Tuesday, 12 October 2021

विद्यार्थ्यांनी व्यापक बांधिलकी राखून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत - राज्यपाल




Ø गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साहात

Ø स्व. सुनिल देशपांडे आणि देवाजी तोफा यांना डी. लिट पदवी प्रदान

Ø आदिवासी भागातील संशोधन बहुआयामी विकासाभिमुख हवे- चौहान

     नागपूर, दि.12:  गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होऊ शकेल. हे सुत्र लक्षात घेऊन येथील विद्यार्थ्यांनी व्यापक बांधिलकी राखून भविष्यात प्रयत्न केले तर गडचिरोलीसह परिसराचा निश्चितच विकास होऊ शकेल अशी आशा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात व्यक्त केली. या समारंभात संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक स्व. सुनिल देशपांडे आणि मेंढालेखा येथील ग्रामसभेचे प्रमुख देवाजी तोफा यांना मानव विज्ञान पंडित ही मानद पदवी बहाल करण्यात आली.

गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी  राष्ट्रीय अनुसूचित  जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचीही उपस्थिती होती. या समारंभात संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक स्व. सुनिल देशपांडे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा येथील ग्रामसभेचे प्रमुख देवाजी तोफा यांना मानव विज्ञान पंडित ही मानद पदवी बहाल करण्यात आली. स्व.सुनिल देशपांडे यांच्या वतीने श्रीमती निरुपमा देशपांडे यांनी ही पदवी स्विकारली.

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मूलतः मोठी उद्यमशीलता असून तिला अनुरुप वाव देण्यासाठी प्रयत्नांची गरज अधोरेखित करतांना राज्यपाल म्हणाले, निर्सगाच्या कुशीतील या विद्यापीठावरील जबाबदारी मोठी आहे. लोकल ते ग्लोबल या सुत्रानुसार येथील विद्यार्थ्यांनी गावाच्या विकासासोबतच देश आणि जगाच्याही कल्याणाचा विचार करावा. समर्पित भावनेने अविरत प्रयत्न केल्यास आपल्या समाजाचा विकास होऊ शकतो हे लक्षात घेऊन येथील तरुणांनी आत्मनिर्भर व्हावे. स्टार्टअपसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून उद्यमशीलता जोपासून आपल्या परिसराच्या सर्वंकष परिवर्तनासाठी निष्ठेने प्रयत्न करावेत. राज्यातील प्रगत शहरी भाग आणि आदिवासी दुर्गम भाग यात मोठे अंतर आहे. ते भरुन काढण्यासाठी  येथील विकासासाठी नव्या शिक्षित पिढीने स्वावलंबनावर भर देण्याची गरजही त्यांनी प्रतिपादीत केली.

गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये मुलींच्या वाढत्या संख्येबाबत समाधान व्यक्त करुन स्त्रीशक्तीचा त्यांनी विशेषत्वाने गौरव केला. स्व. सुनिल देशपांडे आणि देवाजी तोफा यांच्यासारख्या ध्येयवादी व्यक्तींचे योगदान समाजासाठी  मोलाचेही ठरल्याच्या उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

ज्यांच्या धडपडीमुळे आपण शिक्षणाचा हा टप्पा गाठु शकलो. त्या मात्यापित्यांबद्दल विद्यार्थ्यांनी कृतज्ञता भावना बाळगण्याचे आवाहन करुन श्री. हर्ष चौहान म्हणाले, शिक्षण म्हणजे स्वत:सह  कुटुंब, समाज, गाव समजण्याची संवेदनशील क्षमता विकसित होणे. त्यातून आपण भविष्यात या घटकांसाठी काय करु शकतो याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. गावाचा विकास हा आपल्या विचारांचा केंद्रबिंदु असावा. गावाचा विकास हा बहुआयामी असतो. तो सामाजिक अंगानेही व्हावा. त्यासाठी विविध प्रश्न विद्यार्थ्यांचा मनात निर्माण व्हावेत आणि त्यांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयोगशील व्हावे. हा परिसर आदिवासीबहुल असल्याने केवळ सांस्कृतिक अंगानेच संशोधन करण्यासोबत ज्ञान, तंत्रज्ञान, चिकित्सा अशा विविध दृष्टीकोनातून प्रत्यक्ष व्यवहारात उपयुक्त ठरणारे संशोधनही व्हावे. अशा संशोधनाचा स्थानिक संदर्भात विचार व्हावा आणि विद्यापीठाने त्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
       गडचिरोलीसारख्या आदिवासी भागाचा शैक्षणिक विकासासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध आघाडयावर प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करुन पालकमंत्री शिंदे म्हणाले, या परिसराचे मागासलेपण दुर करण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून शिक्षणाकडे आम्ही पाहत आहोत. विविधांगी विकास करुनच येथील मागासलेपण दूर होऊ शकेल. नक्षलवादाच्या समस्येने पोळलेल्या गडचिरोलीचा विकास हा आमचा प्राधान्याचा विषय आहे. त्या दृष्टीकोनातून गोंडवाना विद्यापीठाच्या गुणात्मक वाढीसाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. एक जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून त्याचा नावलौकिक निर्माण करण्यासाठी सर्व पातळयांवर कृतिशील नियोजन केले जात आहे.  या भागातील वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी आमचे प्रयत्न आहेत. अशी ग्वाही देऊन नेल्सन मंडेला यांच्या शिक्षणविषयक विचारांचा दाखला त्यांनी यावेळी दिला.

कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेडी यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठाची गेल्या नऊ वर्षातील वाटचाल विषद केली. ते म्हणाले गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने सुरु झालेल्या गोंडवाना विद्यापीठाने आपल्या मुळ उद्देशाला सार्थ ठरवितांना अनेक स्थानिक आणि वैशिष्टयपूर्ण अभ्यासक्रम आपल्या कार्यपद्धतीत समाविष्ट केले आहे. याशिवाय विविध उपक्रमातून विद्यापीठाची स्थानिक संदर्भातील उपयुक्तता वाढविण्याचे प्रयत्न आहे. भविष्यात अत्याधुनिक स्वरुपाच्या विविध पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी विद्यापीठाचे नियोजन असून त्यानुसार आमचे प्रयत्न सुरु आहेत.

    या समारंभात विज्ञान व तंत्रविज्ञान शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा, मानव विज्ञान शाखा, आणि आंतरविज्ञान शाखेतील सुवर्ण पदक प्राप्त, प्रथम गुणवत्ता प्राप्त, आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  नरेंद्र आरेकर यांनी केले तर  गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी आभार मानले.

    खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे आदींसह राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस प्रमुख अंकित गोयल आदी यावेळी उपस्थित होते.

Thursday, 7 October 2021

दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन



·         यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही 

·         कोरोना अधिक असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना प्रवेश नाही

·         दोन डोस घेतलेल्यांनाच तपासणी अंती प्रवेश

·         65 वर्षावरील ज्येष्ठांना, 10 वर्षाखालील बालकांना प्रवेश नाही

·         आजारी व्यक्ती, गरोदर महिलांनी न येण्याचे आवाहन

·         दीक्षाभूमी परिसरात मुक्काम करण्यास मज्जाव

·         खाद्यान्न वाटप स्टॉल, मोफत अन्नदान प्रतिबंधीत

·         ओळखपत्राशिवाय कोणालाच परवानगी नाही

·         पुस्तक, मुर्त्यांचे स्टॉल लावले जाणार नाही

·         जिल्ह्याच्या सीमा, रेल्वे स्थानक, बसस्थानकांवर तपासणी

·         लक्षणे असणाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी,

 

नागपूर दि. 7 : राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा होणार नाही. तथापि, या ठिकाणी काही अनुयायी आल्यास कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाईल. दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे व्यापक आरोग्य हित लक्षात घेऊन भाविकांनी यावर्षी दीक्षाभूमीवरील गर्दी टाळावी, असे आवाहन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले आहे.


विभागीय आयुक्त कार्यालयात आज या संदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने 2 ऑक्टोबर रोजी यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यानंतरही अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरात कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच सोयी-सुविधा करण्यात याव्यात, या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी विमला आर., महानगर आयुक्त राधाकृष्णन बी, परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, ट्रस्टी विलास गजघाटे, अतिरिक्त विभागीय पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, नागपूर ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, उपायुक्त आशा पठाण, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 


या बैठकीमध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये नागपूरला यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होणार नाही, याबाबतची माहिती देण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. केवळ दीक्षाभूमीची नव्हे तर विभागात कोणत्याही ठिकाणी अन्य धार्मिक कार्यक्रमासाठी अधिक गर्दी होत असल्यास कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


दीक्षाभूमी येथील कार्यक्रमाच्या संदर्भात कोविड-19 दिशानिर्देश पाळताना राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे या ठिकाणी 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच दहा वर्षाखालील मुलांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात यावे, आजारी व्यक्ती, गरोदर महिला यांना प्रवेश देण्यात येऊ नये, तसेच प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग व्हावे, लक्षणे असल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी, प्रत्येकाला सॅनीटायझर मिळावे, मास्क शिवाय प्रवेश देऊ नये, रेल्वे स्थानक, बस स्टॅड, जिल्हयांच्या सिमांवर तपासणी व्हावी, सोशल डिस्टन्सिग पाळण्यात यावे, यासाठी आवश्यक बॅरेकेटींग, आरोग्य पथक, पोलीस व महानगरपालिका कर्मचारी यांची योग्य ठिकाणी तैनाती करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


यावर्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटात हा सोहळा आल्याने गर्दीवर प्रतिबंध करण्यासाठी काही निर्णय शासनाला घ्यावे लागत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी प्रशासनाची ही भूमिका समजून घ्यावी. यावर्षी घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


