नागपूर, दि. 3 : राज्यशासन कामगारांच्या हितासाठी सदैव प्रयत्नरत आहे. कामगारांच्या समस्या दूर करुन कंपनीने त्यांना तात्काळ कामावर रुजू करुन घेण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. रामटेक येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय सुर्या अंबा स्पीनिंग मिल्स नयाकुंड पारशिवनी येथील कामगारांच्या समस्येबाबत बैठकी दरम्यान त्यांनी सांगितले.
अंबा स्पिनींग मिल्स कामगारांच्या समस्या जाणून घेतांना पालकमंत्री बावनकुळे यांनी कामगार कंपनीमधील कामावर अवलंबून आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन कंपनीतील काम आहे. त्यामुळे कंपनीने कामगारांना कामावर रुजू करुन घ्यावे व कंपनी पूर्ववत सुरु ठेवावी, अशा सूचना दिल्या.
कंपनी व कामगार यांच्यामध्ये निर्माण झालेल्या समस्येमुळे बाजारपेठेत माल उपलब्ध होत नसून सामान्य लोकांना त्रास होत आहे. असे होता कामा नये याकरीता कंपनी व कामगार यांनी आपले कार्य सुरळीतपणे पार पाडावे, असेही त्यांनी सांगितले.
विदर्भामध्ये रोजगार निर्मितीसाठी शासन अनेक कंपन्याचा विस्तार वाढवित आहे. त्यामाध्यमातून विदर्भासह महाराष्ट्र व देशाला वेगाने प्रगतीकडे नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. जास्तीत जास्त कंपनी विदर्भामध्ये आणणे व रोजगारनिर्मिती करणे हे शासनाचे प्रमुख लक्ष्य असल्याचे ते यावेळी म्हणाले.
विदर्भाच्या आर्थिक विकासासाठी कंपनीमध्ये उत्पादन कार्य रात्रदिवस सुरु राहणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार प्राप्त होईल. कंपन्यासाठी वीज आवश्यक असून ती पूर्णपणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच वीजबिलावर सबसिडीसोबत आवश्यक त्या सुविधा देण्यात येत आहेत. यामुळे जास्तीत जास्त कंपन्या विदर्भाकडे येतील व त्यामाध्यमातून स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्माण होईल.
सूर्या अंबा स्पिनींग मिल्स कामगारांच्या समस्येबाबत जाणून घेतांना पालकमंत्री यांनी कंपनीला कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावी असे सांगून कामगारांनी आपले काम चालू ठेवावे, अशा सूचना यावेळी दिल्या.
*****

No comments:
Post a Comment