्थ्यांना समाधान शिबीरामध्ये पट्टेवाटप करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


No comments:
Post a Comment