दरवर्षी दीक्षाभूमीवर या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अन्नछत्र उघडले जाते. विविध सामाजिक संघटनांकडून खानपानाची व्यवस्था केली जाते. मात्र यावर्षी दीक्षाभूमीवर आत मध्ये कोणालाही मुक्काम करता येणार नाही. दीक्षाभूमी परिसरात कुठेही थांबता येणार नाही. तसेच आजुबाजुच्या परिसरातही मुक्काम करता येणार नाही. या ठिकाणी कोणतेही  फूड स्टॉल, पुस्तकांची दुकाने, मूर्त्यांची दुकाने लावता येणार नाही. तसेच महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक कोरोना रुग्ण आहेत त्या जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी येण्यास प्रतिबंधित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून व महाराष्ट्रातल्या उर्वरित जिल्ह्यांमधून येणाऱ्या भाविकांनी, अनुयायांनी यावर्षी नागपूरला दसरा मेळाव्यात येण्याचे टाळावे असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Saturday, 2 October 2021

विधि विद्यापीठ बांधकामाच्या निधीसाठी अर्थमंत्र्यांकडे लवकरच बैठक - उदय सामंत

· पायाभूत सुविधा निर्मितीसाठी आवश्यक निधी तत्काळ मिळवून देणार · उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी घेतला आढावा · यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाची मुंबईत बैठक नागपूर, दि. 2 : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या इमारत बांधकामातील पहिल्या टप्प्यात असलेले बांधकाम निधीअभावी अपूर्ण राहिले आहे. यामध्ये 13 इमारतींचा‌ समावेश आहे. ते बांधकाम लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष वर्ग सुरु व्हावेत. त्यासाठी 95 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच विद्यापीठ प्रशासनाची मुंबईत बैठक आयोजित करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ येथे आयोजित आढावा बैठकीत श्री. सामंत बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, कुलसचिव आशिष दीक्षित, सहायक कुलसचिव रंगास्वामी स्टँलीन, विशेष कार्य अधिकारी रमेश कुमार, राजशिष्टाचार अधिकारी रमेश मानापुरे, प्रो. हिमांशु पांडे, प्रो. सोपान शिंदे, वास्तुशास्त्रज्ञ सल्लागार पी. एस. आहुजा उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातील बांधकाम निधीअभावी थांबले असून, ते लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. विधि विद्यापीठ परिसराबाबत समाधान व्यक्त करून विद्यापीठाचे बांधकाम लवकर पूर्ण झाल्यास‌ त्याचा मोठा लाभ महाराष्ट्राच्या विधि क्षेत्राला मिळणार असल्याचे ते म्हणाले. या अपूर्ण इमारत बांधकामामध्ये शैक्षणिक इमारत, प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांचे दोन वसतीगृह, भोजन कक्ष, कर्मचारी निवासस्थानांचा समावेश आहे. ते पूर्ण करण्यासाठी निधी गरज आहे. त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्य शासनाने निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर हा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित न ठेवता तो विनाविलंब उपलब्ध करून देण्याचे आदेश श्री. सामंत यांनी सबंधितांना दिले. श्री. सामंत यांनी विधि विद्यापीठ परिसरातील नूतन इमारत बांधकामाच्या प्रगतीबाबत पाहणी केली. तसेच विकासकामांबाबत लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. कुलगुरु डॉ. विजेंदर कुमार यांनी विधि विद्यापीठ इमारतींचे झालेले बांधकाम आणि अपूर्ण राहिलेल्या इमारतींना लागणारा निधी लवकरात लवकर मिळण्याची मागणी श्री. सामंत यांच्याकडे केली. * * * * *

गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती व अहिंसेचे प्रेरक - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

Ø सेवाग्राम आश्रमात बापूना केले अभिवादन वर्धा, दि 2 ऑक्टो (जिमाका) :- महात्मा गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती, अहिंसेचे प्रेरक राहिले आहे. सेवाग्राम आश्रम हे प्रेरणास्थान आहे. आश्रमातील स्मारके जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजे असे नियोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देत बापुकुटीत प्रार्थना करून गांधीजींना अभिवादन केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांनी आदर्श आणि त्यागमय जीवन जगुन जगातील हजारो लोकांना प्रेरित केले. शिवाय आजही गांधींचे विचार जगाला प्रेरित करत आहे. आज महात्मा गांधींची जयंतीदिनी सेवाग्राम इथे येऊन मी स्वतःला धन्य मानत असल्याचे सांगितले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गांधी आश्रमात आगमन होताच खासदार रामदास तडस यांनी त्यांचे स्वागत केले. तर आश्रमप्रतिष्ठानच्या वतीने आश्रमप्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांनी स्वागत केले.यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रशासनाचे वतीने राज्यपालांचे स्वागत केले. आ. पंकज भोयर, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोडपे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, मिलिंद भेंडे, अविनाश देव आदींची उपस्थिती होती. 0000