विभागीय आयुक्त बिदरी यांच्या मार्गदर्शनात अभिनव यश
नागपूर, दि. 18 : माझी वसुंधरा
अभियान 5.0 मध्ये राज्यस्तरावर नागपूर विभागातील ग्रामपंचायतींनी कामाची मोहर उमटविली
आहे. या अभियानांतर्गत विभागातील 7 ग्रामपंचायतींची विविध श्रेणीमध्ये 10 राज्यस्तरीय
पुरस्करासाठी निवड करण्यात आली असून 7 ग्रामपंचायतींना विभागीय पुरस्कार जाहीर झाले
आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव यश प्राप्त
झाले आहे.
महसुली विभागांमध्ये नागपूर विभागाने राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे तर
जिल्हा परिषदेच्या सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या श्रेणीत चंद्रपूरने
तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
पृथ्वी, वायू,जल, अग्नी आणि आकाश
या निर्सगाशी संबंधीत पंच तत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ राज्यातील स्थानिक
स्वराज्य संस्थामध्ये 2 ऑक्टोबर 2020 पासून राबविण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियान
5.0 हे राज्यातील एकूण 422 नागरी स्थानिक संस्था व 27,895 ग्राम पंचायतींमध्ये 1
जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य
संस्थांनी निसर्गाचे पंचमहाभूत भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश यामध्ये कामे केली व सर्व
कामांचे डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन त्रयस्त संस्थेमार्फत करण्यात आले. माझी
वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल 17 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध
लोकसंख्या गटानुसार जाहीर करण्यात आला. या निकालात नागपूर विभागातील एकूण 7 ग्राम पंचायतींना
10 राज्यस्तरीय पुरस्कार व 7 ग्राम पंचायतींना प्रत्येकी एक विभागीय पुरस्कार जाहीर
झाले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील 2 ग्रामपंचायतींचा
समावेश
या अभियानामध्ये विविध मानकांमध्ये सरस
कामगिरी करत विभागातील 7 ग्रामपंचातींनी राज्यस्तरावर कामाची छाप सोडली आहे. यात चंद्रपूर,
गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी करत
पुरस्कारावर नाव कोरले आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्याच्या कवठा ग्रामपंचायतीला उंच उडी गटात
प्रथम क्रमांक तर हिंगणा तालुक्यातील नेरी (मानकर) ग्रामपंचायतीला सामान्य गटात
राज्यस्तरावर तिसरा पुरस्कार जाहीर झाला.
चंद्रपूर जिल्हा व तालुक्याच्या दुर्गापूर ग्रामपंचायतीची उंच उडी
श्रेणीमध्ये राज्यस्तरीय पहिला पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याच जिल्ह्याच्या
सावली तालुक्यातील जिबगाव ग्रामपंचायतीला दुसरा तर चिखली ग्रामपंचातीला सामान्य
प्रकारात पहिला व भूमी प्रकारात पुरस्कार जाहीर झाला आहे.
गोदिंया जिल्ह्यातील सडक अर्जुनी
तालुक्याच्या डव्वा ग्रामपंचातीने सामान्य गटात दुसरा तर भूमी गटात पुरस्कार
पटकाविला आहे. याच जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील भज्जीयापार ग्रामपंचायतीला
सामान्य गटात राज्यस्तरावर दुसरा तर भूमी गटात पुरस्कार जाहीर झाला.
विभागीय स्तरावर या 7 ग्रामपंचायती ठरल्या अव्वल
'माझी वसुंधरा अभियान 5.0' मध्ये विभाग
स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या 7 ग्रामपंचायतींची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर (ता.चंद्रपूर),
बेला (ता.भंडारा, जि. भंडारा), भेजगाव (ता.मूल, जि. चंद्रपूर), नानव्हा (ता.सालेकसा,
जि. गोंदिया), सिरेगाव (ता.अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) चांपा (ता.उमरेड, जि.
नागपूर) मिर्झापूर (ता.आर्वी, जि.वर्धा) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
विभागस्तरावर जिल्हा परिषद श्रेणीमध्ये गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेला पुरस्कार
जाहीर झाला आहे. सावली, कोरपना आणि भद्रावती येथील गट विकास अधिकाऱ्यांना
विभागस्तरावरील तसेच जिल्हास्तरावरील पुरस्कार भंडारा, राजुरा, देसाईगंज, सालेकसा,
हिंगणा, आर्वी येथील गट विकास अधिकाऱ्यांना जाहीर झाले आहे.
पुरस्काराचे स्वरुप 50 लाख ते 1 कोटी
रुपये पर्यंत असून 21 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी त्याचप्रमाणे
विभागीय आयुक्तालयातील विकास शाखेच्या अपर आयुक्त वर्षा गौरकर आणि तत्कालीन विकास
शाखेचे अपर आयुक्त कमलकिशोर फुटाणे, विभागीय नियंत्रण अधिकारी संकेत तालेवार यांनी
पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे व जिल्हा परिषदेचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
00000

No comments:
Post a Comment