Monday, 20 May 2019

विधानपरिषद पोटनिवडणूक : 7 जूनला मतदान

माध्यम प्रतिनिधींनी प्राधिकारपत्रासाठी 27 मे पर्यंत अर्ज करावेत

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य शिवाजीराव बापुसाहेब देशमुख यांचे 14 जानेवारी 2019 रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी 7 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीचे वृत्तसंकलन आणि छायाचित्रण करण्याकरिता प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींनी प्राधिकारपत्रांसाठी 27 मे पर्यंत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद पोट निवडणूक – 2019  च्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार निवडणुकीचे मतदान शुक्रवार 7 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे. तसेच मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. ह्या निवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाचे विविध प्राधिकारपत्रे प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना द्विवार्षिक निवडणुकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपले नावे, आपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या 2 प्रतीसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास 3 प्रतींसह) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे 27 मे पर्यंत पाठवावीत. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच 27 मे नंतर या कार्यालयात प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाही, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
०००० 

‘जय महाराष्ट्र’ मध्ये 'नागरी सेवा पूर्व परीक्षेची तयारी' या विषयावर भूषण देशमुख यांची मुलाखत


मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'नागरी सेवा पूर्व परीक्षेची तयारी'  या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक भूषण देशमुख यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग मंगळवार  दि. 21  मे रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे.
       केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा  पूर्व परीक्षेचे स्वरूप, व्याप्ती आणि परीक्षेची  तयारी, पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी कशी करावी आदी विषयांची सविस्तर माहिती  श्री. देशमुख यांनी ‘जय महाराष्ट्र ’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००

146 ग्रामपंचायतींसाठी 23 जून रोजी मतदान

सरपंचपदांच्या 62 रिक्त जागांसाठीही मतदान
मुंबई, दि. 20 : राज्यातील विविध 20 जिल्ह्यांमधील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील 6 हजार 719 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या  ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 31 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. 2 व 5 जून 2019 या दोन सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी 7 जून 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 10 जून 2019 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी मतमोजणी 24 जून 2019 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: पालघर- 7, रायगड- 8, रत्नागिरी- 1, नाशिक- 74, धुळे- 1, जळगाव- 1,अहमदनगर- 10, पुणे- 3, सातारा- 3, सांगली- 1, कोल्हापूर- 1, उस्मानाबाद- 1, लातूर- 2, नांदेड- 1, अकोला- 1, यवतमाळ- 3, वाशीम- 1, बुलडाणा- 1,वर्धा- 4 आणि चंद्रपूर- 22. एकूण- 146.
पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- 1, पालघर- 2, रायगड- 10, रत्नागिरी- 5, सिंधुदुर्ग- 1, नाशिक- 3,अहमदनगर- 1, नंदुरबार- 2, पुणे- 3, सोलापूर- 1, सातारा- 6, औरंगाबाद- 4, नांदेड- 8, उस्मानाबाद- 2, परभणी- 1, वाशीम- 5, बुलडाणा- 1, चंद्रपूर- 1आणि भंडारा- 5. एकूण- 62.

Friday, 17 May 2019

तापमान/ विषेश वृत्त राज्यातील तापमानात वाढ होणार वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी

वृ.वि.1033                                                                                दि. 17 मे, 2019
                                                            

मुंबई, दि 17: राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील.
या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान 46 अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 47 अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान 45 अंशापर्यंत पोहचेल.
उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान 42 अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 18 ते 21 मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
000