एशियन स्कूल बॅडमिंटन चॅम्पियनशीपचे उद्घाटन
नागपूर, दि. 7 - बॅडमिंटनसह विविध खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे राज्यातील खेळाडू तयार करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यांच्या प्रशिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
मानकापूर परिसरातील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या एशियन स्कुल बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेत चीन, हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, भारत या देशांनी सहभाग घेतला आहे.
मंचावर महापौर नंदा जिचकार, आमदार सुनील केदार, आमदार डॉ. मिलींद माने, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरूण लखानी, बॅडमिंटनचे नागपूर जिल्हा अध्यक्ष कुंदाताई विजयकर, क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार, सहसचिव नरेंद्र सोपल, बॅडमिंटन असोसिएशनचे आर. के. मिश्रा, मंगेश काशीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनचा बहुमान नागपूरला मिळाल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, कुठल्याही खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता तयार करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक असते. बॅडमिंटनसह विविध खेळांमध्ये राज्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या खेळाडूंना सरावासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन विशेष लक्ष देत असून शासन निधी कमी पडू देणार नाही. या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यासह आपल्या देशाचा बहुमान वाढविण्यासाठी प्रशिक्षकांसह खेळाडूंनीही खूप परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शहरात खेळाची संस्कृती रुजविण्यासाठी नागपूर महानगर पालिका प्रयत्नशील आहे. अशाप्रकारचे आयोजन नागपूरत नेहमी व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
या स्पर्धेत चीन, हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, भारत या देशातील सुमारे 150 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 13 जुलै पर्यंत चालणार आहे. क्रीडा रसिकांनी या आंतरराष्ट्रीय खेळांचे सामने बघण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात क्रीडा विभागाचे अधिकारी, खेळाडू व क्रीडा रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
*****




No comments:
Post a Comment