Tuesday, 10 December 2024

केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या प्रसिद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करूया - संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे

 नागपुरातील पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्यांसोबतच चर्चा नागपूर,दि 10 : केंद्र व राज्य शासनातर्फे राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध महत्वाकांक्षी योजनांना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले होते. त्यानुसार आज पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या (पीआरएसआय) सर्व सदस्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे विदर्भ विभागातील योजनांना प्रसिद्धी देण्यासाठी समन्वयाने काम करण्यासाठी सहकार्य करावे, अशा भावना माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी व्यक्त केल्या. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि पीआरएसआय यांच्या समन्वयाने केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी अनौपचारिक बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी पीआरएसआय चे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.पी.सिंग, नागपूर शाखेचे सचिव मनिष सोनी, डब्ल्युसिएलचे जनसंपर्क महाव्यवस्थापक पी. नरेंद्र कुमार, महामेट्रोचे अखिलेश हळवे, दूरदर्शनच्या रचना पोपटकर आणि मीनल पाठराबे, पीआयबीचे सौरव खेकडे, मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे शरद मराठे आदि उपस्थित होते. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विविध महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ गरजुंना मिळावा यासाठी आधुनिक प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर करून समन्वयाने व्यापक प्रसिद्धी करण्यावर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. एस.पी.सिंह यांनी पीआरएसआयच्या माध्यमातून विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, याबाबत आश्वस्त केले. पीआरएसआय तर्फे डॉ. गणेश मुळे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मनिष सोनी यांनी मानले. 00000

Friday, 6 December 2024

हरभरा पिकावरील कीड व्यवस्थापनाचा कृषी विभागाचा सल्ला

नागपूर,दि ६ : हरभरा पिकावरील शेंडे, पाने व रोप कुरतडणारी अळीच्या (कट कर्म) प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून या अळीच्या व्यवस्थापन व उपाययोजनेचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आला आहे. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकावर प्रामुख्याने कट कर्म या बहुभक्षीय अळीचा प्रादुर्भाव होतो. पिकाच्या कोवळ्या शेंडयावर ही अळी 300 ते 450 अंडी घातले. पिकावर रात्री येवून ही अळी पाने व शेंडे कुरतडते. पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव हाऊ शकतो. पूर्ण वाढ झालेली अळी ही जमीनीमध्ये कोषावस्थेत जाते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी बांधावर कचऱ्याचे ढीग तसेच तण राहणार नाही अशा पद्धतीने नियोजन करणे, प्रति हेक्टर 20 पक्षी थांबे उभारावे. मादी पतंग अंडी घालू नये याकरिता निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा अझाडीरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी दिला आहे. प्रादुर्भाव 2 अळ्या प्रति मिटर ओळ अशी आर्थिक नुकसानीची पातळी आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस 20 टक्के ईसी 50 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिप्रोल 18.5 टक्के 3.0 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. ००००००

Friday, 29 November 2024

‘प्रधानमंत्री पीक विमा योजना-रब्बी २०२४’ योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

नागपूर, दि.29 : ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना-रब्बी 2024’ मध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले आहे. ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत, गहू बागायत व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2024 तर उन्हाळी भात पिकासाठी 31 मार्च 2025 पर्यंत या योजनेत केवळ 1 रुपये प्रती अर्ज एवढी रक्कम भरुन पीक विमा पोर्टलवर विमा नोंदणीद्वारे सहभागी होता येणार आहे. राज्यात खरीप हंगाम 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2020 पासून तीन वर्षासाठी राज्यात ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी 2025-26 हंगाम या तीन वर्षाकरिता अधिसुचित पीकांसाठी वीमा क्षेत्र घटक धरुन ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून या तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हावार विमा कंपन्यांची नावे व टोल फ्री क्रमांक वर्धा व नागपूर जिल्हयासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18001037712 हा टोल फ्री क्रमांक आहे. भंडारा जिल्हयासाठी चोलामंडलम एम एस जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18002089200 हा टोल फ्री क्रमांक आहे. गोंदिया जिल्हयासाठी युनिर्व्हसल सोम्पो जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18002005142/ 18002004030 हा टोल फ्री क्रमांक आहे. चंद्रपूर जिल्हयासाठी ओरिएन्टल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 1800118485 हा टोल फ्री क्रमांक आहेत. तर गडचिरोली जिल्हयासाठी रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18001024088 हा टोल फ्री क्रमांक आहे. पीक विमा योजनेंतर्गत या जोखमींचा समावेश हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हवामानातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी/लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील. पिकांचे होणारे नुकसान, पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखमींचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गंत समावेश करण्यात आला आहे. आधारकार्ड, 7/12 उतारा, 8 अ, आधार संलग्न बॅंक पासबुक या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना नजीकच्या बॅंक शाखेत तसेच आपले सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी होता येणार आहे. 000000

Monday, 11 November 2024

बनावट पत्रव्यवहार करणाऱ्या तोतया व्यक्तीपासून सावध राहण्याचे अपर आयुक्तांचे आवाहन

नागपूर दि. 12 : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या बोर्डा गावातील ए.एम.सय्यद या व्यक्तीने विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन उपायुक्त असा उल्लेख असणारे लेटर हेड वापरून विविध प्रशासकीय विभागास बनावट पत्रव्यवहार केल्याची बाब समोर आली असून याविषयी सदर पोलीस स्थानकास कळविण्यात आले आहे. ए.एम.सय्यद नावाची व्यक्ती किंवा तसे पद विभागीय आयुक्त कार्यालयात नसून या व्यक्तीकडून कोणत्याही पद्धतीचा पत्रव्यवहार झाल्यास तो जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तपासून घ्यावा आणि आवश्यकतेनुसार यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आवाहन, विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे. डेप्युटी कमिश्नर जीएडी, सेंट्रल मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिव्हीजनल कमिश्नर ऑफिस, नागपूर डिव्हीजन, नागपूर या आशयाच्या लेटरहेडद्वारे 2 सप्टेंबर 2024 आणि 20 ऑक्टोबर 2024 रोजी अनुक्रमे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि अभय खारकर, कॅफे हाऊस बोर्डा, तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या नावाने बनावटी पत्रव्यवहार झाल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाला कळविण्यात आले आहे. अशा बनावटी पत्रव्यवहाराद्वारे गुंडाकडून छेडछाड होत असल्याबाबत, गटविकास अधिकाऱ्यास नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता वेतन थकबाकी अदा केली नसल्याबाबतचा उल्लेख आढळून आला आहे. या व्यक्तीची वारंवार विविध प्रशासकीय विभागास पत्रव्यवहार करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात शासकीय यंत्रणा व इतर व्यक्तींचे नुकसान होवू नये म्हणून चंद्रपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच, नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात कळविण्यात आले आहे. ए.एम.सय्यद हा तोतया व्यक्ती शासकीय यंत्रणा व इतर व्यक्तींचे नुकसान करण्याची शक्यता पाहता नागपुरच्या सदर पोलीस स्थानकास या व्यक्ती विरुद्ध नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करण्याचे अपर आयुक्त कुलकर्णी यांच्याकडून कळविण्यात आले आहे. ००००००