Wednesday, 1 July 2026

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान पात्र लाभार्थ्यांची संख्या १६,२२१

नागपूर, दि. १ : कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी विभागातर्फे कृषी अवजारांसाठी अनुदान देणे सुरू झाले असून, यात १६२२१ पात्र लाभार्थी आहेत. कृषी विभागामार्फत राज्यात कृषी यांत्रिकीकरणा अंतर्गत केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीककरण, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण या योजना महाडीबीटी पोर्टलवर राबविल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टरचलित अवजारे, पीक काढणीपश्चात अवजारे, प्राथमिक प्रक्रिया अवजारे, पीक संरक्षण अवजारे, भाडे तत्त्वावरील सेवा सुविधा केंद्र करणे या घटकांना लाभ देण्यात येतो. या यंत्र अवजारांसाठी सर्वसाधारणपणे किमतीच्या ४० ते ५० टक्के किंवा केंद्र शासनाने घोषित केलेली उच्चतम अनुदान मर्यादा यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात येते. २०२५-२६ मध्ये महाबीडीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य पद्धतीने १,६८,११५ अर्जांची निवड करण्यात आली होती. सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्याने १,४१,३५२ अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे १६,६५९ लाभार्थ्यांना पूर्वसंमती प्रदान करण्यात आली आहे. त्यापैकी १६,२२१ लाभार्थ्यांनी यंत्रे- अवजारांची खरेदी करून त्यांची देयके अपलोड केली आहेत. या लाभार्थ्यांसाठी सन २०२५- २६ मध्ये वरील तिन्ही योजनांतर्गत एकूण ६५७९.७२५ लक्ष रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. तसेच २०२६-२७ मध्ये तिन्ही योजना मिळून १६१९.४०८ लक्ष रुपये इतका निधी प्राप्त झाला असून, प्रक्रियेत असलेल्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग यांनी कळविले आहे. 000000

No comments:

Post a Comment