Monday, 30 July 2018

गुलाबी बोंडअळी निर्मूलनासाठी कामगंध सापळ्याचा वापर करा - अश्विन मुदगल

*  कापूस पिकांच्या संरक्षणासाठी नियमित निरीक्षण
* शेतकऱ्यांनी सतर्क राहून उपाययोजना आवश्यक
* कृषी विभागातर्फे 462 निरीक्षण नोंदी पूर्ण

नागपूर दि.30 : गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेतकऱ्यांनी कामगंध सापळ्याचा वापर करुन आवश्यकतेनुसार किटकनाशक फवारणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात 2 लक्ष 10 एकर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. मागीलवर्षी बोंडअळीच्या प्रादूर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षी सुद्धा अशाप्रकारे नुकसान होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्यादृष्टीने शेतकरी बांधवांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. कपाशीची पेरणी केल्यानंतर 45 ते 60 दिवसात बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षकाच्या माध्यमातून आठवड्यातून दोन वेळा निरीक्षणे घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील 280 कृषी सहायक व पर्यवेक्षकांनी आतापर्यंत 462 निरीक्षणे घेतली आहेत.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बोंडअळी निर्मुलनासाठी कामगंध (एरोमेल सापळे) प्रतिहेक्टरी 5 या प्रमाणे लावण्यात यावेत. या सापळ्यात सलग तीन दिवस प्रतिदिन आठ ते दहा नरपतंग आढळून आल्यास किटकनाशकाचा वापर करणे आवश्यक आहे. कामगंध सापळे सर्वच कृषी केंद्रात उपलब्ध असून त्याची किंमत 70 रुपयांपर्यंत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार निंबोळी अर्काची फवारणी करणे आवश्यक आहे. ती उपलब्ध नसल्यास अझाडीरेकटीन 300 पीपीएम किंवा 1500 पीपीएम प्रति दहालिटर पाण्यात मिसळून फवाळणी करावी. या संदर्भात कृषी सहायक अथवा तालुका कृषी अधिकारी यांना माहिती देऊन गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनासाठी तांत्रिक मार्गदर्शन घेऊन तात्काळ उपाययोजना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
गुलाबी बोंडअळीचा पादुर्भाव असल्याचे निरीक्षणाअंतर्गत आढळून आल्यास कपाशीच्या पिकाचे नुकसान होणार नाही यासाठी तात्काळ कृषी सहायकाचा मार्गदर्शनानुसार उपाययोजनेला सुरुवात करावी, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले. कृषी विभागामार्फत विविध पिकांच्या निरीक्षणाच्या नोंदणी घेण्यात येत असून 27 जुलै पर्यंत 322 कृषी सहायक व पर्यवेक्षकांनी 1228 प्लॉटवर सोयाबीन पिकाच्या 188 नोंदी, कापूस पिकाच्या 462 नोंदी तसेच भातपिकांच्या 72 नोंदी अशा 722 नोंदी घेण्यात आल्या आहेत. कृषी विभागातर्फे पिकांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत असून निरीक्षण नोंदवितांना किडीच्या प्रादुर्भावाबाबत अचूक निरीक्षणे नोंदवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली आहे.
****

No comments:

Post a Comment