Friday, 1 June 2018

इंडियन रोड काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन यंदा नागपुरात

        नागपूर, दि. 1 : भारतीय रस्ते महासभेचे (इंडियन रोड काँग्रेस) वार्षिक अधिवेशन यंदा नागपूर येथे करण्यात येणार आहे.
        विभागीय क्रीडा संकुलाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त अनूप कुमार हे होते.
            देशातील रस्ते विकास, रस्ते बांधणी व पुल उभारणी तसेच त्यांची  देखभाल यांच्याशी संबंधित अभियंत्यांची देशपातळीवरील सर्वोच्च संघटना म्हणून इंडियन रोड काँग्रेस ओळखली जाते. रस्ते विकास, त्यांची बांधणी, पुलउभारणी आणि त्यांच्या देखभालीबाबत आधुनिक तंत्रज्ञान तसेच कौशल्याचा उपयोग करुन देशातील दळणवळण सुविधा दर्जेदार ठरतील अशा पध्दतीने विकसीत करण्याबाबत ही संस्था चर्चा, परिसंवाद, प्रदर्शने, नियतकालिकांचे प्रकाशन, इंटरनेटच्या माध्यमातून संवाद अशा विविध उपक्रमाद्वारे कार्यरत असते. या संस्थेचे सुमारे 16 हजारावर सदस्य आहेत.
            या संस्थेचे यंदाचे राष्ट्रीय अधिवेशन 23, 24 व 25 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील एका महत्वाच्या आणि प्रतिष्ठीत संस्थेच्या अधिवेशनाचे यजमानपद नागपूरकडे आले आहे. या अधिवेशनाचे उत्कृष्ट आयोजन व्हावे आणि त्याने नागपूरच्या लौकिकात भर पडावी. अधिवेशनासाठी प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहे. असे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
            मुख्य अधिवेशन, विविध विषयांवर चर्चासत्र आणि सादरीकरण तसेच प्रदर्शन असे या उपक्रमाचे स्वरुप असणार आहे.
            या बैठकीला महापालिकेचे आयुक्त विरेंद्रसिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता पी. डी. नवघरे, उपायुक्त के. एन. के. राव, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर हजर होते.
                            ****

No comments:

Post a Comment