Monday, 29 January 2024

जेष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापडकर यांचे उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन


 

नागपूर, दि. 26 : अनाथाचे नाथ म्हणून सुप्रसिध्द असलेले जेष्ठ समाज सेवक शंकरबाबा पापडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंकरबाबांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी शंकरबाबा पापडकर यांच्यासोबत वझ्झर येथिल बालगृहात सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

            शंकरबाबा पापडकर यांना पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीव्दारे शंकरबाबांना शुभेच्छा दिल्यात. तसेच समाजासाठी करत असलेल्या कामाचा गौरव केला.

            अमरावती जिल्हयातील वझ्झर येथे स्वर्गीय अंबादास पंत बालगृहाच्या माध्यमातून अंध, अपंग तसेच पुर्णत: मतीमंद असलेल्या १२५ मुलांचा सांभाळ करत असून त्यांना स्वत:चे नाव देवून ओळख दिली आहे. राज्यभरातून विविध ठिकाणी सापडलेल्या मतीमंद बालकांचा स्विकार करुन त्यांच्या पुर्नवसनासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मतीमंद अपंग, अंध मुलांच्या पुर्नवसनासाठी १९९२ पासून त्यांचे सातत्याने कार्य सुरु आहे.  या कामाची दखल घेवून त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री हा नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजसेवेतील त्यांचे हे कार्य अव्दितीय असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्‌मश्री; उपमुख्यमंत्र्यांकडून निवासस्थानी भेट व अभिनंदन



 

नागपूर, दि.26 :  नागपुरातील  प्रसिद्ध न्यूरोसर्जन  डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना  पद्‌मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या रहाटे कॉलनी येथील निवासस्थानी भेट देत अभिनंदन केले. यावेळी त्यांनी डॉ. मेश्राम यांच्याशी आरोग्यासह विविध विषयावर चर्चा करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

छोट्याश्या गावातून आलेल्या व जगाच्या नकाशावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री हा देशाचा नागरी पुरस्कार जाहीर  करण्यात आला.  मेंदू  विकारावरील  जनजागृतीसाठी  त्यांना हा पुरस्कार जाहीर  करण्यात आला.  यानिमित्त  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेतली.

 

डॉ. मेश्राम यांनी न्युरो सर्जन म्हणून केलेले कार्य अद्वितीय आहे. विदर्भातीलच नव्हे तर देशभरातील रुग्ण  त्यांच्याकडे उपचारासाठी येतात.  त्यांची ही रुग्णसेवा अशीच अखंडित पुढे सुरू राहो, असे  उपमुख्यमंत्री  यावेळी म्हणाले.

 

     जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. मेश्राम यांच्या पत्नी नम्रता,  मुले डॉ. अविरल व आशय, अलंकार रामटेके यावेळी उपस्थित होते.

                                                           00000 

Thursday, 25 January 2024

विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ



 

नागपूर, दि. 25:  राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षामध्ये आज  उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली.

लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जनत करुन आणि मुक्त नि:पक्षपाती  शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलेाभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, चंद्रभान पराते, धनंजय सुटे, तहसिलदार महेश सावंत, आर.के.डिघोळे, संध्या खोडे यांच्यासह अधिकारी  व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

*******

मराठी भाषेतील साहित्य व्यवहार सर्व माध्यमांवर सर्वदूर पोहोचावा "भाषा विकासाच्या नव्या दिशा" विषयावरील परिसंवादाचा सूर




*नागपूर, दि.२४* : कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानामुळे मराठी भाषेवर होत असलेले आक्रमण थोपवून धरण्याकरिता मराठी भाषेतील विविध साहित्य व्यवहार सर्व माध्यमांवर सर्वदूर पोहोचण्याची गरज असल्याचा सूर "भाषा विकासाच्या नव्या दिशा" विषयावरील परिसंवाद निघाला.

      महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालय आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवड्याच्या औचित्याने 
येथील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात 
परिसंवाद आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी अर्थतज्‍ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. 
सुप्रसिद्ध कथाकार विजय तांबे,  चिंतनशील लेखक मिलिंद कीर्ती आणि भाषा संचालनालयाच्या माजी सहसंचालक अनुराधा मोहनी यांनी यावेळी विचार मांडले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि भाषा संचालनालयाचे सहाय्यक संचालक हरीश सूर्यवंशी यावेळी मंचावर उपस्थित होते.

       विजय तांबे यांनी 'मानवी सर्जनशीलता आणि भाषा’ विषयावर प्रकाश टाकला. चॅट जीपीटी, बार्ड ,बिंग आदी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे साहित्यिक व्यवहारात होत असलेल्या घुसखोरीबद्दल त्यांनी विविध उदाहरणांद्वारे माहिती दिली. साहित्य, संगीत, कला आदी क्षेत्रांमध्ये दडवून ठेवलेली सर्जकता आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून सर्वत्र पसरल्याचे वास्तवही त्यांनी विविध उदाहरणांद्वारे मांडले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानामुळे होणारे संपत्तीकरण, वाढणारी बेरोजगारी आदी येत्या काळातील ५व्या औद्योगिक क्रांती समोरील समस्या त्यांनी मांडल्या. १९९०नंतर विचारवंतांच्या लिखाणात या परिस्थितीची अंधुक कल्पना देण्यात आल्याचे अधोरेखित करत भाषिक मुल्यांच्या आधारावर या समस्येला पुढे जावे लागेल व सर्जकतेच्या कक्षांचा विस्तार करावा लागेल असे विचार त्यांनी मांडले.

      वर्ष १९९० आणि २००८ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीचा संदर्भ  देऊन मिलिंद कीर्ती यांनी 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भाषा'  हा विचार मांडला. आर्थिक मंदीच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ते सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राद्वारे समाजमन मनोरंजनात गुंतविण्यासाठी होत असलेल्या विभिन्न प्रयोगाबद्दलही त्यांनी यावेळी विचार मांडले. कृत्रिम बुद्धिमत्तेची सध्या प्राथमिक स्थिती असून यामुळे निर्माण झालेले भाषेपुढील प्रश्न हे येत्या काळातील या तंत्रज्ञानाच्या ऑटोनॉमस आणि परसेप्शन या पुढील टप्प्यात आणखी जटील होत जातील आणि त्यासाठी मराठी भाषेतील साहित्यिक व्यवहार सक्षमपणे होवून हे आव्हान स्वीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

      ‘ज्ञानभाषा मराठी-संभाव्यता आणि दिशा’ याबद्दल अनुराधा मोहनी यांनी विचार व्यक्त केले. मानवी भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी भाषेची गरज असल्याचे अधोरखित करून त्यांनी  मराठी मातृभाषेतून जास्तीत-जास्त साहित्य आणि भाषिक व्यवहार होऊन या भाषेचा ज्ञानभाषेकडे प्रवास होण्याची गरज असल्याची मांडणी केली. इंग्रजी भाषेकडे वळलेला समाज आणि मातृभाषेकडे समाजाने फिरवलेलीपाठ हे वास्तव त्यांनी मांडले.परिसर विज्ञानात मराठीचा वापर, मराठी परिभाषेचा वापर होण्यासाठी बीज ग्रंथ निर्मिती, गटचर्चा, प्रश्नोत्तरे आदींच्या माध्यमातून मराठी भाषा व्यवहार व्हावे ,अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

       कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञामुळे मानवी सर्जकता,विचार प्रणालीवर व भाषिक व्यवहारावर होणारे आक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज डॉ. खांदेवाले यांनी अध्यक्षीय उद्बोधनात व्यक्त केली. शहरांसोबतच ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या आकर्षणामुळे 
व्यवहारातील अतिक्रमणही त्यांनी विविध उदाहरणांद्वारे उलगडून दाखवले. भाषिक स्वातंत्र्य अबाधीत राखण्यासाठी भाषांची संरचना वाचविणे व ती जनसामान्यापर्यंत जास्तीत - जास्त प्रमाणात व सहज पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
       
    तत्पूर्वी, युगवाणी चे संपादक प्रफुल्ल शिलेदार यांनी प्रास्ताविक केले.भाषा संचालनालयाचे सहाय्यक संचालक हरीश सूर्यवंशी यांनी संचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रदीप दाते यांनी विदर्भ साहित्य संघाच्यावतीने मराठी भाषा संवर्धनासाठी भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. प्रा. विवेक अलोनी यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
        ०००००