Thursday, 9 November 2017

पारदर्शकतेमुळे समाजाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास - न्या. व्ही. पी. गायकवाड


                * राष्ट्रीय विधी सेवा दिवस सप्ताहाचे आयोजन
                * कायदेविषयक मार्गदर्शनासाठी मेळाव्याचे आयोजन
                
नागपूर, दि. 9 : न्यायालयातील पारदर्शक न्यायव्यवस्थेमुळे नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे प्रतिपादन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. गायकवाड यांनी केले.
जिल्हा व सत्र न्यायालय येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारा राष्ट्रीय विधी सेवा दिवस सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश कुणाल जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य ॲड. पी. के. सत्यनाथन, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जयस्वाल, जिल्हा सरकारी वकील ॲड. नितीन तेलगोटे उपस्थित होते.
गरजूंना कायदेविषयक मदत करण्यासाठी न्याय विधी सेवा प्राधिकरणव्दारे प्रयत्न करण्यात येत आहेत. राष्ट्रीय विधी सेवा दिवस सप्ताहाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन करणे या हेतूसह न्याय व्यवस्थेविषयीचा विश्वास आणखी वृद्धिंगत करण्यासाठी आयोजन असल्याचे न्या. गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे मध्यस्थीच्या माध्यमातून अनेक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होत आहे. यासाठी गरजूंना मोफतपणे कायदेविषयक आवश्यक मदत करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील नागरिकांना विधिप्रक्रियेबाबत माहिती देवून त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारा आयोजित या सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रंमांच्या माध्यमातून करण्यात येत असलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे न्या. गायकवाड  यावेळी म्हणाले.
दिनांक 9 ते 18 नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे विधी स्वयंसेवक, वकील, स्वयंसेवी संस्था घरोघरी जाऊन गरजू व्यक्तींना कायदेविषयक मार्गदर्शन करणार आहेत. याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बालकांचे सरंक्षण योजना, अमली पदार्थांचे निर्मूलन योजना, आदिवासी हक्क संरक्षण व कार्यवाही योजना, कामगारांसाठी कायदा सेवा योजना, मानसिक आणि मनोरुग्ण अपंग व्यक्तीकरिता योजना, गरिबी निर्मूलन योजना, यासारख्या दहा योजनांची दहा दिवसांमध्ये  माहिती देण्यात येणार आहे.
यावेळी विधी सेवा बाबत वकीलांची भूमिका या विषयावर ॲड. प्रकाश जायस्वाल यांनी तर अभियोक्त्याची विधी सेवा बाबत भूमिका या विषयावर ॲड. नितीन तेलगोटे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्या. कुणाल जाधव यांनी केले. संचालन ॲड. राजेंद्र राठी तर आभार ॲड.पी. के. सत्यनाथन यांनी मानले. यावेळी न्यायाधीश, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी व इतर नागरिक उपस्थित होते.
 यावेळी राष्ट्रीय विधी सेवा दिवस सप्ताहानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारा रॅली काढण्यात आली.

                                                              ****

No comments:

Post a Comment