Monday, 26 October 2020

 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध अनुयायांकडून सुरक्षेचे नियम पाळत अभिवादन

 

• मोजक्या उपस्थितीतही पाळले गेले कोविड-19 प्रतिबंधात्मक निर्देश

 

        नागपूरदि. 26 :  कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज दसरा-विजयादशमीला बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.  

            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाच्यावतीने बौद्ध अनुयायांना केले होते. केंद्र व राज्य शासनाच्या साथरोग प्रतिबंधक निर्णयानुसार दरवर्षी विजयादशमीला साजरा करण्यात येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन’ या वर्षी घरीच साजरा करावा] असे आवाहन केले होते. 

            पालकमंत्री डॉ. नितीन राऊतस्थानिक प्रशासन आणि स्मारक समितीने केलेल्या आवाहनाला अनुयायांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे दिवसभर बौद्ध अनुयायी अत्यंत मोजक्या उपस्थितीत साधेपणाने मात्र सुरक्षिततेचे नियम पाळत व मास्क लावून पवित्र दीक्षाभूमीवर येत अभिवादन केले.  

            दरवर्षी दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भव्य सोहळ्याचे आयोजन करत असते. या भव्य सोहळ्याला देश-विदेशातून बौद्ध अनुयायी उपस्थित राहतात. मात्रयावर्षी जागतिक महामारीने संपूर्ण जग थांबले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने सर्व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नयेयाची संपूर्ण खबरदारी घेतली. परिणामी दिवसभर दीक्षाभूमी येथे अनेक अनुयायांनी येऊन अत्यंत साधेपणाने अभिवादन केले. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनुयायांनी प्रवेशद्वारावरुन अभिवादन केले.

            समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक मार्शल सुनील सारीपुत्तजीराष्ट्रीय बौद्धिक प्रमुख मार्शल प्रकाश दार्शनिककेंद्रीय समिती सदस्य मार्शल किशोर चहांदेमहाराष्ट्र राज्य संघटक मार्शल अविनाश दिग्विजयतेलंगाणा राज्य संघटक मार्शल रविचंद्र जाभाडे यावेळी उपस्थित होते.

            यावेळी समता सैनिक दलाने रितेश गायमुखे यांच्या नेतृत्वात पथसंचलन करत मानवंदना दिली. दीक्षाभूमी परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधामोबाईल टॉयलेट्सरुग्णवाहिकाअग्नीशामक दलाचे पथके तैनात करण्यात आली. 

स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांच्याकडून जनतेचे आभार

            यावर्षी कोविड 19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने सर्व जनतेला आणि बौद्ध अनुयायांना आवाहन केले होते. यावर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपापल्या घरुनच साजरा करावाजेणेकरुन कोविड-19 चा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होणार नाही. जनतेनेही स्मारक समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देत अभिवादन केले. त्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी आभार मानले.

*****

 

 उच्च न्यायालयाच्या ई-रिसोर्स सेंटरचे

नागपुरात 31 ऑक्टोबरला उद्घाटन

                            

            नागपूरदि. 26 :  उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अद्ययावत ई-रिसोर्स सेंटरचे उद्घाटन भारताचे सर न्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते  31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भू्‌षण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश  दीपांकर दत्ता व न्यायमूर्तीसह  विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील.

            उच्च न्यायालयाच्या सभागृहात  आज सकाळी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश सुनील  शुक्रे  यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी., उच्च न्यायालयाच्या प्रबंधक श्रीमती अंजू शेंडे, अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका राम जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भानुसे, भारत संचार निगमचे महाव्यवस्थापक श्री. पानेकर, सहप्रबंधक  पी. एस. जिकार उपस्थित होते.

