Wednesday, 1 July 2026
विशेष लेख… मक्यावरील लष्करी अळी आणि बीज प्रक्रिया व्यवस्थापन
मागील काही हंगामांपासून मका पिकावर फॉल आर्मीवर या लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. मका पिकाची पेरणी ही बीज प्रक्रिया करून केल्यास सुरुवातीपासूनच या किडीचा प्रादुर्भाव टाळता येईल.
या किडीचे व्यवस्थापन पुढीलप्रमाणे करता येईल.
- स्वच्छता मोहीम राबवावी तसेच खताचा अतिरिक्त वापर करू नये.
- लवकर पक्व होणाऱ्या वाणाची निवड करून लवकर पेरणी करावी व याचा गाव किंवा विभागीय पातळीवर अवलंब करावा.
- मका बियाण्यास सायंट्रेनिलिप्रोल १९.८ अधिक थायोमेथोक्झाम १९.८ टक्के एफएस २.३८ मिलि प्रति किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.
- पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत एकरी २० याप्रमाणे पक्षी थांबे उभारावे (३० दिवसापर्यंत).
- मका आणि उडीद/ मूग/तूर आंतरपीक घ्यावे.
- मका पिकासभोवताल सापळा पीक म्हणून हायब्रीड नेपियरच्या ३ ते ४ ओळी पेराव्या व त्यावर प्रादुर्भाव दिसताच कीटकनाशकाची शिफारशीनुसार फवारणी करावी.
- सर्व्हेक्षणाकरिता शेतात ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी उभारावे, पतंगांची संख्या ३ पतंग/ कामगंध सापळा या प्रमाणात आढळताच पतंग मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यासाठी २० प्रति हेक्टरी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. सापळे पिकाच्या उंचीपेक्षा दीड फुट उंचीवर व प्राधान्याने सुरुवातीच्या पोंगे अवस्थेत लावावे.
- पतंगांची संख्या ३ पतंग/ कामगंध सापळा अशी आढळताच ट्रायकोग्रामा प्रेटिओसम या परोपजीवी कीटकांची दर आठवड्याने एकरी ५० हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. त्यानंतर ३ ते ४ दिवस रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये.
- पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पानावरील समूहात दिसलेली अंडी किंवा अळ्यांचा समूह असलेली प्रादुर्भावग्रस्त पाने (पांढरे चट्टे असलेली) अंडी/ अळ्यासंहित नष्ट करावी.
- प्रादुर्भाव दिसताच प्रादुर्भावग्रस्त पोंग्यांमध्ये कोरडी वाळू टाकावी.
- उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी या अळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. सुरुवातीला पानातील हरित लवक खाऊन पानावर पांढरे लांबट पट्टे, रेषा किंवा ठिपके दिसतात. त्याचवेळी जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी.
- बॅसिलस थुरिजीअसीस व कुर्सटाकी २० ग्राम/ १० लि. पाणी किंवा ४००० ग्राम/ एकर याप्रमाणे फवारणी करावी.
- अंड्यांची उबवण क्षमता कमी करण्यासाठी व सूक्ष्म अळ्यांच्या नियंत्रणासाठी ५ टक्के प्रादुर्भाव असल्यास, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन १५०० पीपीएम, ५० मिलि प्रति १० लिटर याप्रमाणे फवारणी करावी.
- रोप ते सुरुवातीची पोंगे अवस्था (उगवणीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी)- ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळल्यास फवारणी करावी, मध्यम ते उशिरा पोंगे अवस्था (उगवणीनंतर ५ ते ७ आठवड्यांनी)- मध्यम पोंगे अवस्थेमध्ये १० टक्के पोंग्यामध्ये प्रादुर्भाव तर उशिरा पोंगे अवस्थेमध्ये २० टक्के पोंग्यामध्ये प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी रावी, गोंडा ते रेशीम अवस्था (उगवणीनंतर ८ आठवड्यांनी)- फवारणीची गरज नाही परंतु १० टक्के कणसांमध्ये प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी.
- ज्यांनी बीज प्रक्रिया केली नसेल त्यांनी या किडीच्या व्यवस्थापनासाठी उगवणीनंतर १२ ते १५ दिवसांनी फवारणीसाठी क्लोरन्ट्रनिलीप्रोल ९.३ टक्के प्रवाही अधिक लॅबडासायहेलोथ्रीन ४.६ टक्के झेडसी प्रवाही, ५.१२ मिलि किंवा क्लोरन्ट्रनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही एससी ४.३२ मिलि किंवा इमामेक्टिन बन्झोएट ५ टक्के एसजी, ८ ग्राम किंवा इमामेक्टिन बन्झोएट ५ टक्के अधिक ल्युफेनुरॉन ४० टक्के डब्ल्यूजी, १.६ ग्राम किंवा थायोडिकर्ब ७५ टक्के डब्ल्यूपी २० ग्राम किंवा नोव्हाल्युरॉन ५.२५ टक्के अधिक इमामेक्टिन बेन्झोएट ०.९ टक्के प्रवाही एससी, ३० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. चाऱ्यासाठी घेतलेल्या मका पिकावर कुठल्याही प्रकारची फवारणी करू नये. त्याऐेवजी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.
- वर दिलेली कीटकनाशकाची मात्रा ही साध्या न्यापस्याप स्पेअरसाठी शिफारशीत असून, पॉवर स्प्रेने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांची मात्रा तिप्पट करावी.
डॉ. डी.बी. उंदीरवाडे
विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग
डॉ. पंकृविदे अकोला
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment