Friday, 17 November 2017

जिल्ह्यातील बंधाऱ्याची कामे राळेगण सिद्धीच्या धर्तीवर-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

-          जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा घेतला आढावा
       
        नागपूर दि. 17 : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात तीन वर्षात 498 गावांपैकी 432 गावे जलयुक्त झाली आहेत. विविध उपाययोजनांमुळे शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाणी टंचाईवर मात करतानाच भूगर्भातील जलाशयात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील बंधाऱ्याची कामे राळेगण सिद्धीच्या धर्तीवर करण्याच्या सूचना  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.   
            बचत भवन येथे नागपूर जिल्ह्यातील जलसंधारण व जलयुक्त शिवार कामांसंदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
            यावेळी आमदार समीर मेघे, आमदार मल्लीकार्जून रेड्डी, जिल्हा परिषद सभापती निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाये उपस्थित होते.
            पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी तसेच जलयुक्तच्या माध्यमातून कोरडवाहू क्षेत्रातील गावे पायाने पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी यावेळी दिली. तसेच शासकीय विभाग आणि लोकसहभागातून पहिल्याच वर्षी 313 गावांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार मृदा व जलसंधारणाची पाच हजार 51 कामे पूर्ण करण्यात आली. 61.88 लाख घनमीटर नाल्यातील व तलावातील गाळ काढण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            जलयुक्त शिवार अभियानात 2016-17 या वर्षात 119 गावे जलपरीपूर्ण झाली आहे. या अभियानातंर्गत 2017-18 या वर्षात नागपूर जिल्ह्यातील 220 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. माथा ते पायथा तत्त्वावर निवडण्यात आलेल्या गावांमध्ये तीन हजार 419 कामे प्रस्तावित करण्यात आली असून, या कामांवर 150 कोटी 84 लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.
            जलसंधारण विभागातंर्गत येणाऱ्या लघु सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधारे, सिमेंट नाला बांध, उपसा सिंचन योजना, नाला खोलीकरण व रुंदीकरणाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
            नागपूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानातंर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याची कामे राळेगण सिद्धीच्या धर्तीवर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. नदी, नाल्याचे पाणी अडवून बंधारा बांधण्यात येतो. या बंधाऱ्यात अधिक जलसाठा शिल्लक राहावा, याकरिता बंधाऱ्याची कामे राळेगण सिद्धी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील बंधाऱ्याची कामे करण्यात यावी. याकरिता प्रत्यक्ष राळेगण सिद्धी येथील बंधाऱ्याची पाहणी  करुन अहवाल तयार करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
            जिल्ह्यातील लघुसिंचन प्रकल्पातंर्गत 13 तालुक्यात 124 कामे प्रगतीपथावर असून,46 हजार 866 स.घ.मी पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच पाझर तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, साठवण बंधारे आणि कोल्हापुरी बंधारा आणि सिमेंट नाला बंधाऱ्याच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
****   

No comments:

Post a Comment