            सिव्हिल लाईन्स येथील न्यायिक अधिकारी  प्रशिक्षण केंद्रात मुख्य ई-रिसोर्स सेंटर  नियोजित आहे. या रिसोर्स केंद्रामधून सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाचे ई-फाईलिंग, ई- हिअरिंग  करता येणार आहे. तसेच या केंद्रात न्यायिक प्रक्रियेच्या अनुषंगाने अन्य सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. अशा पद्धतीचे हे देशातील पहिले केंद्र असणार आहे. या उद्घाटनाचे लाईव्ह प्रसारण करण्यात येईल. कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन हा कार्यक्रम होणार आहे.

****

Saturday, 24 October 2020

स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीबाबत मार्गदर्शन -ऑनलाईन वेबीनार 29 ऑक्टोबरला


   नागपूर, दि. 24: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गुरुवार, दिनांक 29 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 12 ते  2 या कालावधीत स्किल इंडिया पोर्टलवर TP/TC ची नोंदणी कशी करावी, या विषयावर ऑनलाईन समुपदेशन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व कला, वाणिज्य, विज्ञान,  अभियांत्रिकी,  तंत्रनिकेतन, दुग्ध व्यवस्थापन, मत्स व पशुसंवर्धन  व्यवस्थापन, वैद्यकीय व नर्सिंग, कृषी, औषध निर्माण, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शासकीय तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्यागिक संघटनेच्या आस्थापनांनी  वेबिनारमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन कार्यालयाचे सहायक आयुक्त,  प्र. गं. हरडे यांनी केले आहे.

      स्किल इंडिया पोर्टलवर TP/TC बाबत मार्गदर्शन कॉलेज ऑफ इंटरनॅशनल मॅनेजमेंटचे केंद्र प्रमुख अखिल अग्रवाल,  विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे केंद्र प्रमुख विजय बालपांडे, श्री. शिव शक्ती एज्युकेशन सोसायटीचे  केंद्र प्रमुख गौतम बेताल  करणार आहेत.

      ऑनलाईन बेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी गुगल मिट लिंक https/meet.google.com/kxc-auux-zkj यावर क्लिक करावे. गुगल मिट ॲपमधून कनेक्ट झाल्यानंतर आक्स टू जॉईनवर क्लिक करुन वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे, अशी सूचना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंदामार्फत देण्यात आली आहे.

*****

 

 

 

 

 

 

धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा - डॉ. नितीन राऊत

 


  


                                                                            

·         दीक्षाभूमी परिसरातील दक्षतेसंदर्भात प्रशासनासोबत आढावा

 

नागपूर, दि. 24: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. 

दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभाकक्षात आज आढावा बैठक घेण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या साथरोग प्रतिबंधक निर्णयानुसार दरवर्षी विजयादशमीला साजरा करण्यात येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनया वर्षी साजरा केला जाणार नाही. तथापि, या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्यासाठी आज त्यांनी आढावा घेतला. 

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ.सुधीर फुलझेले, समितीचे सदस्य एन.आर. सुटे, विलास गजघाटे तसेच  विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, विक्रम साळी, नुरुल हसन आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. राऊत यांनी अनुयायांना आवाहन करताना आपल्या कुटुंबासोबत घराघरात अभिवादन करावे अशी विनंती केली आहे. यावर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाची झळ देशासह संपूर्ण जगाला बसत आहे. यामुळे केंद्र व राज्य शासनाने नागरिकांनी कोणतेही सण, समारंभ सामुहिकरित्या साजरे करु नये, असे आवाहन केले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी येथे बौध्द धम्माची दीक्षा घेतली होती. त्या दिवशी विजयादशमीचा सण होता. यामुळे विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी येथे  तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना  करण्यासाठी देशभरातून अनुयायी येत असतात. मात्र यंदा कोरोना संक्रमणापासून बचावासाठी नागरिकांनी आपल्या घरीच धम्मचक्र प्रर्वतन दिन साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            रेल्वे स्टेशन तसेच बस स्थानकावर अनुयायी आल्यास गर्दी होणार नाही, यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. दीक्षाभूमी परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाईल टॉयलेल्ट्स, रुग्णवाहीका, अग्नीशामक दलाचे पथक यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या बाबतही डॉ. राऊत यांनी यावेळी माहिती घेतली व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत.

 

****